दूर कोण जातंय? मोदी की संघ?

Rahul Gandhi, Mohan Bhagwat, Narendra Modi
Rahul Gandhi, Mohan Bhagwat, Narendra Modi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) स्वयंसेवक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना झाले आहे तरी काय? 2014च्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी, राम मंदिर उभारणारा, अल्पसंख्यांकाचा विरोधक आणि विकासपुरुष अशी ओळख निर्माण करणाऱ्या मोदींनी या सगळ्याच मुद्द्यांचा विसर पडला आहे. ज्या संघाच्या जीवावर भाजपने मोदींचा चेहरा समोर करून निवडणुका लढल्या आज तोच संघ भाजपला घरचा आहेर देताना दिसत आहे. तर, दुसरीकडे भाजपचे 'हिंदुत्व' हा आत्माच चोरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून धडाक्यात सुरु आहे. एकंदर काय तर एकमेकांपासून दूर कोण जातय? मोदी की संघ? हाच प्रश्न पडतो.

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवराष्ट्र निर्मितीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत चक्क काँग्रेसचेच गुणगान गायले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात काँग्रेस नेत्यांचे योगदान विसरता येणार नाही, असे स्पष्ट बोलून त्यांनी मोदींना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सतत काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या आणि गेल्या 60 वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या मोदींना भागवतांनी काँग्रेसचा देशाच्या इतिहासात किती मोलाचा वाटा आहे, हे समजावून सांगितले. पण, मोदी आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या अमित शहा यांना यातून काय घ्यावे आणि काय नाही हे कळावे. देशभरातील हिंदू विचारसरणीच्या लोकांना एकत्र बोलावून नवराष्ट्र निर्मितीसाठी सुरु असलेल्या संकल्पात काँग्रेसचा विषय निघणे आणि त्यांच्या योगदानाबाबत चर्चा होणे, यातच मोदींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत.

हिंदुत्वच हिरावतेय
ज्या हिंदुत्वाच्या जिवावर भाजपने आतापर्यंत आपली राजकीय खेळी खेळली. आता तेच त्यांच्यापासून हिरावल्याचे देशात चित्र आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे झालेले तुकडे. वैयक्तीक वैरामुळे प्रवीण तोगडीया सारख्या हिंदुत्ववाद्याला दूर करत मोदी आणि शहा यांनी त्यांच्यात दोन गट पाडले. तोगडीयांनी तर मोदींविरोधात उघडपणे वक्तव्ये केली आहे आणि राम मंदिराची आठवण करून दिली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर सतत भाजपला प्रश्न केले जातात. पण, मोदी आणि शहा यांच्याकडून याबाबत एकदाही ठोस उत्तर दिले जात नाही. मुद्दा न्यायालयात आहे, हे ठरलेले उत्तर निश्चित आहे. आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा हा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे, अन् 2019 मध्येही भाजपचा राम मंदिर हाच अजेंडा असेल असे दिसते. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिर भेटी देत देवदर्शनाचा धडाकाच लावला आहे. जानवेधारी हिंदू असल्याचे स्पष्ट कबूल करणारे राहुल गांधी मानस सरोवर यात्रेला जाऊन काय येतात आणि तेथून आणलेले पवित्र जल राजघाटावर अर्पण काय करतात. यातून स्पष्ट होतय की भाजपचा आत्मा असलेल्या हिंदुत्वाचा मुद्द्यावरून जनतेचे लक्ष भटकवायचे. पण, जनता यावरून किती विश्वास ठेवेल हा सुद्धा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. गोहत्यांवरून जमावाकडून होत असलेल्या हत्यांवरून भाजपला आगोदर खिंडीत पकडलेले आहे.

काँग्रेस आणि संघ
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. संघाची द्वेष पसरवण्याची वृत्ती आपल्याला हटवायची आहे, असे सतत सांगणाऱ्या राहुल गांधींनी संघाकडून संघटन शिकण्यासारखे आहे, असे मत अचानक बदलले आहे. राहुल गांधी आता भर कार्यक्रमात संघाच्या संघटन आणि झोकून देण्याच्या वृत्तीबाबत आपल्या कार्यकर्त्यांना सल्ले देताना दिसत आहेत. संघाचा गाभा असलेल्या ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशात विशेष मोहिम आखली आहे. एवढंच काय तर ज्या कार्यक्रमात भागवतांनी काँग्रेसच्या योगदानाचा उल्लेख केला, त्या कार्यक्रमात राहुल गांधींनाही बोलविणार याचीही देशभर चर्चा झाली होती. आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या मोदींच्या दाव्यांबाबत संघ नेत्यांनाही उत्तरे देताना अडचण येते, हेच दिसते. मग ते अच्छे दिनचे का असो. 

एकंदर काय तर संघाला गृहित धरण्याचा भाजपचा भ्रम आता संघाकडूनच तर पुसला जात नाही ना? काँग्रेसची स्तुती करून संघ एकप्रकारे भाजपला इशारा तर देत नाही ना? काँग्रेस का वळतेय हिंदुत्वाकडे? बहुमत असतानाही मोदी का उभारू शकत नाहीत राम मंदिर? असे आणि अजून काही प्रश्न आहेत की ज्यामुळे दूर कोण जातंय? संघ की मोदी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com