न थकलेला बाबा (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी सतत कार्यमग्न राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य.

आज ज्या व्यक्तीविषयी मी लिहिणार आहे, त्या व्यक्तीचं "गणगोत' जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. कुणी त्यांना "पुरीझम' म्हणतात, कुणी "पुरी सर' म्हणतात; तर कुणी "पत्रकारांचा "बाप' ' म्हणतात, तर कुणी म्हणतात "पुरी बाबा'. या अनेक संबोधनांपैकी "बाबा' या नावानंच ते जास्तकरून ओळखले जातात. बाबांचं वय आज सत्तरीकडं झुकलेलं आहे. बाबांनी आजवर महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानलं आणि तोच जिव्हाळा घेऊन ते आता आंध्र प्रदेशाकडं आणि इतर राज्यांकडं वळले. तोच उत्साह, तीच ऊर्जा, तीच काम करण्याची पद्धत टिकवत बाबा
आपल्या कामाची पताका खांद्यावर घेऊन फिरताना आजही दिसतात.
सन 1980 ते 2010 हा काळ. प्रा. सुरेश पुरी सर ऊर्फ बाबा हे "जबराट' जनसंपर्क असलेले पत्रकारितेच्या शाळेतले हेडमास्तर. आपल्या पत्रकारितेच्या 30 वर्षांच्या कालावधीत चार हजारांपेक्षा जास्त जणांचं पालकत्व स्वीकारून, त्या मुलांचं शिक्षण, नोकरी आणि संसार मार्गी लावून देणारा हा "बाप'माणूस. घरा-दाराची तमा न बाळगता, केवळ आपले शिष्य उभे राहिले पाहिजेत, हेच या बाबांचं ध्येय. उच्च शिक्षण तर घ्यायचंय; पण चटणी-भाकरीला महाग, अशा परिस्थितीत जगणाऱ्या विद्यार्थ्यांचे बाबा हे एकमेव वाली. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा'चा पत्रकारिता विभाग विद्यार्थ्यांनी दिवसभर गजबजलेला असायचा आणि हीच मुलं रात्री बाबांच्या घरी मुक्कामी असायची. बाबांसारखा एक पाठिराखा माणूस वर्गात प्राध्यापकाची आणि घरी बापाची भूमिका पार पाडायचा. मुलं सणावारालाही आपापल्या घरी जायची नाहीत. कारण, बाबांना सोडून सण साजरा करायची कल्पनाही त्यांना नकोशी वाटायची. माणसं सर्वस्वी घडवणं म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबा. त्यांचं घर आत्ता अलीकडं झालं आहे. बायको, मुलगी, मुलगा, नातू, सून, जावई असा त्यांच्या मोठ्या कुटुंबाचा वेलू अगदी मांडवाला गेला. "तुम्ही कमावलेला सारा पैसा इतर मुलांवर का खर्च करता,' असं कधी त्यांना काकूंनी विचारलं नाही की घरच्या अन्य कुण्या व्यक्तीनंही विचारलं नाही. इतके दिवस स्वतःचं घर नसलेल्या बाबांची आज महाराष्ट्रभरात तर सोडाच; पण देशात आणि परदेशातही मोजता येणार नाहीत एवढी घरं - त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून - आहेत. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टींचा संबंध कधी बाबांनी येऊ दिला नाही. बाबांचे सहकारी प्रा. सुधीर गव्हाणे हे "यशवंतराव चव्हाण विद्यापीठा'चे कुलगुरू झाले, दुसरे सहकारी प्रा. वि. ल. धारूरकर "त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठा'चे कुलगुरू झाले. बाबांनी मात्र पहिल्यांदा आपल्या गोतावळ्याला प्राधन्य दिलं. गव्हाणे सर आणि धारूरकर सर यांचाही बाबांवर फार जीव. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोघांचाही फार आधार वाटायचा. त्यासाठी त्या दोघांनाही सलाम करावा लागेलच. हे दोघंही उत्तम गुरूची उदाहरणं आहेत. मात्र, बाबांनी गुरू-आई-वडील अशी तिहेरी भूमिका विद्यार्थ्यांबाबत पार पाडली. प्राध्यापक म्हणून रुजू होताना पत्रकारितेचे विद्यार्थी नुसते घडवणं नव्हे; तर त्यांना त्यांच्या पायावर आयुष्यभरासाठी उभं करणं, हेच ध्येय असणाऱ्या बाबांचा दुसरा एक छंद होता व तो म्हणजे हिंदीच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा. ते सेवानिवृत्तीनंतर हिंदीच्या कामाला पुन्हा अधिक जोमानं लागले. या माध्यमातून विद्यार्थी उभे करण्याचं काम त्यांनी अजूनही सुरू ठेवलं आहे. बाबांच्या घरात राहून वाढलेल्या अनेकांना आज माहीत नसेल की आपला "बाप' सेवानिवृत्तीनंतर काय करत आहे? "बाबा हैदराबादला हिंदीचं काहीतरी काम करतात,' एवढीच जुजबी माहिती त्यांना असेल; पण त्या सर्वांना धक्का बसेल असं काम तिथं होत आहे. दर वर्षी किमान एक लाख मुलं शिकून-सवरून तिथून बाहेर पडतात. अनेक जण "हिंदी पंडित' म्हणून कारकीर्द सुरू करतात. आयुष्याच्या पटलावर इथले अनुभव सोनेरी अक्षरांनी लिहितात. दुसरा एक धक्का म्हणजे, बाबांचं तिथलं पद आहे "प्रधानमंत्री'! "हिंदी प्रचारसभेचे सरचिटणीस' या पदाला "प्रधानमंत्री' असं म्हटलं जातं. निवडणुकीच्या माध्यमातून ही व्यक्ती निवडली जाते. देशातली सर्वात मोठी संस्था म्हणून या संस्थेकडं पाहिलं जातं.

बाबांच्या रूपानं कुणीतरी मराठी माणूस पहिल्यांदाच या पदावर बसला आहे. इतरांचं पालकत्व स्वीकारण्याच्या त्यांच्यामधल्या संस्कारांनी त्यांना तिथंही शांत बसू दिलं नाही. अहिंदीभाषकांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार व्हावा, यासाठी सन 1935 मध्ये हिंदी प्रचारसभांची सुरवात झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्र या चार राज्यांत हिंदीचा केवळ प्रसार आणि प्रचार करून प्रमाणपत्र देण्यापुरतंच हे काम मर्यादित नसून, "हिंदी पंडित' निर्माण करण्याचंही काम संस्थेतर्फे हाती घेतलं जातं. त्यासाठी स्वतंत्र दहा महाविद्यालयं कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी आज बाबांच्या या चळवळीच्या माध्यमातून आपलं आयुष्य घडवत आहेत. आता सर्वांचे बाबा "प्रधानमंत्री' झाले आहेत! जेवढी मुलं बाबांच्या औरंगाबादच्या घरी मुक्कामी राहायची तेवढीच; किंबहुना त्यापेक्षा जास्त मुलं आज बाबांकडं नामपल्ली (हैदराबाद) इथं मुक्कामी असतात. जे वातावरण औरंगाबादच्या विद्यापीठात होतं, त्याचा "भाग नंबर दोन' नामपल्लीमध्ये पाहायला मिळतो. पत्रकारिता हे केवळ व्रत म्हणून चालवायचा तो काळ होता. जेमतेम पगार आणि सतत परीक्षा पाहणारा तो काळ. अशा पडत्या काळात बापाची कमतरता भरून काढणारा माणूस ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला आला, त्यांच्या त्यांच्या आयुष्याला "चार चॉंद' लागले. अनेकांना उच्च शिक्षणासाठी मदत, त्यांच्या नोकरीसाठी शब्द टाकणं आणि संसारासाठी "हात' अशा अनेक आघाड्यांवर बाबा एकटे लढायचे. बाबांचा आणि काकूंचा तो उत्साहानं सुरू असलेला प्रवास आम्ही अनेकांनी खूप जवळून अनुभवलाय. दर आठवड्याला बाजारातून चार-पाच पिशव्या भरतील एवढा भाजीपाला घ्यावा लागत असे. एक पिशवी बाबांच्या घरी आणि बाकी सर्व पिशव्या इतर विद्यार्थांच्या "संसाराला हातभार' लावण्यासाठी काकू स्वतः घेऊन जायच्या. बाबांचा पगार झाल्यावर सर्व देणेकऱ्यांची देणी देता देता आठ दिवसांत खिसा कधी "ठणठण गोपाला' व्हायचा कळायचं नाही. स्वतःच्या मुलीच्या गळ्यात केवळ काळ्या मण्यांची "पोत' घालणारा हा माणूस अनेक विद्यार्थी जोडप्यांची लग्नं लावताना, मुलींना साडी-चोळी करताना मात्र कधी मागं-पुढं पाहायचा नाही. विद्यापीठातलं ते घर म्हणजे अमूल्य संस्कारांचं आणि जिव्हाळ्याचं माहेरघर होतं. त्या घराला कधीही कुणाची नजर लागली नाही. कारण, एकमेकांच्या प्रेमात आणि सुखात इथल्या "जाचक' हवेचा सूरही बदलायचा...!

बाबांचा शोध घेत मी नामपल्ली स्टेशनला सकाळी सकाळी उतरलो. तेवढ्या सकाळीही सगळे जण वरण-भातावर ताव मारत होते. आजूबाजूला नजर जाईपर्यंत वरण-भात खाण्यासाठी जणू बाजार भरलाय, असं वातावरण. मी येणार असल्याची बाबांना पुसटशी कल्पना दिली होती. स्वागताला येणाऱ्या तरुणांची संख्या खूप मोठी होती. त्यातला रजनीकांत मला म्हणाला ः ""तुमच्या लग्नाचा किस्सा आम्ही सरांकडून ऐकला.'' तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपली "बिरादरी' आहे. माणसाचा जो पिंड असतो तो कधी बदलत नाही; मग त्या माणसाला कुठंही नेऊन टाका, तो आपलं काम सुरूच ठेवतो. बाबंनी तेच केलं. जास्तीत जास्त मुलं आयुष्यात उभी कशी राहतील, याचा प्रत्यक्ष प्रयोग बाबांनी घर-दार सोडून हैदराबादसह चार राज्यांत सुरू केला आहे. तिथंही त्यांना "सर' म्हणणारे कमी आणि "बाबा' म्हणणारेच जास्त. हे चित्र पाहून मला औरंगाबादची जुनी आठवण आली. प्रसंगी एकटा असताना मनसोक्तपणे रडणारा हा माणूस दिवसभर मात्र येणाऱ्या प्रत्येकाचं न थकता हसून स्वागत करतो. कुठून येते एवढी ऊर्जा, हा प्रश्न मला काही वर्षांपूर्वी पडला होता, तो आजही नामपल्लीला आल्यावर कायम होता. त्यांची ती ओळख करून द्यायची स्टाईल, गेल्या गेल्या दोन केळी हातात देणं आणि घरच्यांची आस्थेनं विचारपूस आजही कायम आहे. इथं कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलणारे विद्यार्थी होते. त्या सर्वांची भाषा बाबा शिकले. ऑफिस आणि घर यांच्या अगदी जवळच कॉलेज आणि होस्टेलही. एकत्र कुटुंबासारखं वातावरण आणि या कुटुंबाचे प्रमुख पुरी बाबा. ते सगळ्यांच्या गळ्यातले ताईत.

मुलांचा सर्वाधिक वेळ बाबांबरोबरच जातो. अभ्यास कसा करायचा, यापेक्षा व्यवहारात कसं पुढं राहावं याचे धडे सर या मुलांना देतात. सगळी मुलं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, शून्यातून आलेली अन्‌ आता सरांच्या सान्निध्यात आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्नं पाहणारी.

रात्री झोपी जाण्याआधी आमच्या गप्पा सुरू झाल्या. सगळा कामाचा इतिहास आणि त्याभोवती असणारा भूगोल बाबांनी मला एका दमात सांगितला. त्यावर मी त्यांना प्रश्न विचारला ः ""इथं पगार किती मिळतो?'' त्यांनी काहीतरी हरवल्यागत माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले ः ""झोपा आता शांतपणे...'' ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, ते मी सकाळी मिळवलंच. मला कळल्यानुसार, इथं काम करण्यापोटी बाबांना पगाराच्या किंवा मानधनाच्या स्वरूपात एक रुपयाही मिळत नाही. प्रवासखर्च, जेवणखर्च आणि त्यांची मिळणारी पेन्शन यांच्या आधारावर काटकसर करणं आणि प्रत्येक दिवस सोन्याचा करणं, यापलीकडं कदाचित त्यांचं कोणतंही स्वप्न नसणार. बाबा म्हणाले ः ""गरिबांची, बहुजनांची पोरं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत. त्यांना उभं राहताना पाहिलं की आयुष्य वाढतं रे... मी काय, पिकलं पान...कधीही गळून जाईन; पण माझी उभी राहिलेली पोरं इथं असलेल्या गरिबीचा अंधकार दूर करतील. काळ कुणासाठी थांबत नाही, काळाचा आशीर्वाद कुणाला कसा असेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे चांगला काळ येण्यासाठी तरुणाईला नेहमी मदत केली पाहिजे.'' लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड (पुरी सरांचे विद्यार्थी) म्हणाले ः""-सरांनी शिकवलेल्या जनसंपर्काच्या जोरावर माझ्यासारख्या कित्येक युवकांनी त्या काळात भरारी घेतली.''ं
बाबांच्या घरी वाढलेले आणि बाबांनीच विवाह करून दिलेले डॉ. दिलीप शिंदे आणि डॉ. अर्चना शिंदे सध्या मराठवाड्यातून एक वर्तमानपत्र आणि मासिक काढतात. ते दोघंही म्हणालेः ""-सरांनी त्या काळात आमचं पालकत्व स्वीकारलं नसतं, तर आम्ही आज हे सोनेरी दिवस पाहू शकलो नसतो.'' आज शिंदे किंवा गायकवाड यांच्याकडं राहून, त्यांच्या मदतीनं अनेक मुलं शिक्षण घेत आहेत. बाबांचा वारसा केवळ या दोघांनीच पुढं नेला असं नव्हे, तर ज्यांना ज्यांना बाबांचा सहवास लाभला त्या सर्वांनी "इतर मुलांना पूर्णपणे मदत केली पाहिजे,' हे सूत्र मनात धरून चळवळ पुढं सुरू ठेवली.
कुणाला तरी मदत करायची आहे, ही वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. बाबांसारखे प्राध्यापक आपला घेतलेला वसा टाकत नाहीत; म्हणून "माणुसकी नावाची फॅक्‍टरी' अजून व्यवस्थितपणे सुरू आहे. या "फॅक्‍टरी'ला गती मिळण्यासाठी अजून अशा किती तरी बाबांची अर्थात "पुरी सरां'ची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com