असे पाहुणे येती (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

कथा सांगायला सुरवात केली, तसा समोरून चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही मोठे वक्ते बोलताना मध्येच खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावर फिरवतात हे मी पहिलं होतं. नकळत मी खिशात हात घालून रुमाल काढला. रुबाबात तो चेहऱ्यावर फिरवला. त्यानं ओठ टिपले. थोड्याच वेळात चेहऱ्याची, ओठांची आग सुरू झाली. मग लक्षात आलं, की रुमाल नाही- आपण मिरची लागलेलं जेवणाचं फडकं चेहऱ्यावरून फिरवलं आहे.

कुठल्याही स्नेहसंमेलनाला किंवा व्याख्यानाला येणारा पाहुणा एकतर कोट-टाय, किंवा नवरदेवासारखा चमचमता पायघोळ नेहरू अशा रुबाबात गाडीतून उतरावा, तो उतरल्याबरोबर चालकानं गाडी पुढं घ्यावी आणि आयोजकांनी स्वागत करत त्याला आत न्यावं, असं दृश्‍य आम्ही बालपणापासून पाहत आलो आहोत. त्यामुळं त्या पब्लिक स्कूलनं मला पाहुणा म्हणून निमंत्रण दिलं, तेव्हा आनंदाबरोबर मी चिंतेतही पडलो. त्यावेळेस एकाच खोलीत आम्ही पाच मित्र राहत असू. त्यामुळं आता पाहुणा म्हणून कसं जायचं यावर चर्चा झाली. पाचही मित्रांमध्ये ज्याचे कपडे जरा बरे ते परिधान केले. एका मित्राकडं जुनी का होईना साधी मोटारसायकल होती. तीवर रुबाबात बसून जावं, असं ठरलं.

त्या भल्या सकाळी आम्ही मोटारसायकलवर बसून त्या पॉश शाळेच्या आवारात पोचलो. मित्र गाडी चालवत होता. पाहुणे शक्‍यतो गाडी चालवत जात नाहीत म्हणून मी मागं बसलो होतो. इमारतीजवळ प्राचार्य आणि चार-पाच शिक्षक "पाहुण्यांची' अर्थात आमची वाट पाहत उभे होते. मित्रानं मोटारसायकल सरळ प्राचार्याजवळ नेऊन उभी केली. मी नमस्कार केला, तरी प्राचार्य गेटकडंच पाहत होते. मी पुन्हा नमस्कार केला, तेव्हा त्यांनी दचकून माझ्याकडं पहिलं. इतका वेळ हे मंडप किंवा स्पीकरवाले असावेत असाच त्यांचा समज असावा. पाहुणे अशा अवस्थेत येतील याची त्यांना मुळीच कल्पना नसावी. इतर शिक्षक अजूनही गेटच्या दिशेनंच पाहत होते. प्राचार्य माझ्या कानाशी हळूच म्हणाले ः ""गेटच्या बाहेर जाऊन थांबा.'' मला काही समजेना. त्यांनी मला दम दिल्याप्रमाणं पुन्हा तीच सूचना दिली. मित्र आणि मी पुन्हा दूरवर असलेल्या गेटबाहेर जाऊन थांबलो. थोड्या वेळानं आतून आलेली एक कार आमच्याजवळ येऊन थांबली. चालकानं खुणावताच मी रुबाबात त्याच्या शेजारी बसलो. त्यानं गाडी इमारतीजवळ नेली. वाट पाहत असलेले सारे कोटवाले शिक्षक धावत पुढं आले. एकानं दरवाजा उघडला. मी रुबाबात उतरलो. प्राचार्यांनी जोरात स्वागत केलं. मी आत जाईस्तोस्तर साऱ्या शिक्षकांकडं बारकाईनं पाहत होतो. मघाशी मोटारसायकलवर आलेलं ध्यान हेच, हे मात्र कुणाला सांगूनही पटलं नसतं.
कथाकथनाची ती सुरवात होती. उपलब्ध कपडे, साधनं वापरून कार्यक्रमाला जाणं सुरू ठेवलं. एका सिनिअर कॉलेजचं निमंत्रण आलं. मी एका छोट्याशा खेड्यात शिक्षकाची नोकरी करत होतो. किसन नावाच्या एका शेतकरी मित्राकडं अगडबंब दिसणारी डिझेल बुलेट होती. मी त्याला "गाडी घेऊन कार्यक्रमाला चल,' अशी विनंती केली. तो म्हणाला ः ""यायला अडचण नाही. परंतु, गाडी जुनी आहे. दहा-पंधरा मिनिटं किका मारल्याशिवाय सुरू होत नाही.'' त्यावर आम्ही नामी उपाय शोधला. कार्यक्रम सुरू झाल्यावर किसननं समोर प्रेक्षकांत बसायचं. कथा संपायला दहा-पंधरा मिनिटं बाकी असताना मी त्याला खुणावायचं. त्यानं बाहेर जाऊन किका मारायला सुरुवात करायची. गाडी सुरू झाल्याचा आवाज आल्यावर मी कथा संपवायची. एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. रंगला. कथा संपायला काही वेळ बाकी असताना मी किसनला खुणावलं. तो उठून पटकन्‌ बाहेर गेला. जोरजोरानं किका मारण्याचा आवाज येऊ लागला. शेवटी एकदाचा बदबद असा आवाज सुरू झाला. मी घाईनं कथा संपवली. प्राचार्य म्हणाले ः ""कार्यालयात चला. चहा घेऊ.'' मी घाईनं म्हणालो ः ""नको. पुढं कार्यक्रम आहे.'' ते म्हणाले ः ""चला, तुम्हाला सोडतो.'' मी घाईनं म्हणालो ः ""नाही. तुम्ही थांबा. मी जातो.'' तरीही ते बाहेर बुलेटपर्यंत आले. किसन म्हणाला ः ""पटकन्‌ बसा. पुढचा कार्यक्रम चुकल.'' गाडीचा उपयोग किसन सकाळी दुधाचे कॅन वाहायला करायचा. त्यासाठी त्यानं बुलेटच्या दोन्ही बाजूनं मोठालं कॅरेज बसवून घेतलं होतं. सन्माननीय पाहुणे (अर्थात मी) दोन्ही कॅरेजमध्ये पाय घालून सीटवर बसले. निघताना गाडी बंद पडू नये, म्हणून किसननं ती जोरात रेझ केली. त्याबरोबर मागून काळ्याकुट्ट धुराचा प्रचंड लोट उठला. हात हलवून आम्हाला निरोप देणारे प्राचार्य त्यात हरवून गेले. नंतर ते नक्की म्हणाले असतील ः ""पाहुणे आले नि तोंड काळं करून गेले.''

कथेतल्या गमतीपेक्षा कथाबाह्य अनुभव असे मजेशीर आहेत, की त्याचीच एक विनोदी कथा व्हावी. मुळात त्याची सुरवात पहिल्याच कार्यक्रमापासून झाली. आम्ही सारे मित्र एकाच खोलीत राहायचो, तेव्हा गावाकडून एसटीमधून जेवणाचे डबे यायचे. आई भाकरी फडक्‍यात बांधून पाठवायची. रोज चांगलं फडके कोठून शोधायचं म्हणून आम्हाला ते फडकं जपून पुन्हा डब्यात पाठवावं लागायचं. फडक्‍यांची पळवापळवी व्हायची. त्यामुळं एकदा असंच मी भाकरीचं फडकं खिशात ठेवलं. त्याच दिवशी एका मित्रानं गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात कथा सांगायला बोलावलं. मी संधीची वाटच पाहत होतो. मी कथा सांगायला सुरवात केली, तसा समोरून चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही मोठे वक्ते बोलताना मध्येच खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावर फिरवतात हे मी पहिलं होतं. नकळत मी खिशात हात घालून रुमाल काढला. रुबाबात तो चेहऱ्यावर फिरवला. त्यानं ओठ टिपले. थोड्याच वेळात चेहऱ्याची, ओठांची आग सुरू झाली. मग लक्षात आलं, की रुमाल नाही- आपण मिरची लागलेलं जेवणाचं फडकं चेहऱ्यावरून फिरवलं आहे. नंतर कथा कमी आणि अभिनयच जास्त झाला.
एका हायस्कूलच्या पडवीत कार्यक्रम होता. दोन पिलरना दोन्ही बाजूनं सुतळ्या बांधून फाशी दिल्यासारखा मधोमध माईक बांधला होता. वारे आले, की माईक हलायचा आणि कथा सांगायला माईक जाईल तिकडं तोंड न्यावं लागायचं. मुलं कथेला हसत होती, की माझ्या या कसरतीला ते शेवटपर्यंत समजले नाही. निघताना तर हेडमास्तरांनी माझ्या जवळ येऊन नकळत माझ्या तोंडाचा वास येतो की काय याचीही चाचपणी केली. एके ठिकाणी विजेच्या खांबावरून आकडे टाकून कार्यक्रमासाठी वीज घेतलेली होती. कार्यक्रम सुरू असताना अचानक एक जीप येताना दिसली. वीज मंडळाचे साहेब आकडे पकडायला आले, असं वाटून एकानं धावत जाऊन बांबूनं आकडे तोडून टाकले. गुडुप्प अंधार झाला. साहेबाच्या हाती लागू नये म्हणून सारे श्रोते पळून गेले. अशा एका ना अनेक गंमती.

अनेक ठिकाणी कथाकथन म्हणजे हा एकटा माणूस नेमकं काय करणार आहे, ते समोरच्यांना समजत नाही. ""स्टेज केवढं लागेल,'' असं काही जण विचारतात. एकानं तर ""वाजवायची पेटी लागेल का? आणून ठेवायला बरं,'' असंही म्हटलं होतं. शब्दांत, शैलीत, मांडणीत ताकद असणाऱ्या वक्‍त्याला असल्या काही भौतिक थेरांची गरज नसते, हे उशिरा समजलं. तरीही आयोजकाला वाटतंच- पाहुण्यांनी कसं रुबाबात गाडीतून यावं! मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. गाडीतून रुबाबात उतरतो. पाहुणे ऐटीत आले, म्हणून आयोजक सुखावतात. ...गाडीतून उतरताना मात्र माझ्या डोळ्यासमोर "गाडीचा हफ्ता भरण्याची जवळ आलेली तारीख' तरळत असते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com