ड्रेस कोड (मृणालिनी केळकर)

mrunalini kelkar
mrunalini kelkar

"मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का? देशात बेकारी काय कमी आहे? कमी पगारावर वाटेल तेवढ्या शिक्षिका मिळतील.'' मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.

नेहमीप्रमाणेच सकाळचं घरचं, स्वतःचं आवरून साडेनवाच्या ठोक्‍याला घराबाहेर पडले. नेहमीच्या स्टॉपवरच्या बसनं रेल्वे स्टेशन आणि तिथून पुढं ट्रेननं निघाले. बसल्या बसल्या कालच्या संभाषणाची आठवण झाली. रावसाहेब पाटील - मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष - काल शाळेत आले होते ते वेगळ्याच विषयावर बोलायला. शाळेच्या टीचर्सचा युनिफॉर्म ठरवण्याचा आदेश त्यांना वरून आला होता.
"या आदेशाची अंमलबजावणी नव्या सत्रापासूनच झाली पाहिजे...'
"...पण सर, इतके दिवस असं काही नव्हतं. विद्यार्थिनींसाठी युनिफॉर्म आहेच; पण टीचर्सनाही म्हणजे..! ती त्यांची व्यक्तिगत बाब...'
"इलाज नाही...व्यक्तिगत मताला काही महत्त्व नाही. आपली शाळा अनुदानावर चालते हे लक्षात ठेवा आणि वरिष्ठांकडून आलेला आदेश पाळणं ही आपली जबाबदारी; विशेषतः तुमची. शाळेच्या मुख्याध्यापिका आहात तुम्ही. तुम्ही यावर लक्ष ठेवायचं. कळलं?' असं म्हणत ते उठले.
उठता उठता म्हणाले, "तुम्हालासुद्धा यातून सूट नाही. फक्त रंग वेगळा ठेवा युनिफॉर्मचा. रंग सर्वानुमते ठरवा. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहे... छान दिसाल तुम्ही,' हसत हसत रावसाहेब म्हणाले.
"बरं, आता निघतो. काय ठरेल ते कळवा मला,' ते निघून गेले. आता ट्रेनमध्ये तेच सगळं मला आठवत होतं...
***

अधूनमधून काही जणीं सलवार-कमीज घालून यायच्या तेव्हा माझा थोडाफार आक्षेप असायचा. तेवढ्यात स्टेशन आलं. मी मनाशी ठरवलं, आजच मधल्या सुटीत मीटिंग घ्यायची. रिता टीचरचा ग्रुप गेल्या महिन्यात बऱ्याच वेळा सलवार-कमीजमध्ये दिसला होता, म्हणजे वरून आलेल्या आदेशाची त्यांना कल्पना होती का? - असणारच! कारण, रावसाहेब तिच्या नात्यातलेच.
शाळेत पोचताच मी सरळ प्रार्थनेच्या जागी गेले. प्रार्थना आटोपताच ऑफिसमध्ये आले. मस्टरवर सही केली. आलेल्या पत्रांचा गठ्ठा समोरच होता. काही पालकांची पत्रं होती, काही अर्ज होते. त्यातलं सरकारी पत्र बाजूला ठेवून बाकीची पत्रं वाटून योग्य उत्तरं लिहून टायपिस्टकडं दिली. नंतर नोटीस लिहिली आणि बेल वाजवली. लगेचच शांताबाई आत आली.
""काय मॅडम?''
""ही नोटीस सगळ्या वर्गांमध्ये फिरव. टीचर्सच्या सह्या घेऊन ये,'' नोटीस लिहिलेली कॉपी घेऊन शांताबाई बाहेर गेली. ती जाताच मी सरकारी लखोटा उघडला. ते शिक्षण खात्यातून आलेलं पत्र वाटत होतं. सोबत जिल्हा परिषदेचंही पत्र होतं. आमच्या शाळेला चांगलं भरघोस अनुदान मिळणार होतं पंचवीस लाखांचं. "नेमून दिलेला युनिफॉर्मच टीचर्सनी घालायचा. हेडमिस्ट्रेसनाही त्यातून सूट नाही,'
असा जिल्हा परिषदेकडून आदेश होता. या आदेशाचं काटेकोर पालन होतंय, हे ट्रस्टींनी पाहायचं...तरच हे अनुदान मिळणार होतं. युनिफॉर्मची सक्ती करण्याचं कारणही नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्या मते ते कारण असं होतं ः "काही शाळांतल्या टीचर्स "असभ्य' वाटतील असे कपडे परिधान करून येत होत्या...लहान मुलांवर याचा परिणाम चांगला होणार नाही म्हणून युनिफॉर्मची सक्ती सर्व शाळांना करण्यात आली होती.'
***

- मी मीटिंग तर बोलावली होती...कोण काय बोलतील, काय घडेल, याचा अंदाज येत नव्हता. कुणी नकार दिला तर रिताच्या ग्रुपवर जबाबदारी सोपवायची,असं मी मनाशी ठरवलं.
नकार देणाऱ्यांना पटवून द्यायचं. समजा, स्टाफ नाइलाजानं का होईना तयार झाला तरी माझं स्वतःचं काय? मला जमणार आहे का हे? सासूबाई कडाडतील. अगदी टोकाचा निर्णय सांगतील, "नोकरी सोडून दे...' छे, छे... नोकरी सोडण्याचा विचारही नको. ते शक्‍यच नाही. आपला पगार आहे म्हणून तर मुलांची उच्च शिक्षणं निर्विघ्नपणे चालली आहेत. बाकीच्या तयार झाल्या तर मलाही ते मान्य करावंच लागेल. रावसाहेब कालच बजावून गेलेत. त्यामुळं आदेशात बदल होणं अशक्‍यच.
तेवढ्यात सुटीची घंटा वाजली. थोड्याच वेळात टीचर्सना कॉन्फरन्स रूमकडं जाताना मी पाहिलं आणि मीही उठलेच. रूममध्ये जाताच सगळ्या जणींनी उभं राहून अभिवादन केलं. मीही "नमस्ते' म्हणत अंमळ थांबले. मग धीर गोळा करत म्हणाले ः ""आपण कशासाठी जमलोय हे कळलंय ना तुम्हाला? मी नोटीस पाठवली होती सविस्तर...तरीही पुन्हा सांगते, आपल्याला वरून आदेश आला आहे की टीचर्सनीही युनिफार्म वापरावा, तोही सलवार-कमीज या कपड्यात. आता यावर कुणाला काही बोलायचं असेल तर मोकळेपणाने बोला. या आदेशावर आपल्या सगळ्यांची सर्वांगीण चर्चा झाल्यावर मग कुठला रंग, डिझाइन हे सर्व नंतर ठरवू या. मान्य असणाऱ्यांनी हात वर करावेत आणि ज्यांना मान्य नाही त्यांनी "का मान्य नाही' याचं कारण सांगावं. उगाचच विषयाला सोडून होऊ शकणाऱ्या चर्चेत वेळ न दवडता निर्णय घेणं त्यामुळं सोपं होईल.''

जवळजवळ सगळ्या जणींनीच हात वर केले होते पाच-सहा जणी वगळता. त्या पाच-सहा जणी जवळपास माझ्याच वयोगटातल्या होत्या. त्यापैकी नीलिमा उभी राहत म्हणाली ः ""मॅडम, अगदीच नाइलाज झाला तर मला मान्य करावंच लागेल; पण मला घरून परवानगी मिळणं जरा कठीणच!''
""कारण, "सासूबाईंना आवडतं नाही', हेच ना?'' मी मध्येच तिचं वाक्‍य तोडत म्हटलं.
""नाही, तसं नाही. माझ्या सासूबाई बऱ्याच पुढारलेल्या आहेत; पण आमच्या "ह्यां'नाच नाही रुचणार...''
नीलिमा म्हणाली.
""बरं, बघू आपण.''
""पुष्पाताई, तुमचा नकार कशासाठी?''
""मॅडम माझा प्रश्‍न पैशांचा आहे... नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत...फी-वह्या-पुस्तकांचा खर्च...त्यात मी नवे कपडे शिवायचे म्हणजे...''
""अहो, पण एक महिन्याची मुदत दिली आहे आपल्याला...प्रत्यक्ष अंमलबजावणी होतेय की नाही, कोण नियम मोडतंय वगैरेची तपासणी एक महिन्यानंतर...''
""सुरेखा, तुला काही बोलायचंय?''
""हो मॅडम, मला युनिफॉर्मबद्दल काहीच आक्षेप नाही; पण माझाही प्रश्‍न पुष्पाताईंसारखाच आर्थिक आहे. ड्रेस कोड लागू केला गेल्यावर कापड आणणं, शिवणं यात वेळ जाणारच. तोपर्यंत दुसऱ्या रंगाचा सलवार-कमीज घालण्याची परवानगी नाही. सलवार-कमीज तसा सुटसुटीतच. माझ्यासाठी तर उत्तमच. मला दोनदा बस बदलावी लागते. गर्दीच्या वेळी हे बरंच.''
""बस, ट्रेन तर मलाही बदलावी लागते, मला नाही अवघड वाटत. मला तर साडीच आवडते. साडी हा आपला पोशाख आहे. वीस वर्षं झालीत मला या शाळेत,'' मी म्हटलं.
""मॅडम, तुमच्यासारख्यांनीच असं म्हटलं तर आमचं कोण ऐकणार?'' सुरेखा म्हणाली.
""मग तुम्ही सगळ्या जणी जाऊन भेटा अध्यक्षांना. नाहीतरी तेही जुन्याच मताचे आहेत; पण त्यांनी व्यक्तिगत मतापेक्षा शाळेच्या भविष्याचा विचार केला आहे. काही झालं तरी सरकारी अनुदार सोडून चालणार नाही...आणि मग बघा, मेजॉरिटी काय आहे ते...'' मी म्हटलं.
""मॅडम, तुम्ही घालाल सलवार-कमीज...?'' साडीचा आग्रह धरणारी निर्मला म्हणाली.
""हो घालेन. नव्हे, घालावाच लागेल. मला एक सांगा, आपण नोकरी का करतो? आर्थिक गरज म्हणूनच ना? विद्यादान वगैरे मोठमोठे शब्द वापरून विनावेतन तर शिकवत नाही ना आपण...?'' मी विचारलं.
""हो मॅडम, हे मात्र खरं बोललात,'' सुरेखा म्हणाली.
""मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का? देशात बेकारी काय कमी आहे? कमी पगारावर वाटेल तेवढ्या शिक्षिका मिळतील.'' मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.

""मॅडम, हे सगळं मान्य केलं तरी घरच्यांचा प्रश्‍न उरतोच,'' निर्मला म्हणाली.
""का बरं? तुम्ही सुशिक्षित आहात. पटवून द्या घरच्यांना. नाहीतर एक उपाय आहे. मी तोच करणार आहे. इथं प्रत्येकीचं लॉकर आहे. तिथं कपडे आणून ठेवा. तेवढी सूट मी तुम्हाला देईन. घरून निघताना साडी नेसून बाहेर पडा. एवढी एक गोष्ट मी अध्यक्षांना पटवून देईन. हा ड्रेस कोडचा फतवा आपण हसतमुखानं स्वीकारू या. मुलांना ज्ञान देणं महत्त्वाचं की "कपडे कोणते असावेत' हा मुद्दा महत्त्वाचा? शिवाय नोकरी गमावून चालणार नाही आपल्याला. माझी मुलं तर मोठी आहेत. आता बघता बघता मुलीचं लग्न समोर उभं राहील - तेव्हा, सलवार-कमीजचा स्वीकार! काय?'' माझं बोलणं संपताच सगळ्या जणी चित्कारल्या ः ""मॅडम, ब्रेव्हो! आता काळजीच नको.''

""मी बाकीच्यांना पटवते. बघाच तुम्ही... आणि रंग तुम्हीच ठरवा आणि मला कळवा म्हणजे मीही ठरवते माझा रंग. कारण, माझा पोशाख वेगळ्या रंगाचा हवा, असाही आदेश आहे. मला वाटतं, मी पांढराच पसंत करते. तुम्हीही लाल-काळा वगळून रंग ठरवा आणि ज्यांची आर्थिक अडचण आहे, त्यांच्यासाठी थोडी आगाऊ रक्कम मी अध्यक्षांकडून मागून घेईन. काय, झालं समाधान?''
मी विचारलं.
सगळ्या जणींनी एकदम होकार भरला. तेवढ्यात सुटी संपल्याची बेलही वाजली. मी सगळ्या जणींचा निरोप घेऊन माझ्या रूममध्ये आले. एक प्रश्‍न चुटकीसारखा सुटल्याचं समाधान होतं. त्याच समाधानात असताना मी अध्यक्षांना फोन लावला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com