गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

samir abhyankar
samir abhyankar

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं असावं, असं मला नेहमी वाटतं.

शास्त्रीय गायनाची पिढीजात परंपरा लाभायला खरचं खूप भाग्य लागतं. आमच्याकडं शास्त्रोक्त गायनाचा वारसा चार पिढ्या चालत आलेला आहे, हे माझं भाग्यच. माझे आजोबा एस. के. अभ्यंकर हे डोंबिवलीचे पहिले शास्त्रीय गायक. या शहरात त्यांनी खऱ्या अर्थानं शास्त्रीय संगीताचं बीज रोवलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. माझ्या लहानपणी आजोबांचं गाणं, त्यांच्या शिकवण्या, माझ्या वडिलांचं गाणं व थोर कलाकारांची असंख्य ध्वनिमुद्रणं सतत माझ्या कानांवर पडत होती. थोडक्‍यात, शास्त्रीय संगीत माझ्यात भिनत जाण्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण घरी होतं. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच माझ्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार होत गेले व मी एक गायक म्हणून घडू लागलो. आजकाल लहान मुलांची जशी मालिकांची शीर्षकगीतं ऐकून ऐकून पाठ होत जातात, तसेच शास्त्रीय संगीतातले अनेक ख्याल ऐकून ऐकून माझे पाठ होऊ लागले. रागांची नावं त्या वेळी माहीत असतील वा नसतील; पण ख्याल/बंदिशींचे शब्द माझे तोंडपाठ असत. मात्र, प्रत्यक्षात समोरासमोर बसून माझं गाण्याचं शिक्षण जे सुरू झालं ते वयाच्या नवव्या वर्षी.

घरात गाणं होतं आणि त्यात मला गतीही होती; पण त्या लहान वयात कुठंतरी मित्रांबरोबर खेळणं मला जास्त प्रिय होतं. त्यामुळे आजोबांकडं मी थोडा मोठा झाल्यावर गाणं शिकणं सुरू करावं, असं माझ्या बाबांचं मत होतं; परंतु माझ्या आईला असं वाटे की घरात गाणं आहे, माझा आवाज चांगला आहे, मला गतीही आहे तर जितक्‍या लहान वयात शिक्षणाला सुरवात होईल तितकं चांगलं. म्हणून मग आमच्या अगदी घराजवळ पाटणकरबाई राहत होत्या, त्यांच्याकडं माझं गाण्याचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. जसा शिकायला लागलो तशी आवड/गोडी निर्माण होत गेली. त्यांच्याकडं सुरवातीला काही काळ गाण्याचे प्राथमिक धडे घेतल्यावर मग माझ्या आजोबांकडं माझी तालीम सुरू झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझं गायकीचं शिक्षण सुरू झालं असं मी म्हणेन. माझे आजोबा हे विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य असल्यानं आपसूकच ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळू लागली. मात्र, असं असलं तरी त्यांना कट्टर घराणेशाही मान्य नव्हती. ते मला नेहमीच स्वतःच्या विचारानं गाणं वाढवायला प्रवृत्त करत. ते मला नेहमी एक गोष्ट सांगत ः ""समीर, सर्व घराण्यांच्या कलाकारांचं गाणं ऐकत जा आणि जे जे तुला भावेल आणि झेपेल त्याचा त्याचा तुझ्या मूळ गाण्याच्या साच्यामध्ये समावेश करत जा.'' ही गोष्ट अजूनही माझ्या मनावर कोरलेली आहे व सदैव राहील. गाण्याकडं पाहायचा जो माझा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे तो या शिकवणीचाच द्योतक होय.

आजोबांकडं मी बरीच वर्षं शिकलो. पुढं गांधर्व महाविद्यालयाच्या "संगीत-अलंकार' परीक्षेचं शिक्षण घेत असताना मुकुंद थत्ते यांच्यासारखी अतिशय विद्वान व अभ्यासक व्यक्ती मला गुरू म्हणून लाभली. त्यांच्याकडून मला अनेक अनवट राग अतिशय शुद्ध स्वरूपात शिकायला मिळाले. आमची तेव्हा जी नाळ जुळली ती आजतागायत कायम आहे. आजही ते वयाच्या 86 व्या वर्षी गातात व मी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. गाण्याचं शिक्षण सुरू असताना माझं वाणिज्य शाखेचं शिक्षणही सुरू होतंच. आधी माझं बीकॉम पूर्ण झालं, मग "संगीत-अलंकार' झालं. त्यानंतर एमकॉम पूर्ण झाल्यावर मी एमए (संपूर्ण संगीत विषय घेऊन) विशेष श्रेणीमध्ये पूर्ण केलं. "संगीत-अलंकार'चं शिक्षण पूर्ण झाल्यावर यशवंतबुवा जोशी यांच्याकडं मला काही वर्षं शिकायला मिळालं हे माझं मोठं भाग्य. बुवांकडं शिकायला लागल्यावर माझ्या गाण्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. "मैफलीचा कलाकार' म्हणून माझा आत्मविश्वास वाढला आणि माझ्या गाण्याला वेगळी दिशा मिळाली...
बऱ्याच वर्षांच्या तालमीनं व अथक रियाजानं माझं गाणं तयार होत गेलं. हळूहळू माझे गाण्याचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. लोकांचा प्रतिसादही छान मिळत होता. एकीकडं गाण्याचं शिक्षण सुरू होतंच. शास्त्रीय संगीतात करिअर करायची खूणगाठ मी मनाशी पक्की बांधली होती; परंतु आमच्या घराण्यात संगीत चार पिढ्या असलं तरी हा पूर्ण वेळचा पोटापाण्याचा व्यवसाय कुणीही पत्करला नव्हता. त्यामुळे मीही आधी नोकरी करून गाणं करायचं ठरवलं होतं. तशी एके ठिकाणी काही महिने नोकरीही करून पाहिली; पण मी काही तीत रमलो नाही आणि मग ठरवूनच टाकलं, की आता मी संगीत हा पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणूनच करेन.

सन 2002 पासून मी शास्त्रीय संगीत पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणून करू लागलो. फक्त कार्यक्रमाच्या मानधनावर मला अवलंबून राहायचं नव्हतं म्हणून मी कार्यक्रम करण्याबरोबरच गायनकला शिकवायला सुरवात केली. आधी दोन वर्षं मी वाशी इथल्या गांधर्व महाविद्यालयात, तसंच डोंबिवलीतल्या एका खासगी क्‍लासमध्ये जाऊन शिकवलं व सन 2004 मध्ये मी माझी स्वतःची "आरोही संगीत अकादमी' सुरू केली. ही अकादमी माझ्या घराला लागूनच आहे. तिथं शास्त्रीय गायनाबरोबरच तबलावादनाचं व हार्मोनिअमवादनाचा शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. आज तिथं अनेक विद्यार्थी घडत आहेत. गेली 16 वर्षं गायनाचे कार्यक्रम करणं आणि गायनाचं अध्यापन करणं या दोन्ही गोष्टी माझ्या अविरत सुरू आहेत. गायन शिकवताना आपणही त्या प्रक्रियेत बरंच काही शिकत जातो याची जाणीव मला होत गेली. आजवरच्या प्रवासात मी मानाच्या अनेक व्यासपीठांवरून माझी कला लोकांसमोर मांडली आहे. उदाहरणार्थ ः कुंदगोळच्या "सवाई गंधर्व महोत्सवा'त एकदा, तर ठाण्यात "पं. राम मराठे स्मृती संगीतसमारोहा'त माझं गायन दोनदा झालं आहे. "पंचम-निषाद क्रिएटिव्हज्‌ या संस्थेतर्फेही माझ्या गाण्याचा कार्यक्रम आयोजिला गेला होता. "शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान'तर्फे आयोजिल्या गेलेल्या गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवातही माझं गाणं झालं. मुंबईच्या "चतुरंग प्रतिष्ठान'तर्फे आयोजित कार्यक्रमात मी दोन वेळा माझं गायन सादर केलं.

प्रत्येक वेळी रसिकांकडून मिळणारं प्रेम व प्रतिसाद पाहून मी भारावून जातो. आपण सादर करत असलेली कला रसिकश्रोत्यांपर्यंत पोचत आहे, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे हे पाहून मलाही आनंद आणि समाधान मिळतं.
गेल्या वर्षी माझा विदेशात ब्रिटनमध्ये गायनाच्या कार्यक्रमांचा दौरा झाला तेव्हा तिथंही मला दर्दी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय रागगायनाबरोबरच ठुमरी, नाट्यसंगीत, अभंग व भजन हे सर्व उपशास्त्रीय प्रकारही मी नेहमीच माझ्या कार्यक्रमांमध्ये गात असतो. Youtube वर
माझ्या अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. INSYNC या शास्त्रीय संगीतावर आधारित वाहिनीवरही माझं सुमारे एक तासाचं शास्त्रीय गायनाचं सादरीकरण झालेलं आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण वरचेवर होत असतं. "राग रत्नमाला' ही रागसमयानुसार गायिलेल्या सहा राग-रागिण्यांच्या बंदिशी असलेली सीडीही माझ्या नावे आहे.
आजवर अनेक पुरस्कारांनी माझा सन्मान झाला असला तरी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या तर 1) करवीर पीठ, कोल्हापूर इथं आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त दोन वेळा गायन सादर करण्याचा मान मला मिळाला. माझ्या योगदानाबद्दल शंकराचार्यांकडून त्या वेळी माझा सन्मान करण्यात आला.

2) पंडित डी. व्ही. पलुस्कर यांच्या जीवनावर आधारित डॉक्‍युड्रामामध्ये खुद्द पलुस्करांच्या भूमिकेसाठी मी पार्श्वगायन केलं आहे. आजवरच्या कारकीर्दीतला हा माझ्यासाठी सर्वात मोठा बहुमान आहे, असं मला वाटतं.
आज वयाच्या अडतिसाव्या वर्षी मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या कृपेनं, आई-वडिलांच्या आशीर्वादानं, कुटुंबाच्या भक्कम साथीनं व रसिक-श्रोत्यांच्या प्रेमामुळे. ज्यांनी मला भरभरून विद्या व कला तर दिलीच; पण गाण्याकडं पाहायची दृष्टीसुद्धा दिली, असे ऋषितुल्य गुरू मला लाभले हे माझं मोठंच भाग्य. या गुरूंनी अनेक राग, अनेक ख्याल अगदी शुद्ध स्वरूपात मला शिकवले. मात्र, "माझ्यासारखंच गा' असं मला माझ्या कुठल्याच गुरूनं कधीच सांगितलं नाही. सर्व गुरूंनी मला कायमच मोकळीक दिली व एक स्वतंत्र गायनाची शैली विकसित करण्यासाठी सदैव प्रेरित केलं.

मैफलीत नेहमीच निरनिराळे राग, वेगवेगळे ख्याल/बंदिशी गाण्यावर माझा भर असतो. शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं असावं असं मला नेहमी वाटतं. माझी कला सादर करताना माझा नेहमी तोच प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी मी व्यासपीठावर गायला बसतो तेव्हा जास्तीत जास्त चांगलं गाणं लोकांना ऐकवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मग समोर श्रोतृगण पन्नासचा असो की पाच हजारांचा असो. खूप प्रतिष्ठेचं मोठं व्यासपीठ असो वा दर्दी श्रोत्यांसमोर घरगुती बैठक असो, मी नेहमीच मनापासून व प्रामाणिकपणे माझी गायनकला श्रोत्यांपुढं मांडत राहतो. त्यांना मिळणारा आनंद पाहून मी भरून पावतो.

आजपर्यंत जे काही मी साधलं आहे त्यात अनेकांचा वाटा आहे. मात्र, त्यात मोलाचा वाटा माझ्या आईचा आहे. खूप केलं तिनं माझ्यासाठी. तिनं जर लहान वयात माझं गाण्याचं शिक्षण सुरू केलं नसतं तर कदाचित आज मी या क्षेत्रात पूर्ण वेळ नसतो. मी त्यासाठी तिचा आजन्म ऋणी राहीन. माझ्या बाबांचीही माझ्या करिअरमध्ये खूप मोठी भूमिका आहे. काय सांगू त्यांच्याबद्दल? माझे सर्वात मोठे टीकाकार, तसंच सर्वात मोठे चाहते म्हणजे माझे बाबाच...माझ्या जवळपास 99 टक्के मैफलींचे ते साक्षी आहेत. त्यांनी माझ्या कारकीर्दीतले अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ते कायमच माझ्या पाठीशी भक्कम उभे राहत आले आहेत व ते मला सदैव प्रोत्साहित करत असतात.

जे काही मला माझ्या गुरूंकडून मिळालं आहे, ते माझ्या शिष्यांना देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशानं मी
'Journey through Raagas' या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून विविध राग-रागिण्यांवर शक्‍य तितक्‍या सोप्या शब्दांत माहिती शब्दबद्ध करून शेअर करत असतो. रागांविषयीच्या माझ्या या लेखांना सर्वसामान्य रसिकश्रोत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पाहून खूप बरं वाटतं. कारण, जितकं जास्त रागसंगीत लोकांना समजू लागेल, तितके ते या कलेचा अधिक चांगल्या तऱ्हेनं रसास्वाद घेऊ शकतील, याची मला खात्री आहे. त्यासाठी भविष्यात मैफलींच्या जोडीनं लेक्‍चर-कम-डेमॉन्स्ट्रेशनच्या कार्यशाळा घेण्याचाही माझा मानस आहे.

अजून बरंच काही प्राप्त करायचं आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे...माझी गायनकला उत्तरोत्तर आणखी जास्त वृद्धिंगत होत राहो, हीच इश्वर चरणी प्रार्थना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com