पुणे कॅम्पातली घरफोडी (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

एक दिवस अगदी भल्या सकाळी नियंत्रणकक्षातून फोन आला ः "सर, लष्कर भागात अमुक एका रस्त्यावर एका इराणी कुटुंबाच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. छतावरची कौलं काढून घरात शिरून चोरट्यांनी एका किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे...'

ही गोष्ट आहे 1978 मधली. मी पुण्यात झोन टूचा उपायुक्त होतो. शहराच्या मानानं आमची हद्द खूप मोठी होती. तीत संरक्षण विभागाचाही - लष्कर आणि वायुदल - भाग होता. पिंपरी-चिंचवड, वानवडी, खडकीमधले औद्योगिक पट्टे होते. पुणं हळूहळू वाढायला लागलं होतं. आज पुणे परिसरातला जो जो भाग "पॉश एरिया' असल्याचं आपल्याला दिसतं, तिथं तिथं त्या वेळी शेतजमिनी होत्या किंवा गायरानं होती. जिल्ह्यात काम करताना सामान्यतः दहा हजार चौरस किलोमीटरहून अधिक परिसरावर पोलिसांना लक्ष ठेवावं लागतं. हा मुद्दा लक्षात घेता पुणे शहरातला आमच्या हद्दीतला भाग विस्तारानं मोठा असला तरी कामाच्या दृष्टीनं बराच कॉम्पॅक्‍ट होता. काम करणारे सोबतचे कर्मचारी चांगले होते, प्रशिक्षित होते. ते अधिक दक्ष असायचे. शिवाय, अंतरंही फार मोठी नव्हती. पटापट हालचाली करणं सहजशक्‍य व्हायचं. सहायक आयुक्त (एसीपी), पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांची संख्याही मोफसिलपेक्षा - म्हणजे ग्रामीण भागांपेक्षा - जास्त असल्यानं मध्यम आणि त्याखालच्या स्तरावरचा कारभार, नियोजन, समन्वयही बरंच चांगलं होतं. त्यामुळे काम करायला हुरूप यायचा आणि काम चांगलं झालं पाहिजे, असा कटाक्षही असायचा.

झोनचा उपायुक्त म्हणून मला रोज एका पोलिस ठाण्याला भेट द्यावी लागत असे. रोजचे गुन्हे, तपास न झालेल्या प्रकरणांची, प्रलंबित असलेल्या तपासांची वास्तपुस्त, लोकांच्या तक्रारी, म्हणणं ऐकून घेणं आणि इतर कामांत प्रत्येक ठाण्यात मी रोज दोन ते तीन तास घालवायचो. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्या त्या ठाण्याच्या एकूण कामाची सविस्तर माहिती असायची.
पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातलं नियंत्रणकक्ष म्हणजे संपूर्ण आयुक्तालयाची चेतासंस्थाच. संपूर्ण शहरातल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या, महत्त्वाच्या संदेशांची देवाण-घेवाण करणाऱ्या या यंत्रणेकडूनच रात्रभरात घडलेले गंभीर गुन्हे, शिवाय दिवसभरात काय काय घडू शकेल याची माहिती उपायुक्त आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोज सकाळी दिली जायची. नियंत्रणकक्षाच्या प्रमुखाकडून येणाऱ्या या माहितीमुळे पुढच्या दिवसाचं योग्य वेळेत नियोजन करणं शक्‍य व्हायचं.
तो 1978 चा सप्टेंबर महिना होता. एक दिवस अगदी भल्या सकाळी नियंत्रणकक्षातून फोन आला ः "सर, लष्कर भागात अमुक एका रस्त्यावर एका इराणी कुटुंबाच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. छतावरची कौलं काढून घरात शिरून चोरट्यांनी एका किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. त्या भागातले पोलिस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पोचले आहेत. एसीपीही पोचले आहेत.'

"मीही येतोच आहे,' असं सांगत मी माझ्या ड्रायव्हरला आणि वायरलेस ऑपरेटरला तयार व्हायला सांगितलं. ते घर माझ्या घरापासून जवळच असल्यानं मला पोचायला फार वेळ लागला नाही. मी पोचलो तेव्हा लष्कर उपविभागाचे एसीपी, लष्कर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, क्राईम ब्रॅंचचे अधिकारी घरातल्या लोकांकडून माहिती घेत होते. पुण्याच्या कॅम्प भागात त्या काळात विशिष्ट बांधणीचे बंगले असायचे. एकमजली, कौलारू. बंगल्याचं आवार प्रशस्त असायचं. आत येण्या-जाण्याचा अर्धवर्तुळाकार मार्ग आणि एक प्रशस्त व्हरांडा. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंना एकेक खोली, मग एक मोठा हॉल. एका छोट्या कॉरिडॉरमधून पुढं गेलं की दोन बेडरूम्स. त्यांची दारं बाहेरच्या बाजूला उघडायची. आजही असे काही बंगले कॅम्प भागात पाहायला मिळतात.
या दोन बेडरूम्सपैकी उजव्या बाजूच्या खोलीत चोरी झाली होती. बाहेर उघडणाऱ्या दारातून चोरट्यांनी त्यांच्या बाकीच्या साथीदारांना खोलीत घेतलं असणार. छपराची कौलं काढून आत शिरण्यासाठी केलेली जागा एखाद्या प्रौढ व्यक्तीला आत शिरायला लागणाऱ्या जागेच्या तुलनेत अगदीच लहान होती. तिजोरी भिंतीतल्या कपाटात होती आणि त्या तिजोरीची किल्ली तिथंच त्या कपाटातच असायची. चोरट्यांनी ती किल्ली घेऊन तिजोरी उघडून दागिने आणि रक्कम पळवली होती. या सगळ्यात पोलिसांना कोड्यात टाकणारी एकच बाब होती व ती म्हणजे कौलं काढून आत उतरायला केलीली जागा. ती फारच लहान होती.

घरमालक अब्दुलशेठ यांचे वडील तीनेक दशकांपूर्वी इराणहून येऊन पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांनी लष्कर भागातच अगदी मोक्‍याच्या ठिकाणी एक इराणी कॅफे उघडलं होतं. थोड्याच काळात त्यांच्या व्यवसायाचा जम बसला होता. कॅफे अगदी पहाटे लवकर उघडल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तिथं गर्दी असायची. त्यांच्याकडचा खास इराणी मेनू, केक आणि अन्य पदार्थही खवैयेमंडळींमध्ये फार प्रसिद्ध होते.
इतकी रोख रक्कम आणि दागिने त्यांनी असे घरात का ठेवले होते, हे आणखी एक कोडं होतं.

अब्दुलशेठ यांच्या तरुण मुलाशी बोलताना त्याचा उलगडा झाला. अब्दुलशेठ आणि त्यांचं बहुतेक सगळं कुटुंब भारतात स्थायिक झालं असलं तरी त्यांच्या मुली मात्र विवाहानंतर इराणमध्येच स्थायिक होत्या. त्या काळात इराण खूपच अस्वस्थ परिस्थितीतून जात होता. या मुलाचा मेहुणा इराणच्या लष्करात अधिकारी होता. राजकीय अशांततेच्या काळात त्याची बहीण मुमताज सगळे दागदागिने घेऊन भारतात आली होती; जेणेकरून त्या कुटुंबाची संपत्ती इथं सुरक्षित राहील. तिकडं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर ती परतणार होती. त्यामुळे तिजोरीत जवळपास दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते आणि ते चोरीला गेले होते. अब्दुलशेठ, त्यांची पत्नी, मुलगा आणि सगळ्याच कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला होता. सगळ्यात हवालदिल झाली होती ती मुमताज. कारण, तिच्या सासरच्यांचे दागदागिने चोरीला गेले होते. त्या रात्री मुमताज बहिणीच्या खोलीत झोपली होती. पहाटे तिच्या खोलीत आल्यानंतर तिला कपाट उघडं दिसलं. आरडाओरड्यानं घरातल्या इतरांना जाग आली. घरातल्या इतरही लोकांशी आम्ही बोललो. त्यांना धक्का बसला होता; पण आम्हाला तपासाला मदत होऊ शकेल अशी काहीच माहिती त्यांच्याकडून मिळाली नाही.

आम्ही घरातल्या इतर खोल्यांची, घराच्या परिसराची तपासणी केली. चोरट्यांनी मागं ठेवलेल्या खुणा, हाता-पायांचे ठसे मिळतात का त्याचा शोध घेतला; पण काहीच हाताला लागलं नाही. फोरेन्सिक टीमही आली होती. अजूनही छतावरची कौलं काढून आत उतरण्यासाठी केलेली ती लहानशी जागा आम्हाला खटकत होती. चोरी खरंच झालीय का? की दागिन्यांचा विमा होता आणि त्या रकमेसाठी हा बनाव घडवून आणला होता, असेही प्रश्न आमच्या मनात होते. आम्ही घरातल्या लोकांकडं याबाबत विचारणा केली. आमचं संशय घेणं त्यांना रुचलं नाही; पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दागिन्यांचा विमाही उतरवलेला नव्हता. दरम्यान, "छतावर चढून कौलं काढून केलेल्या छिद्रातून खाली उतरता येतं का पाहा' असं मी एका तरुण कॉन्स्टेबलला सांगितलं. आश्‍चर्य म्हणजे, नुकताच भरती झालेला तो तरुण कॉन्स्टेबल सहजपणे, कुणाच्याही मदतीशिवाय छतावरून खोलीत उतरला. तो उतरत असताना कोणताही आवाजही झाला नाही. म्हणजे चोरी झाल्याचीच शक्‍यता अधिक होती आणि आम्हाला गुन्हेगार शोधायचे होते. तिथल्या तिथंच, आम्ही सराईत घरफोड्यांची एक छोटी यादी केली आणि त्यांना शोधून काढण्याची कामगिरी काही लोकांवर सोपवली. गुन्हे करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणारा मोडस ऑपरेंडी ब्यूरो (एमओबी) असा एक पोलिसांचा विभाग असतो. आणखी एका टीमला एमओबीकडून काही माहिती मिळते का ते पाहायला सांगितलं. दोन जणांना काही खबऱ्यांना भेटून यायला सांगितलं. काही तासांनी या सगळ्यांनी माहिती घेऊन माझ्या कार्यालयात भेटायचं असं ठरलं...
(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com