मनोरंजक विषयावरचा "संदर्भग्रंथ' (महेश बर्दापूरकर)

book review
book review

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स आर्टस अँड सायन्सेस या अमेरिकेतल्या संस्थेतर्फे दरवर्षी दिलेले जाणारे "ऑस्कर' पुरस्कार आणि त्याचं कवित्व हा दरवर्षी चित्रपटरसिकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा भाग असतो. या स्पर्धेत भारतीय चित्रपटांचा समावेश आणि त्यावरील वाद आणि चर्चाही दरवर्षी रंगतात. सन 1927पासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांबद्दलचं "अँड दी ऑस्कर गोज टू' हे शैलजा देशमुख लिखित पुस्तकात या पुरस्कारांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पुरस्कारविजेत्या सर्व चित्रपटांच्या कथानकापासून अभिनेते, निर्माते, निर्मिती खर्च अशी इत्थंभूत माहिती पुस्तकात मिळते. ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास, वैशिष्ट्यं आणि "काही लक्षवेधी' या सदरातली माहितीही या पुरस्काराबद्दल अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयोगी पडेल. पुरस्कारांचा 89 वर्षांचा इतिहास एकाच ठिकाणी आणि सलग उपलब्ध होणं, हेच पुस्तकाचं वैशिष्ट्य. मात्र, एका मनोरंजक विषयावरील पुस्तक असूनही ते केवळ संदर्भग्रंथाच्या अंगानं जातं, ही पुस्तकातली मोठी त्रुटी ठरली आहे.

या पुस्तकात सन 1927पासून 2016पर्यंत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळविलेल्या चित्रपटांची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती उपयुक्त असली, तरी त्यात रंजकतेचा अभाव असल्यानं पुस्तक सर्वसामान्य वाचकांपेक्षा समीक्षक आणि संशोधकांनाच उपयुक्त ठरतं. ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळालेल्या आणि पुरस्कारविजेत्या चित्रपटांच्या कथा, त्यातल्या कलाकारांची वैशिष्ट्यं, पटकथा कशी लिहिली गेली, चित्रपटाचा प्रतिसाद आणि व्यवसाय यांबद्दल वाचायला प्रेक्षकांना रस असतो. पुस्तकात चित्रपटाची कथा आणि काही ठिकाणी चित्रीकरणाची वैशिष्ट्यं मांडण्यात आली आहेत. कथा सांगण्यातच मोठी जागा खर्ची पडल्यानं (जी आजकाल विकिपीडियावर कोणालाही एका क्‍लिकवर उपलब्ध होऊ शकते.) पुस्तक वाचण्यातला रस कमी होतो. वर्तमानपत्रातल्या परीक्षणाप्रमाणं केवळ कथा आणि काही थोडक्‍यात वैशिष्ट्यं पुस्तकात वाचायला मिळत असल्यानं चित्रपटाबद्दलची उत्सुकता पूर्ण शमत नाही. उदाहरणार्थ, "गॉन विथ द विंड' या चित्रपटाच्या लेखिकेपासून तिची पटकथा, सातत्यानं बदललेले दिग्दर्शक, नायिकेची निवड, चित्रीकरणात आलेल्या अडचणी आदींचा मोठा इतिहास आहे. त्याबद्दल वाचकांना वाचायला आवडलंही असतं, मात्र या पुस्तकात केवळ कथा सांगून विषय संपवण्यात आला आहे. अगदी तीस आणि चाळीसच्या दशकातले चित्रपट प्रेक्षकांना सहज उपलब्ध होत नाहीत आणि त्यांच्याबद्दलची फारशी अवांतर माहितीही उपलब्ध नसते. लेखिकेनं या चित्रपटांबद्दल लिहिताना काही संदर्भांची भर घातली असून, ती वाचकांच्या ज्ञानात भर घालते. या संदर्भात "हॅम्लेट' हा 1948मध्ये प्रदर्शित चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. शेक्‍सपिअरच्या या नाटकावर जगभरात अनेक चित्रपट निघाले असले, तरी या चित्रपटामध्ये कथा सांगण्यासाठी कोणता फॉर्म निवडला गेला, याबद्दलची पुस्तकात माहिती मनोरंजक आहे. "गांधी' व "स्लमडॉग मिलेनिअर' या भारताच्या मातीत घडणाऱ्या चित्रपटांबद्दल लेखिकेला अधिक विस्तारानं लिहिणं शक्‍य होतं. मात्र, तसा प्रयत्न दिसत नाही. "गांधी'मुळं देशातल्या अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाय रोवले. "भारतीय रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातल्या नामवंत अभिनेत्यांनी चित्रपटातल्या इतर महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत,' या एका वाक्‍यात हा सर्व इतिहास गुंडाळ्यात आला आहे. रोहिणी हट्टंगडी, सईद जाफरी, अलेक पदमसी अशा अनेक दिग्गजांना चित्रपट भूमिका कशा मिळाल्या, त्यांनी कोणते कष्ट घेतले आणि त्यामुळं त्यांची कारकीर्द कशी घडली याबद्दल पुस्तकात एक शब्दही नाही. पुस्तकातली माहिती केवळ जंत्रीच्या अंगानं कशी जाते आणि त्यात चित्रपटाच्या थोडक्‍यात रसग्रहणाशिवाय कोणतीही माहिती कशी मिळत नाही, याचं हे वानगीदाखलचं उदाहरण.

सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणं पुस्तकात काही त्रुटी असल्या, तरी संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. लेखिकेनं केवळ माहिती एकत्र करण्याचा फॉर्म निवडल्यानं मनोरंजकतेच्या आघाडीवर पुस्तक निराशा करतं. पुस्तकाची छपाई उत्तम असली, तरी सर्व छायाचित्रं कृष्णधवल वापरण्यात आली आहेत.
एकुणात, ऑस्करविजेत्या चित्रपटासारख्या मनोरंजक विषयावरचे हे पुस्तक संदर्भग्रंथाच्या पुढं जाण्यात अयशस्वी ठरतं...

पुस्तकाचे नाव : अँड दी ऑस्कर गोज टू...
लेखिका : शैलजा देशमुख
प्रकाशक : नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठं : 490, मूल्य : 750 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com