यंत्रांच्या रंजक जन्मकथा (मयूर जितकर)

book review
book review

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचंच जीवन आज वैविध्यपूर्ण यंत्रांनी व्यापलं आहे. या यंत्रांनी जीवन अधिक सुखकर, आरामदायी बनवलंय. रोजचा दिवस सुरू करणाऱ्या टूथब्रश आणि टूथपेस्टसारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या वस्तूंपासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या यंत्रांचा यात समावेश होतो. आपण या वस्तू, यंत्राशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र, या यंत्रांचा शोध नेमका लागला तरी कसा, असा प्रश्‍न आपल्या फारसा पडत नाही. सर्वच यंत्रांच्या निर्मितीमागचे कष्ट, कल्पकता, सर्जनशीलता, समर्पण आपण क्वचितच शोधतो. अशा प्रकारच्या शोधांची प्रक्रिया अनेकदा रंजक असते. ते समजून घेण्यासाठी डॉ. प्रबोध चोबे यांनी लिहिलेलं "या शोधांशिवाय जीवन अशक्‍य' हे पुस्तक वाचायलाच हवं. या पुस्तकामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, पेन्सिल, खोडरबर, पेन, टाइपरायटर, झेरॉक्‍स, विजेचा दिवा, एलईडी, शिलाई आणि धुलाईयंत्रापासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या 27 यंत्रांची जन्मकथा उलगडली आहे. यापैकी प्रत्येक यंत्राची शोधकथा रंजक, वाचनीय आहेच, शिवाय यंत्राच्या सुरवातीच्या शोधात पुढच्या प्रत्येकानं आपल्या परीनं सुधारणा कशी केली, याचं उत्तरही मिळतं. टूथब्रश आणि टूथपेस्ट या आपल्या सर्वांच्याच दैनंदिन; पण साध्या वाटणाऱ्या वस्तू. मात्र, त्यांना सहस्रकातल्या सर्वांत महत्त्वाच्या वस्तूंचा मान देणं, आपल्याला प्रथमदर्शनी आश्‍चर्यकारकच वाटतं. मात्र, या साध्या वस्तूंचं महत्त्व पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात समजतं. त्याचप्रमाणं, आजच्या पेन्सिलचा उगम मेंढीच्या कातडीत ठिसूळ काळा दगड लिहून झाल्याचं वाचल्यावरही आश्‍चर्य वाटतं. आजच्या जगाचं पानही न हलणाऱ्या संगणकाचा अर्थात कॉम्प्युटरच्या शोधाचा इतिहास आणि त्यातील प्रगती जाणून घेण्याचा अनुभवही वेगळाच. कागदावरील मजकूर खाण्याचा पाव वापरून खोडणारा माणूस आणि आजच्या खोडरबरचा शोध लावणारा माणूस, या मानवी कल्पकतेच्या पायऱ्या समजून घेणं, जितकं माहितीपर, तितकाच मनोरंजकही. केवळ मशाल, पणतीच्या उजेडावर समाधान न मानता विजेचा बल्ब, एलईडीपर्यंतच्या शोधातून माणसातल्या असमाधानी संशोधकाची सफरच हे पुस्तक घडवतं. त्याचप्रमाणं, पुस्तकामध्ये टाइपरायटर, कॅमेरा, इलियस होवेनं तयार केलेलं शिवणयंत्र, धुलाईयंत्र आदींची पहिली छायाचित्रंही पाहायला मिळतात, हेही या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य. यंत्रांची सुरवातीची छायाचित्रं कृष्णधवल आहेत. मात्र, अद्ययावत यंत्रांची छायाचित्रं रंगीत वापरली असती, तर दोन्हींतला फरक अधिक ठळकपणे समजला असता, असं वाटतं. प्रत्येक यंत्रावरच्या लेखाच्या सुरवातीला आणि शेवटी चौकटीत संबंधित यंत्राचा इतिहास, वैशिष्ट्यं आदींची माहिती दिल्यानं पुस्तकाच्या वाचनीयतेत भरच पडली आहे. खरंतर, मानवानं प्रत्येक यंत्राचा नुसता शोध न लावता वर्षानुवर्षं, पिढ्यान्‌पिढ्या ती गरजेनुसार अद्ययावत केली. त्यातून मानवानं एकप्रकारे स्वत:मधली जिद्द, चिकाटी यांचाच शोध घेतला. यातले बहुतेक शोध परदेशांत लागले आहेत. हे देश या शोधांमुळं श्रीमंत झाले. यापुढं सर्जनशीलता, कल्पकता दाखवून अधिकाधिक भारतीयांना- विशेषत: विद्यार्थ्यांना विविध शोध आपल्या नावावर करण्याची स्फूर्ती सुचली, तरी या पुस्तकलेखनामागचा लेखकाचा उद्देश सफल झाला, असं म्हणता येईल. तसंच, सर्व संशोधकांबद्दलही एक प्रकारची कृतज्ञताच व्यक्त केल्यासारखं होईल.

पुस्तकाचं नाव : या शोधांशिवाय जीवन अशक्‍य
लेखक : डॉ. प्रबोध चोबे
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद (0240 - 2332692)
पानं : 221, किंमत : 250 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com