आम्ही सारे भाडेकरू... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

कॉलेजला होतो तेव्हापासून भाड्यानं खोली घेऊन राहण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी एक अत्यंत बेरकी असा "अनुभवसंपन्न भाडेकरू' म्हणून नावाजलेला मनुष्य आहे! भाड्यानं घरं देणाऱ्या सर्व मालकांची संघटना असती तर त्या सर्वांनी माझ्यावर बहिष्कार टाकला असता हे नक्की. एवढे मोठे घराचे मालक; पण भाडं मागताना भाडेकरूसमोर अनेकदा लाचार होताना मी पाहिले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची अजीजी फारच मजेशीर असते. त्यातल्या त्यात भाडेकरू "गोडुंबा' असेल तर मग विचारायलाच नको. थकित भाडं मागायला अत्यंत तावातावानं आलेल्या मालकाला पाहिल्याबरोबर बेरकी भाडेकरू हा स्वतःच मालक असल्याप्रमाणे ऐटीत हसतो. नंतर किचनकडं पाहत "घरमालक आलेत गं, चहा ठेव पाहू' असं म्हणत "आमच्याकडं आलात म्हणून चहा तरी मिळतोय, नाहीतर तुम्हाला विचारतंय कोण!' अशा अर्थानं मालकांकडं पाहतो. त्याच्या या निगरगट्ट कृतीनं मालकाचं अर्धंअधिक अवसान गळून पडतं. तरी थकित भाडं मागायचं म्हणजे गंभीर राहायला हवं, म्हणून मालकाला चेहरा कठोर ठेवण्याची कसरत करावी लागते. पाण्याचा ग्लास पुढं करत भाडेकरू म्हणतोः ""सातव्या वेतन आयोगात भरघोस वाढ झाली हो तुमच्या पगारात. शिवाय, चिरंजीवांचं कंपनीत प्रमोशनही झालंय म्हणतात. खरं म्हणजे पार्टीच घेतली पाहिजे तुमच्याकडून.' घरमालकाचा जीव एकदम घाबराघुबरा होतो. भाडं तर दूरच; पण खरंच पार्टी द्यावी लागली तर उलट खिशातले आहेत ते पैसेही जातील याची भीती त्याला वाटू लागते. तो घाईनं उठत म्हणतो ः "तुम्ही भाडं दिलंत तर पार्टी देता येईल ना!' यावर भाडेकरू म्हणतोः "भाड्याचं ना? आमच्याकडचं भाडं "सेव्हिंग'ला आहे असं समजा. एका महिन्याचं किरकोळ भाडं तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला द्यायला बरं वाटत नाही. एकदम चार-पाच महिन्यांचं भाडं दिलं म्हणजे काहीतरी ठोस दिल्यासारखं वाटतं.' -फारच मोठेपणा दिल्यानं मालक गांगरून जातो. खरं म्हणजे रोजच्या रोज दिवसाचं भाडं दिलं तरी ते घेण्याची काही मालकांची प्रवृत्ती असते; परंतु मोठेपणा कुणाला आवडत नाही? नेमका याचाच फायदा काही भाडेकरू उठवतात. कॉलेजात असताना आम्ही असंच करायचो. चार-पाच जण मिळून आम्ही एक खोली घ्यायचो. भाडं साधारणतः अडीचशे-तीनशे रुपये असायचं. प्रत्येकाच्या वाट्याला पन्नास रुपये यायचे. आमचा मालक म्हणजे जणू आमच्यासारख्या भाडेकरूंचा मालक होण्यासाठीच जन्माला आला होता. त्याची नियमावली कठीण...म्हणजे कुणीही गेस्ट आला तर त्याला झोपण्याची परवानगी नाही. त्यामुळे गावाकडचा कुणी मित्र आला तर रात्री बारापर्यंत त्याला बाहेरच फिरावं लागायचं. मालक झोपल्यानंतर चोरपावलांनी यायचं आणि मालक उठण्याच्या आत पहाटे पाचलाच परागंदा व्हायचं, असं त्याला करावं लागे. विजेचं बिल मालक भरायचे. त्यामुळे रात्री बारानंतर विजेचा दिवा बंद म्हणजे बंद! एकदा रेडिओचा आवाज ऐकून मालक खोलीत आले. आम्ही सांगितलं ः "रेडिओ सेलवर सुरू आहे.' वास्तविक, रेडिओची वायर आम्ही सतरंजीखालून जोडलेली होती. मालकाच्या हे लक्षात आलं नाही म्हणून बरं; परंतु लवकरच वेगळीच "आकाशवाणी' झाली आणि आमचं भांडं फुटलं. एकदा शंकर गुपचूप शर्टला इस्त्री करत असताना मालक आले. ती गरम इस्त्री कुठं लपवून ठेवावी हे त्याला ऐनवेळी कळलं नाही. त्यानं ती घाईघाईनं चादरीखाली लपवली. चादरीतून धूर निघू लागला. सारा प्रकार लक्षात आल्यावर मालकांच्या तोंडातून जाळ निघू लागला! "या महिन्याचं भाडं टाका आणि चालते व्हा' असा दम देऊन ते तरातरा चालते झाले. जायचंच आहे तर भाडं तरी कशाला द्यायचं असं म्हणून आम्ही त्याच रात्री बिस्तरा उचलून चुपचाप पळ काढला. नंतर मात्र त्या गल्लीतून जायची आम्हाला कायमची चोरी झाली.
***
एकंदर, बाल्कनीतल्या प्रेक्षकांनी पडद्याजवळ बसलेल्या प्रेक्षकांकडं जसं पाहावं तसं घराचे मालक भाडेकरूकडं पाहत असतात. "आम्ही आहोत म्हणून तुमच्या डोक्‍यावर छप्पर आहे, नाहीतर कुटुंब घेऊन तुम्हाला फुटपाथवर राहावं लागलं असतं' असाच त्यांचा एकूण तोरा असतो. अगदीच थोडे मालक प्रेमळ असतात. बहुधा पूर्वी तेही बऱ्याच ठिकाणी भाड्यानं राहिलेले असावेत! खोल्या भाड्यानं देण्यात तसं काही गैर नाही; पण काही घरांचे मालक जास्त भाडं मिळतं म्हणून स्वतःच्या मोठ्या खोल्या भाडेकरूंना देतात आणि स्वतः छोट्याशा खोल्यांमध्ये राहतात. अशा ठिकाणी जाणाऱ्या त्रयस्थ माणसाला "भाडेकरू हाच खरा घरमालक असून, कोपऱ्यात कुणीतरी कोचल्यासारखा राहणारा घरमालक हा गरीब भाडेकरू आहे,' असं वाटत राहतं. त्यात, भाडेकरूनं फार मिजाशीत राहावं असं मालकांना कधीही वाटत नाही. भाडेकरूकडं एकतर गाडीच नको आणि असलीच तर ती आपल्यापेक्षा कमी किमतीची असावी अशी मालकाची मनोमन इच्छा असते! त्यातल्या त्यात मालकीणबाई तर याबाबतीत फारच सजग असतात. त्या तिथंच राहायला असतील तर भाडेकरूबाईकडं मालकीणबाईंचं बारकाईनं लक्ष असतं. भाडेकरूबाईकडं आपल्यापेक्षा कमी दागिनं असायला हवेत...तिच्या साड्या आपल्यापेक्षा झकपक नसाव्यात अशी मालकीणबाईंची अपेक्षा असते. एखादी भाडेकरूबाई फारच ऐटीत राहत असेल तर त्यावर नाक मुरडत,"भाडेकरू ती भाडेकरू; पण मिजास बघा किती' हा डायलॉग मालकीणबाई दिवसातून एकदा तरी मनातल्या मनात पुटपुटत असतात. मालकीणबाई दूर राहत असतील तर भाड्यानं दिलेलं घर पाहायला मालकाबरोबर हट्टानं येतात. मालक एखाद्या राजाप्रमाणे बाहेरच थांबतो आणि मालकीणबाई महाराणीच्या थाटात "महाला'ची टेहळणी सुरू करतात. "या भिंतीला खिळे का ठोकलेत...आवारातली झाडं-रोपं पार वाळून चालली आहेत...फरश्‍या काळ्या पडल्या आहेत...' असं तुणतुणं वाजवून "...तरी मी आमच्या "ह्यां'ना सांगत होते की घर भाड्यानं दिलं की त्याची रया जाते,' असा शेरा मारतात व भाडेकरूबाईनं अनिच्छेनं केलेला चहा अगदी खुशीनं पिऊन जातात. भाडेकरूबाईला सामान जिथल्या तिथं ठेवण्याची सवय असेल तर घर नीटनेटकं राहतं; परंतु "कुठं आपलं आहे' असा विचार करणाऱ्या भाडेकरूंची संख्याही काही कमी नसते. सुंदर रंग दिलेल्या भिंतींना ते जागोजागी खिळे ठोकतात. भाडं देतो म्हणजे आम्ही या घराला आगही लावू शकतो असंही काही भाडेकरूंचं मत असतं! अशा भाडेकरूंमुळं "भाडं नको; पण भाडेकरू आवर' असं मालकाला होऊन जातं. घराची झालेली दुरवस्था पाहून मालकाचं हृदय अनेकदा गलबलून येतं. समस्त मालकांना एक जाणीव नसते, की हे हृदयही आपल्या शरीरानं काही दिवसांकरिता भाड्यानंच घेतलेलं आहे. मुळात अखिल मानवजात या पृथ्वीवर भाड्यानंच तर राहत आहे! तो अदृश्‍य मालक कुणाला कधीही घराबाहेर काढू शकतो. एक दिवस सर्वांनाच पृथ्वी नावाचं हे घर क्रमाक्रमानं सोडायचं आहे. मानवाला या बाबीची कल्पना नसते असं नाही. तरीही तो या बाबीकडं सोईस्कर दुर्लक्ष करून मालकासारखा कसा रुबाबात राहत असतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com