बेटावरचा आग्यावेताळ! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं मिथक. पोराटोरांना टरकवायला बरं आहे. अर्थात, जगण्यासाठी ही मिथकं जाम उपयोगी ठरतात. शहाणपण शिकवण्याचा तो एक मार्गही आहे.

इतिहास आणि मिथकं यांच्यात "सत्य'सुद्धा मिसळलेलं असतं. "इतिहास म्हणजे चांगल्या पद्धतीनं सांगितलेल्या वावड्या' असं कुणीतरी म्हटलंही आहे. अशाच एका वास्तवाच्या खडकावरची एक काल्पनिक कहाणी सुमारे साठेक वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर येऊन गेली. दुसऱ्या महायुद्धातली कहाणी म्हटल्यावर ती सत्यकहाणी असणार, हे रसिक जवळजवळ गृहीत धरतात. युद्धभूमीवरच्या घटनांचं प्रभावी चित्रण त्यात होतं. म्हणजे युद्ध खरंखुरं होतं, युध्दभूमी खरीखुरी होती; पण त्यातलं कथाबीज संपूर्णत: काल्पनिक...विख्यात लेखक ऍलिस्टर मॅक्‍लिन यांनी हा भन्नाट प्रकार करून दाखवला होता. चित्रपटाचं नाव होतं ः "गन्स ऑफ नॅव्हरोन.' सध्या साठीला आलेल्या किंवा पलीकडल्या लोकांना "गन्स ऑफ नॅव्हरोन' चांगला आठवत असेल. या पिढीतल्या चित्रपटवेड्यांनी एकेकाळी "गन्स ऑफ नॅव्हरोन'साठी आपला जीव तिकिटबारीवर टांगला होता. ग्रेगरी पेकच्या दिलफेक दिलेरीचं तोंडभरून कौतुक केलं होतं. अँथनी क्‍विनच्या डोळ्यातल्या कोल्हेचतुराईनं ही पिढी गारद झाली होती. डेव्हिड निवेनच्या गोलाईदार चेहऱ्याची जादू अनुभवली होती.

"गन्स ऑफ नॅव्हरोन' ही कादंबरी पूर्णत: काल्पनिक आहे, असं चित्रपटाच्या निर्मात्यानं आणि खुद्द लेखक ऍलिस्टर मॅक्‍लिन यांनी सांगूनही लोक म्हणायचे ः " छट्‌! फेकतात...हे घडलं असणार.' एका दुर्गम बेटावर जय्यत तयार ठेवण्यात आलेल्या नाझी जर्मनीच्या अजेय, अजिंक्‍य आणि आधुनिक तोफांची तोंडं बंद करण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या अर्धा डझन दिलेर सैनिकांनी तडीला नेलेली साहसमोहीम' असं या चित्रपटाचं कथासूत्र. यात काय नव्हतं? खवळलेला समुद्र होता. दुर्लंघ्य कडे-कपारीतलं अवघड गिर्यारोहण होतं. सैनिकांच्या टोळीतले अंतर्गत ताणेबाणे होते. धाडस, राष्ट्रप्रेम, युद्धकसब तर होतंच; पण सगळ्यांनाच भारी आवडणारा "दैवाचा खेळ'ही होता...आणि हे सगळं होतं वास्तवाच्या खडकावर बेतलेलं. आणखी काय हवं?
"गन्स ऑफ नॅव्हरोन' ची ष्टोरी रंगवून रंगवून सांगण्यात खरं तर काही हशील नाही, हे प्रारंभीच मान्य करायला हवं. ते गारुड पडद्यावर गुंग होऊन बघण्याचं आहे आणि त्यात पुष्कळ काळ रमण्याचं आहे.
* * *

उघड्या तोंडाच्या नाण्याच्या थैलीसारखा ग्रीस हा देश भूमध्य समुद्रानजीक पडून राहिला आहे. उजव्या हाताला भूमध्य समुद्राचा शेजार. पलीकडं तुर्कस्तान दिसतो. थैलीच्या मुखाशी, मधल्या खोलगट पोकळीत एजियन समुद्राचा पसारा. थैलीतली काही नाणी बाहेर पडून विखरावीत तसा तब्बल चौदाशे छोट्या छोट्या बेटांचा पसारा दिसतो.
याच एजियन समुद्राच्या उग्र, निळ्याशार पाण्यात दुसऱ्या महायुद्धात एक नाट्य घडलं.
ते वर्ष होतं सन 1943. दुसऱ्या महायुद्धाचा उत्तरार्ध सुरू झाला होता. स्टालिनग्राडचं युद्ध हिटलरच्या नाझी फौजांना नको तिथं झोंबू लागलं होतं. तेव्हाच या एजियन समुद्रातल्या ग्रीक बेटांची नाझी पंजातून सुटका करण्यासाठी दोस्तराष्ट्रांच्या फौजा आटापिटा करत होत्या. तिथल्या खिरो नावाच्या बेटावर तब्बल दोन हजार सैनिक अडकून पडले होते. तिथून बाहेर पडणं कर्मकठीण झालं होतं. कारण, बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता, तो समुद्रातलाच होता. त्याच बेटानजीक खाडीच्या मुखाशी होतं नॅव्हरोन नावाचं बेट. त्या बेटावर जर्मन शिबंदी सावधपणे बसली होती. मोक्‍याचं ठिकाण होतं. खुला समुद्र आणि एजियन समुद्राचं मुखया दोन्ही पाण्यांवर अधिसत्ता गाजवणारं हे चिमुकलं पण मोक्‍याचं बेट होतं.

या बेटावर दोन अत्याधुनिक, लांब पल्ल्याच्या, अचूक मारा करणाऱ्या दोन तोफा जर्मन सैन्यानं ठेवलेल्या आहेत. तिथं त्यांचा फौजफाटाही आहे आणि डोळ्यात तेल घालून संरक्षणही केलं जातं. एजियन समुद्रात आपलं शक्‍तिप्रदर्शन करून तुर्कस्तानला आपल्या बाजूला ओढण्याची हिटलरी चाल ब्रिटिश युद्धनेत्यांनाही कळून चुकली होती. एजियन समुद्रात वर्चस्व हवं असेल तर नॅव्हरोनचं ठाणं हे निर्णायक ठरेल, हा हिटलरचा आडाखा अगदीच चुकीचा नव्हता.
तिथं उंच कड्याच्या पोटात सुसज्ज यंत्रणेनिशी त्या दोन कर्दनकाळ तोफा उभ्या आहेत. बटण दाबताक्षणी स्वयंचलित यंत्रणेनिशी शत्रूच्या जहाजाचा किंवा विमानाचा वेध घेणाऱ्या या दोन तोफा म्हणजे हिटलरला वश झालेले आग्यावेताळच जणू. त्यानं मंत्र म्हटला की यांची जाळपोळ सुरू होणार.

या तोफांच्या टप्प्यात आपली जहाजं आणणं म्हणजे दोस्तांच्या फौजेसाठी जलसमाधीचा मुहूर्त गाठणंच होतं. विमानांनी हल्ला करून नॅव्हरोन बेट उडवलं तर? पण ते शक्‍य नव्हतं. त्या बेटावर बरीच स्थानिक वस्तीही होती. शिवाय, तोफा विमानंही उडवू शकत होतीच. तसं घडलंही होतं. उगीच उंटाच्या शेपटीचा मुका घेण्यात काही अर्थ नव्हता. अडकलेल्या दोन हजार सैनिकांना ना कुमक पाठवता येत, ना रसद...अशा परिस्थितीत ब्रिटिश नौदल सापडलं होतं. अखेर मार्ग शोधला गेला...
निवडक कमांडोज्‌ची टोळी पाठवून नॅव्हरोनचा कडा सर करायचा. तोफांपर्यंत पोचून त्यात स्फोटकं भरून त्या उडवायच्या. बात खतम! हे अर्थातच सोपं नव्हतं; पण दुसरा काही इलाजही नव्हता.

रॉय फ्रॅंकलिन, कसबी गिर्यारोहक कॅप्टन कीथ मॅलरी, (सन 1924 मध्ये जॉर्ज मॅलरी या ब्रिटिश गिर्यारोहकानं पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. त्या मोहिमेत मॅलरी मृत्यू पावला. त्याला श्रद्धांजली म्हणूनच इथं ग्रेगरी पेकच्या व्यक्‍तिरेखेचं नाव मॅलरी ठेवलं गेलं). पराभूत ग्रीक लष्करातला एक अधिकारी आंद्रे स्तावारो, स्फोटक तज्ज्ञ कॉर्पोरल मिलर, ग्रीक वंशाचा अमेरिकी आणि इथल्या भूगोलाची खडान्‌खडा माहिती असलेला स्पायरो पाप्पादिनोस आणि सुराफेकीत अलौकिक कसब असलेला इंजिनिअर बुचर ब्राऊन...अशा सहा जणांची टीम निवडली गेली. मच्छिमारांच्या वेशात त्यांनी होडीनिशी गुपचूप नॅव्हरोनचा खडकाळ किनारा गाठायचा. दोराच्या साह्यानं कडा उल्लंघून बेटाचं पठार गाठून वरची नाझी "लंका' जाळायची...असा साधारण बेत होता.
सहा जणांची ही टोळी तशी विसंवादीच होती. सहा जणांची तोंडं सहा दिशांना. एकमेकांशी फारसं देणं-घेणं नाही. असलाच तर संशयच होता. अशा परिस्थितीत त्यांनी होडी पाण्यात लोटली. एका दु:साहसाला प्रारंभ झाला...
* * *

"थांबा, पुढं जाऊ नका...आम्ही तुमच्या बोटीवर तपासणीसाठी येत आहोत!'' दुसऱ्या टेहळणी बोटीचा कॅप्टन भोंगा घेऊन ओरडत होता. अपेक्षेप्रमाणे घडलं होतं. जर्मनांची या भागात गस्त होती. टेहळणी बोट शेजारी येऊन उभी राहिली. बंदूकवाले नाझी सैनिक यांच्या "मच्छिमार' बोटीवर उतरले. खलाश्‍याच्या वेशातलं कुणी चिरुट ओढत होतं, कुणी शिडाचं कापड शिवत होतं. कीथ मॅलरी ग्रीकमध्ये बडबडत होता. इतक्‍यात शिडाच्या कापडाखाली दडवलेली मशिनगन धडधडली. क्षणार्धात नाझी कॅप्टन आणि सैनिकांची चाळण झाली. धडाधड हॅंडग्रेनेड फेकून नाझी बोट बुडवण्यात आली. एक संकट टळलं.

...नॅव्हरोनच्या कड्यापाशी होडी लावता लावता रात्र पडली. समुद्र खवळला होता, दोन पुरुष उंचीच्या लाटा कड्याच्या पाषाणावर थडकत होत्या. तिथं जाईपर्यंतच या टोळीची छोटीशी होडी उभी चिरफाळली. अन्नसाठा, बरीचशी युद्धसामग्री नष्ट झाली. कसेबसे हे सहा जण किनाऱ्याला लागले. समोर उभा कडा दिसत होता. तो लंघून वर जायचं होतं. दम खायलाही वेळ नव्हता. कड्यावर चढाई सुरू झाली...

टोळीचा नायक मेजर रॉय फ्रॅंकलिनचा पाय अचानक घसरला. उलटापालटा होत तो खाली कोसळून जखमी झाला. हाडंही मोडली असावीत. पाय तर गेलाच होता; पण मोहीम रोखण्यात अर्थ नव्हता. "फ्रॅंकलिनला तिथंच सोडून द्यावं, जर्मन गस्तीवाले त्याला अटक करतील. तुरुंगात त्याला दवापाणी मिळेल, मग आपण त्याला सोडवूच,' असं मिलरनं कीथ मॅलरीला सुचवलं. कारण, आता टोळीचं म्होरकेपण गिर्यारोहक मॅलरीकडं होतं. मॅलरीनं त्याला स्वच्छ नकार दिला. "आपला सहकारी ही आपली जबाबदारी आहे', असं त्यानं बजावलं. फ्रॅंकलिनचं लोढणं बाळगत त्यांनी कड्यावरचं आरोहण सुरूच ठेवलं. जायबंदी मेजर फ्रॅंकलिन पार कोलमडला होता. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. मॅलरीनं त्याला रोखलं.

""असं करू नकोस, रॉय...आपली ही मोहीम एक छोटंसं नाटक आहे. जर्मनांचं लक्ष उडवणं एवढंच आपलं काम आहे. मुख्य हल्ला तर येत्या एक-दोन दिवसांत होणारच आहे. उगीच एवढ्याशा गोष्टीवरून स्वत:चा जीव का घेतोस? एव्हाना आपलं नौदल निघालंही असेल...'' मॅलरीनं त्याला खोटंच सांगितलं. रॉय फ्रॅंकलिनला थोडासा दिलासा देण्याचा हेतू होताच; पण पुढं चुकून तो शत्रूच्या हाती लागला तर खोटी माहितीच पोचेल, हा मॅलरीचा मुख्य हेतू होता.

नॅव्हरोन बेटावरच्या रहिवाशांना जर्मन सैन्याबद्दल विलक्षण तिटकारा होता; पण सामान्य माणसं करून करून किती प्रतिकार करणार? तरीही काही तरुण बंडखोर जर्मनांना लपूनछपून त्रास देत होते. या बंडखोरांशी संधान बांधून आपलं कार्य सिद्धीस नेणं शक्‍य होईल, असं मॅलरीला वाटलं. पठारावरच्या गावात स्पायरोची एक बहीण राहत होती. मारिया तिचं नाव. तिला गाठून फ्रॅंकलिनसाठी एखादा डॉक्‍टर शोधण्याची मॅलरीची इच्छा होती; पण त्यात खूप अडचणी होत्या. मारिया आणि तिची मैत्रीण ऍना या दोघींनी साथ दिली नसती तर या टोळीचा निभाव लागणं कठीण झालं असतं. बेटावरच्या रिकाम्या घरांमध्ये लपायला त्यांनी मदत केलीच. शिवाय, खाण्यापिण्याची तोकडी का होईना, व्यवस्था लावून दिली.
जर्मन जीपगाड्या सतत गस्ती घालत असत. घारीच्या नजरेनं रहिवाशांवर पाळत ठेवली जाई. नवा चेहरा दिसला की लग्गेच चौकशी केली जाई. फटके दिले जात. मारिया आणि ऍनानं हा प्रकार स्वत:च अनुभवला होता. नाझी सैनिकांची नजर चुकवत, जायबंदी फ्रॅंकलिनची काळजी घेत मॅलरीची टोळी मोहीम फत्ते करण्यासाठी झटत राहिली; पण-
...फ्रॅंकलिनसाठी वैद्यकीय मदत शोधण्याच्या उद्योगात मॅलरीच्या टोळीचा सुगावा जर्मन सैन्याधिकारी म्युलरला लागला. आख्ख्या टोळीला एका क्षणी म्युलरनं झटक्‍यात जेरबंद केलं.
एका साहसमोहिमेचा हा जवळपास अंत होता; पण तसं घडणार नव्हतं.
* * *

म्युलर आणि सेस्लर या नाझी अधिकाऱ्यांनी त्यांना डांबून चौकशी आरंभली. कोण तुम्ही? कुठून आलात? काय बेत होता? वगैरे. चौकशी सुरू असतानाच आंद्रे स्तावारोनं हालचाल केली आणि झपाट्यानं हालचाली करत जर्मन अधिकाऱ्यांचीच गठडी वळली. पारडं फिरलं होतं. बंद दाराआड घडलेला हा प्रकार आत्मघातकी होता. तरीही तडीला गेलाच. भराभरा नाझी गणवेश अंगावर चढवत मॅलरीसकट सगळी टोळी पळायच्या बेतात आली.
""फ्रॅंकलिनला सोडून जातोय इथं. त्याची काळजी घ्या! ...तुमचं रेडिओ स्टेशन कुठं आहे?'' म्युलरच्या मुसक्‍या आवळत मॅलरीनं विचारलं.
"" तुला कशाला सांगू?'' म्युलर खेकसला.
""गोळी घालीन!'' मॅलरी.
""...कोणी रोखलंय तुला? मी माहिती देईपर्यंत तू गोळी घालणार नाहीस हे माहितीये मला!'' म्युलर तुच्छतेनं म्हणाला.
...मॅलरीच्या टोळीनं तिथून काढता पाय घेतला. जर्मन ठाण्यावर इशारत गेली. फ्रॅंकलिन शत्रूच्या गोटात अल्लाद सापडला होता. त्याचा पाय गॅंगरिननं पार निकामी झाला होता. त्याला इंजेक्‍शनं दिली गेली. इंजेक्‍शनच्या अमलाखाली फ्रॅंकलिननं जर्मन अधिकाऱ्यांना सांगून टाकलं, की एक-दोन दिवसांत दोस्तांचं नौदल येऊन थडकेल. जर्मन सैन्य सावध झालं. जर्मन मुख्यालयाकडं संदेश गेला. मोठ्या लढाईची सज्जता होऊ लागली. मॅलरीनं धोरणीपणानं फ्रॅंकलिनच्या डोक्‍यात पेरलेल्या खोट्या माहितीनं जर्मनांचा "कात्रज' झाला.
* * *

आपल्याकडची स्फोटकं निकामी झाली आहेत आणि काही तर चोरीलाच गेली आहेत, असं कॉर्पोरल मिलरनं जाहीर केलं आणि सगळ्या टोळीचा विरस झाला. आता ही लढाई हरल्यातच जमा होती. हजारो नाझी सैनिक आणि आपण पाच जण...वेडात दौडलेल्या वीर मराठ्यांसारखीच अवस्था; पण असं कसं झालं?
""मॅलरी, हे त्या ऍनाचं काम आहे...गॅरेंटी!'' मिलर म्हणाला. मॅलरीनं तिला जाब विचारला. तणाव निर्माण झाला. या फौजी लोकांना गटवून तिनं तिचा कार्यभाग साधला होता. ती डबल एजंट निघाली. तिला गोळी घालणं भाग होतं. गोळी घालायची कुणी? याची चर्चा होत असतानाच मारियानंच बंदूक चालवून आपल्या दगलबाज मैत्रिणीला संपवलं. इथून पुढं खरं मिशन सुरू झालं. -मॅलरी आणि मिलर नाझी गणवेशातच त्या कुप्रसिद्ध तोफांच्या संरक्षित ठिकाणी घुसले. स्तावारो आणि स्पायरोजनं गावात नाझी सैनिकांशी झुंज सुरू केली. मारिया आणि बुचर ब्राऊननं एक बोट पळवून कड्याच्या खालच्या बाजूला आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली.
मिलर स्फोटकांचा तज्ज्ञ होता; पण हातात अगदीच तुटपुंजी स्फोटकं होती. त्याच्या जोरावर दोन अजस्र तोफा नष्ट करणं म्हणजे दगड मारून हत्ती लोळवण्यासारखं होतं; पण मिलर आणि मॅलरीनं डोकं लढवत हिकमतीनं हा डाव पुरा केला.
स्पायरोनं त्या लढाईत अखेर देह ठेवला. बोट पळवण्याच्या प्रयत्नान बुचर ब्राऊनदेखील संपला. स्तावारो गंभीर जखमी झाला.
ही मोहीम कशी पूर्ण झाली? दोस्तांना एजियन समुद्रात संपूर्ण कब्जा मिळवून देणाऱ्या या सहा जणांच्या टोळीतले किती उरले? हे सगळं पडद्यावर पाहायचं. चित्रपट संपताना थकलेल्या मिलरचं वाक्‍य कहाणीचं सार सांगतं.
""मॅलरी, प्रामाणिकपणे सांगतो, आपण हे करू शकू असं मला वाटलं नव्हतं,'' मिलरनं कबुली दिली.
""वेल, मलाही!'' मॅलरी म्हणाला.
* * *

जगाच्या नकाशात भिंग घेऊन बघितलंत तरी नॅव्हरोनचं बेट तुम्हाला दिसणार नाही. कारण, ते अस्तित्त्वातच नाही. बाकी सगळी बेटं तिथल्या तिथं असली तरी लेखक ऍलिस्टर मॅक्‍लिन यांनी अचूक भूगोल बघून आपली काल्पनिक बेटं तयार केली. तिथं ही युद्धमोहीम घडवली. आजही ग्रीसला जाणारे पर्यटक नॅव्हरोनचं बेट बघायचा हट्ट धरतात म्हणे. हे सगळं काल्पनिक होतं, यावर विश्‍वास ठेवायलाच मुळी लोक तयार नव्हते. मॅक्‍लिन यांनी अन्य लिखाणही विपुल केलं आहे. "गन्स ऑफ नॅव्हरोन', "व्हेअर इगल्स डेअर' या त्यांच्या गाजलेल्या कहाण्या. त्यांचे ब्लॉकबस्टर सिनेमेही झाले. "गन्स ऑफ नॅव्हरोन'ची गोष्ट त्यांना फ्रेंच सैनिकांच्या एका मोहिमेमुळं सुचली असं म्हणतात. ती खरीखुरी मोहीम याच जातकुळीतली होती; पण मॅक्‍लिनसाहेबांनी नॅव्हरोनची साहसमोहीम निव्वळ आपली कल्पनाशक्‍ती, ताजा युद्धेतिहास, भूगोल यांची सांगड घालत आखली आणि यशस्वीही केली. एक कादंबरीलेखक मानवी इतिहासात किती खोलवर भिनू शकतो, याचं हे एक जबरदस्त उदाहरण मानता येईल. सन 1957 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीनं वेडावलेल्या कार्ल फोरमन यांनी त्या भरात चक्‍क स्वत:च पटकथा लिहून काढली आणि प्रसिद्ध दिग्दर्शक जे. ली थॉम्पसन यांच्या हातात ठेवली. स्वत:च निर्मात्याच्या भूमिकेत शिरून मॅक्‍लिन यांच्याकडून हक्‍क मिळवले. ग्रेगरी पेक, अँथनी क्‍विन, डेव्हिड निवेन, ऍथनी क्‍वायल अशी दमदार स्टारकास्ट निवडून ग्रीसमधल्या ऐतिहासिक ऱ्होड्‌स बेटावर आणि आसपास शूटिंग उरकून टाकलं. या बेटावरची जमीन आणि माणसं अभिनेता अँथनी क्‍विनला इतकी आवडली की त्यानं तिथं तात्काळ भलीमोठी जमीन विकत घेऊन टाकली. आजही त्या भूभागाला "क्‍विन बे' याच नावानं ओळखतात. ग्रेगरी पेकला जर्मन भाषा येत नव्हती; पण चित्रपटात जर्मन संवाद तर होते. मग तेवढे संवाद रॉबर्ट रायटी नावाच्या नटानं डब केले.

चित्रपटानं जोरकस धंदा केला. स्पेशल इफेक्‍ट्‌सचा ऑस्कर पुरस्कारही पटकावला; पण सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे "एका काल्पनिक कथेनं इतिहासावर केलेली शिरजोरी' हाच मानावा लागेल. असं फार क्‍वचित घडतं. ते "गन्स ऑफ नॅव्हरोन'नं घडवलं. विख्यात ब्रिटिश लेखक जे. आर. आर. टोल्किन यांचं एक फार फेमस वाक्‍य आहे. त्यांच्या एका पत्रात ते म्हणाले होते : ""आफ्टर ऑल, आय बिलिव्ह दॅट लीजंड्‌स अँड मिथ्स आर लार्जली मेड ऑफ ट्रूथ...सगळीच मिथकं आणि लोककथा या बव्हंशी सत्यच असतात.'' टोल्किन ही काही साधीसुधी असामी नाही. कवी, लेखक, तत्त्वज्ञ म्हणून ते अजरामर आहेत. "द हॉबिट', "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'सारख्या त्यांच्या परिकथा अजून शेकडो वर्षं वाचल्या-ऐकल्या जाणार आहेत. ते म्हणतात तसं असेल तर...
...आग्यावेताळही खरा आहे आणि नॅव्हरॉनची अदृश्‍य बेटंदेखील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com