टाईम मशिन राईड (ज्योती आपटे)

jyoti aapte
jyoti aapte

विक्रमनं टाईम मशिनच्या की-बोर्डवर "21 ऑक्‍टोबर, 1879, डेस्टिनेशन : मेन्लोपार्क, अमेरिका' असं टाईप केलं आणि मशिन सुरू केलं. काही तासांनी तो चौथ्या मितीत वावरणाऱ्या मेन्लोपार्कमध्ये येऊन पोचला. दुपारचं शांत हवेशीर वातावरण, आजूबाजूला मोकळी मैदानं आणि त्यात दुरूनही उठून दिसणारी मोठी दुमजली इमारत. टाईम मशिन एका झाडाच्या आडोशाला ठेवून विक्रम झपाट्यानं चालत त्या इमारतीच्या दिशेनं निघाला...

विक्रम लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा. हे असं का, किंवा ते तसं का नाही, या प्रश्‍नांची उत्तरं स्वत:च शोधणारा. अभ्यासाबरोबरच भरपूर अवांतर वाचन करणारा. त्यामुळं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागं न लागता संशोधन क्षेत्रात जायचं हे त्याचं पक्क ठरलेलं होतं. यात त्याला आई-बाबांचाही पाठिंबा आणि प्रोत्साहन होतं. कारण आपल्या एकुलत्या एका मुलाची आवड आणि त्याची हुशारी ते जाणून होते. तसंच आर्थिक आघाडीवरही त्याच्या नोकरीची निकड नव्हती.

विक्रमचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो पुण्यातच एका रिसर्च लॅबमध्ये रुजू झाला. अवघ्या तेविसाव्या वर्षी या रिसर्च लॅबमध्ये रुजू झालेला विक्रम हा तिथला सर्वांत लहान संशोधक होता. आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणार म्हणून विक्रम खूष होता. रुजू झाल्याझाल्या त्यानं स्वत:ला संशोधन कार्यात झोकून दिलं. संशोधनात मग्न झाला, की त्याला ना भुकेची जाणीव व्हायची, ना तहान लागायची. काळ पुढंपुढं सरकत होता. बघताबघता विक्रमला इथं रुजू होऊन पाच वर्षं झाली.

त्या दिवशी विक्रमचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण टाईम मशिन तयार करण्याच्या प्रोजेक्‍टसाठी तो सिलेक्‍ट झाला होता. शालेय जीवनापासून बघितलेलं त्याचं स्वप्न सत्यात उतरण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. कधी एकदा घरी जाऊन आईला ही बातमी सांगतो असं त्याला झालं.
घरात पाऊल ठेवल्याठेवल्या त्यानं आईला हाका मारायचा सपाटा लावला.
""अरे हो हो! एवढा कंठशोष कशासाठी चाललाय?'' आईनं विचारलं.
""आई, अगं माझं सिलेक्‍शन झालं आहे...'' विक्रम.
""सिलेक्‍शन? कशासाठी?'' आई.
""अगं, कशासाठी म्हणून काय विचारतेस? टाईम मशिनच्या प्रोजेक्‍टमध्ये. शास्त्री सरांना असिस्ट करणाऱ्या टीममध्ये मी सिलेक्‍ट झालो आई.''
""काय? खरंच! खूप छान झालं!''
""आई, आता तू बघच. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जगात पहिल्यांदा टाईम मशिन तयार करण्याचा मान आम्ही आपल्या देशाला मिळवून देणारच,'' विक्रम निर्धारानं म्हणाला.
""विक्रम, मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे. तुम्ही टाईम मशिन तयार करण्यात नक्की यशस्वी व्हाल,'' आईनं तोंडभरून आशीर्वाद दिला.
सन 2025 उजाडलं तेच एका अभूतपूर्व संशोधनातल्या यशाची बातमी घेऊन. शास्त्री सर आणि त्यांच्या टीमनं टाईम मशिन तयार केलं होतं. राष्ट्रपती, पंतप्रधान, आमदार, खासदार यांनी सर्व टीमचं अभिनंदन केलं. जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. विक्रमच्या आई-बाबांनाही खूप आनंद झाला होता.
भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या टाईम मशिनवर चर्चा विविध चॅनेल्सवरून सुरू होत्या. त्याविषयी शास्त्रज्ञांची मतं, त्याची उपयुक्तता, फायदे-तोटे याचा ऊहापोह करून झाला होता. त्याचे रिपोर्टस नेटवरून व्हायरल झाले होते. त्यामुळं लोकांच्या मनात टाईम मशिनविषयी शंका, कुशंका, उत्सुकता, भीती अशा संमिश्र भावना होत्या. विक्रमला मात्र आता टाईम मशीन राईडचे वेध लागले होते. केव्हा एकदा आपण या टाईम मशिनमधून मनात योजलेल्या त्या कालखंडात जातोय असं त्याला झालं होतं.

त्या दिवशी शास्त्री सरांनी मीटिंग बोलावली. मीटिंगमध्ये त्यांनी टाईम मशिनमधली विविध फिचर्स समजावून सांगितली. या टाईम मशिनचा आपल्या देशाला कसा फायदा करून घेता येईल याविषयी चर्चा झाली. सर म्हणाले : ""टाईम मशिनच्या साह्यानं आपल्या आवडीच्या कालखंडात फेरफटका मारण्यासाठी जे उत्सुक असतील आणि अर्थात आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्याही असतील अशा टुरिस्टना आपण ही मशिन राइड उपलब्ध करून दिली, तर या संधीचा लाभ परदेशी टुरिस्टही घेऊ शकतील. अर्थात त्याचा फायदा आपल्या देशाला होईल.'' सरांची ही कल्पना सर्वांनी उचलून धरली. मीटिंग आटोपली आणि सरांनी विचारलं : ""मग टाईम मशिनमधून आपल्यापैकी कोण राइडला जाणार?''
ताबडतोब विक्रम उभा राहिला. या क्षणाचीच तर तो अनेक वर्षांपासून वाट बघत होता. ""कुठं जाऊन येणार तू?'' सरांनी विक्रमला विचारलं.
""सर, तुम्हाला तर माहीतच आहे, नव्हे सर्वांनाच कल्पना आहे, की मी टाईम मशिनमधून कुठं जाऊ इच्छितो...''
""येस्स! महान संशोधक एडिसनच्या काळात,'' सर म्हणाले.
""हो सर!''
""ठीक आहे. उद्या सकाळी सात वाजता तयारीनिशी इथं ये.''
""येस सर,'' असं म्हणून विक्रम घराकडं परतला.
विक्रम नाचतच घरी आला. त्यानं आईला ही खूषखबर दिली. विक्रमचं शाळेपासून जपलेलं स्वप्न पूर्ण होणार याचा एका डोळ्यात आनंद, तर दुसऱ्या डोळ्यात विक्रमबद्दलची काळजी अशी त्याच्या आईची द्विधा मनस्थिती झाली. विक्रमला मात्र ही रात्र सरून कधी एकदा दुसरा दिवस उजाडतो आहे, असं झालं होतं.
शेवटी एकदाची ती घडी आली. आवश्‍यक त्या वस्तू, उपकरणं घेऊन हेल्मेट घालून विक्रम टाईम मशिन राइडसाठी सज्ज झाला. मशिनची अंतर्गत रचना त्याला माहीत होतीच. आत शिरून त्यानं सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेतली आणि दरवाजा बंद करून घेत बाहेर उपस्थित सर्वांना बाय बाय केलं.
विक्रमनं टाईम मशिनच्या की-बोर्डवर "21 ऑक्‍टोबर, 1879, डेस्टिनेशन : मेन्लोपार्क, अमेरिका' असं टाइप केलं आणि मशिन सुरू केलं. काही तासांनी तो चौथ्या मितीत वावरणाऱ्या मेन्लोपार्कमध्ये येऊन पोचला. दुपारचं शांत हवेशीर वातावरण, आजूबाजूला मोकळी मैदानं आणि त्यात दुरूनही उठून दिसणारी मोठी दुमजली इमारत. टाईम मशिन एका झाडाच्या आडोशाला ठेवून विक्रम झपाट्यानं चालत त्या इमारतीच्या दिशेनं निघाला. कारण त्याच्या लक्षात आलं, की हीच ती दुमजली प्रयोगशाळा- जिथं जिनिअस एडिसन प्रयोग करण्यात मग्न असणार.
कोणी आपल्याला बघू नये याची काळजी घेत विक्रम प्रयोगशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर पोचला. या मजल्यावर भिंतीलगतच्या रॅक्‍समध्ये हजारो प्रकारच्या रसायनांच्या बाटल्या ओळीनं मांडून ठेवल्या होत्या. त्याशिवाय सर्व प्रकारची खनिजं, प्रत्येक प्रकारच्या मापाचे खिळे, सुया, तारा, दोरे, रेशीम, मोरपिसं, शहामृगाची पिसं, प्राण्यांचे खूर इतकंच नव्हे, तर गाय, घोडा, बकरी, उंट, ससा आणि मानवाचे केससुद्धा तिथं ठेवलेले होते. कारण संशोधन करताना आपल्या सहकाऱ्यांचं कशावाचूनही अडू नये हा एडिसनचा उद्देश.

हे बघताना विक्रमला मजा येत होती. एखादं म्युझियमच आपण बघतोय असं त्याला वाटत होतं. निरीक्षण करतकरत शेवटी विक्रम खालच्या मजल्यावरच्या प्रयोगशाळेच्या त्या ठिकाणी येऊन पोचला- जिथं एडिसन आणि सहकाऱ्यांनी विजेवर चालणाऱ्या दिव्याची चाचणी घेण्यासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. त्याला दिसलं, की तिथं एका उभट आकाराच्या निर्वात केलेल्या मोठ्या काचेच्या दिव्यात हेअरपिनच्या आकाराचा प्रक्रिया केलेला सुताचा दोरा तंतू म्हणून बसवून तो वीजवाहक तांब्याच्या तारेला जोडला होता. विक्रमचं निरीक्षण चालू असतानाच कुणाच्या तरी येण्याची त्याला चाहूल लागली. तो आडोशाला लपला. तिथून हळूच डोकावून त्यानं बघितलं, तर चार-पाच लोक इकडंच येत होते. जवळ आल्यावर त्यातल्या एका तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला बघताच विक्रमच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. कारण ते होते महान संशोधक "सर थॉमस अल्वा एडिसन.' विक्रमनं डोळे भरून त्यांना पाहिलं आणि मनोमन तो नतमस्तक झाला. "याचसाठी केला होता अट्टाहास' असं त्याला वाटलं.

ता. 21 ऑक्‍टोबर 1879 ची रात्र सुरू झाली होती. एडिसन आणि सहकारी विजेवर चालणाऱ्या दिव्याची चाचणी घेण्यासाठी सज्ज झाले. काचेच्या दिव्यातल्या तंतूला जोडलेल्या तांब्याच्या तारेतून वीजप्रवाह सोडण्यात आला आणि... एक शांत; पण झगझगीत विद्युत ज्योत त्या काचेच्या बल्बमध्ये चमकू लागली. आजूबाजूचा परिसर उजळून निघाला. ती ज्योत किती वेळ टिकते हे बघायला एडिसन आणि सहकारी रात्रभर जागे होते. विक्रमही जागा होता. पूर्ण रात्र अखंडितपणे ती ज्योत चमकत राहिली. अखंड आणि अथक परिश्रमानंतर विजेवर चालणारा दिवा संशोधित करण्यात एडिसन आणि सहकारी यशस्वी झाले होते. ज्या काळात संशोधन हे एकट्या संशोधकाचं काम आहे, अशी समजूत होती, त्या काळात या समजुतीला छेद देत आपल्या प्रयोगशाळेत सुसंघटितपणे संशोधनात्मक काम हाती घेऊन सर्वांच्या सहकार्यानं अनेक मानवोपयोगी शोध लावून मानवी जीवन प्रकाशमय, संगीतमय आणि मनोरंजक करणाऱ्या एडिसन यांना "तुम्ही धन्य आहात' असं म्हणून विक्रमनं मनोमन नमस्कार केला. "सामूहिकपणे संशोधन करण्याचा तुमचा पायंडा अनुसरून त्याप्रमाणं मार्गक्रमणा केल्यामुळं मानवी जीवन झपाट्यानं विकसित झालं आहे,' असं मनात म्हणत विक्रमनं त्यांना परत एकदा त्रिवार वंदन केलं आणि विक्रम एकदम भानावर आला.

सकाळ झाली होती. त्याच्या लक्षात आलं, की कितीही वाटलं तरी आपल्याला आता इथं थांबून चालणार नाही. सन 2025 मध्ये परत जावंच लागेल. कारण एक म्हणजे सर्वजण तिकडं विक्रमच्या येण्याकडं डोळे लावून बसले होते आणि दुसरं म्हणजे विक्रमलाही हा रोमांचक अनुभव कधी एकदा सर्वांना सांगतो, असं झालं होतं. झपाझप चालत तो टाईम मशिनपाशी आला. आत शिरून त्यानं दार बंद केलं आणि की-बोर्डवर टाईप केलं : 11 फेब्रुवारी, 2025, डेस्टिनेशन : पुणे, इंडिया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com