‘हाता’ला हवी सगळ्यांची साथ

कोल्हापूर - कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या प्रारंभी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे.
कोल्हापूर - कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या प्रारंभी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे.

आगामी निवडणुकीत भाजपशी मुकाबला करण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याची काँग्रेसची धडपड आहे. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असल्याने काँग्रेसने प्रसंगी थोडे नमते घेऊन, महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर अन्य विरोधी पक्षांनीही एकत्र यावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

भाजपचा सत्तासूर्य मावळावा यासाठी काँग्रेसने जंगजंग पछाडण्यास प्रारंभ केला आहे. ही लढाई हातातून जाऊ नये यासाठी काँग्रेसला सर्व पक्षांची साथ हवी आहे. ‘भाजपेतरोंका साथ, सत्ता पलटानेमें देगा हाथ’ असे पक्षाचे नवे धोरण आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा निर्णय झाला आहे. या समविचारी पक्षांमध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर भाजपविरोधातील सर्व पक्षांनी एकत्र यावे यासाठी काँग्रेस पुढाकार घेऊन महाराष्ट्रातही प्रयत्न करत आहे. मोदींना थांबवण्याच्या एककलमी कार्यक्रमात मानापानाचे प्रश्‍न नकोत म्हणून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबरीचे स्थान दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य समविचारी पक्षांना समवेत घेण्याच्या प्रस्तावाची मांडणी करताना ‘राष्ट्रवादी’ सोबत असेल याची खबरदारी काँग्रेसने घेतली आहे. 

गेल्या चार वर्षांत विरोधी पक्षाची जागा घेतली, ती खरे तर सत्तेत राहण्याचे फायदे मिळविणाऱ्या शिवसेनेनेच. सरकारच्या न पटणाऱ्या प्रत्येक निर्णयाला शिवसेनेने विरोध केला. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते मात्र शांत राहिले. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बड्या नेत्यांवर कुठले ना कुठले आरोप आहेत. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे मुंडेंचा अपवाद वगळता बडी मंडळी शांत होती, तर विरोधी बाकांवरच्या अन्य नेत्यांनी सत्ताधाऱ्यांशी मैत्री निभावण्यात धन्यता मानली. 

‘आगामी लोकसभा निवडणुका जिंकल्या तर पुढची ५० वर्षे आपलेच राज्य असेल,’ असे भाकित भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने भाजपेतर पक्ष अधिकच सावध झाले असावेत. त्यामुळेच काँग्रेसला सर्वपक्षीय साथ हवी आहे. शिवसेनेला वैचारिक मतभेदांमुळे समवेत घेणे शक्‍य नाही. बाकी सर्व पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस धडपडत आहे. महाराष्ट्रात खरे तर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना- भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाची मते खेचण्याची क्षमता मोठी नाही. मनसेसह भाकप, माकप, कवाडे गट, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकरांचा भारिप- बहुजन महासंघ यांना मोदी- भाजपविरोध या धाग्याने एकत्र बांधण्याची काँग्रेसची धडपड सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे लोकपाठिंबा असलेले नेते.

अकोला परिसरावरील आपली पकड लक्षात घेता त्या जिल्ह्यात सोडून अन्य ठिकाणी ते जागावाटपाची तयारी दाखवतात. एल्गार परिषद, त्या संबंधातील गुन्हे यामुळे ते विरोधकांकडे जातील याची सोय भाजपनेच करून ठेवली आहे. तरीही ते काँग्रेसच्या मदतीला येतील काय याबाबत शंका आहे. भाकप, माकपचा काही भागांत आदिवासी क्षेत्रात जोर आहे. पण त्यांनीही भाजपविरोधासाठी आघाडीत येण्याची तयारी पूर्णत: दाखवलेली नाही. या पक्षांना लोकसभेच्या जागावाटपात काही मतदारसंघ द्यावेत, अशी त्यांची ताकद नाही. राजू शेट्टी हे एकमेव नेते लोकसभेत जाण्याची क्षमता राखतात. गेल्या निवडणुकीत परिस्थिती विषम असताना ते भाजपच्या वळचणीला गेले आणि त्यांनी जागा जिंकली. या वेळी त्यांना यश मिळेल काय ते पुढे दिसेल. 

विधानसभा निवडणुकीनंतर झालेली प्रत्येक निवडणूक ठाणे आणि नांदेड या जिल्ह्यांचा अपवाद वगळता भाजपने जिंकली आहे. त्यामुळेच सरकारवर लोक नाराज आहेत हे खरे, पण ते आपल्याला मते देतील अशी आशा विरोधकांनी ठेवणे धाडसाचे आहे. काँग्रेसला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी कामगिरी दाखवण्याची संधी आहे. भाजप- शिवसेना यांचे परस्परांशी पटत नाही, मंत्री अननुभवी आहेत, नोकरशाही मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, अशी परिस्थिती असली तरी विरोधी पक्षांना या परिस्थितीचा लाभ अजूनतरी घेता आलेला नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहणारा कोणीही निवडून येतो अशी एकेकाळी  स्थिती. पण गेल्या लोकसभा निवडणूक निकालांनी काँग्रेसची परिस्थिती पार बदलवून टाकली. जेमतेम दोन जागा जिंकलेल्या या पक्षाची स्थिती ‘भिंत खचली, कलथून खांब गेला’ अशी झाली असताना आम्ही जुनी पडकी उद्‌ध्वस्त धर्मशाळा नाही हे दाखवण्यासाठी काँग्रेसने उशिरा का होईना संघर्ष सुरू केला आहे. देशपातळीवर मोदींचा रथ थांबवण्याचा निर्णय झाला. अर्थातच, महाराष्ट्रातील काँग्रेसने त्यात योगदान द्यावे अशी अपेक्षा कळवली गेली. त्यासाठी काँग्रेसने काही बदलही केले.

मोहनप्रकाश हे राज्याचे प्रभारी असताना त्यांना गांभीर्याने घेतले जात नसे. उशिरा का होईना आता परिस्थिती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्नाटकाच्या राजकारणात काहीसे डावलेले गेलेले मल्लिकार्जुन खर्गे प्रभारीपदावर नेमले गेले. ते तयार गडी आहेत. लोकसभेत पक्षाचे नेतेही आहेत. पुनरागमनासाठी पक्षसंघटनेत प्राण फुंकण्याची जबाबदारी त्यांनी गांभीर्याने घेतलेली दिसते. ‘जनसंघर्ष यात्रा’ हा त्याचाच परिणाम. पश्‍चिम महाराष्ट्राच्या बलाढ्य गडात पक्षाने कामी लागावे यासाठी जनतेत जाण्याची सुरवात झाली ती तेथून. काँग्रेसने आता अस्तित्वासाठी संघर्ष सुरू केला आहे. विरोधी पक्ष ही कोणत्याही लोकशाहीची प्रबळ गरज असते. काँग्रेस ती पुरी करो यासाठी शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com