आंतरआवाजाचा शोध घेणारी मुक्त स्वगतं (संतोष शेणई)

book review
book review

संदीप खरे यांचा "मी अन्‌ माझा आवाज..." हा कवितासंग्रह मी वाचतो आहे. खरे यांच्याकडून त्यांच्या कविता मी ऐकल्या आहेत. समूहात बसून कविता ऐकणं आणि एकटं असताना कविता वाचणं यात अंतर राहत असतं, ते इथंही आहे. कविता ऐकताना आपण बहुतेकदा आविष्कारणात गुंततो. कविता वाचताना आपण एकटेच ऐंद्रीय अनुभव घेत असतो. आता खरे यांच्या कविता वाचत असताना त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेपही माझ्या मनात वाजत आहेत आणि त्याचवेळी तरुणांपासून वृद्धांपर्यंत शेकडो जणांना कवितेच्या नादी लावण्याची त्यांनी केलेली किमयाही मला दिसत आहे. नजरेसमोर पडद्यावर दृश्‍य दिसत असणं आणि मागून काहीतरी ऐकू येत असणं हे या कविता वाचताना सतत घडत असतं.

खरे यांच्या कवितांना "कविता' म्हणावे का, याविषयी चर्चा सुरू असते. त्यांच्या कविता म्हणजे वाक्‍यांची उतरंड असते, त्यात भरपूर तपशीलच असतो, फारशा प्रतिमा नसतात याकडे बोट दाखवलं जातं. मुळात, कविता म्हटल्यावर आपल्याला काही सवयी लागलेल्या आहेत, त्याचा हा परिणाम आहे. एकीकडे गहनतेचा आभास निर्माण करणारी रचना आपल्यासमोर येते किंवा तथाकथित सामाजिक कविता तरी. अशा कवितेत जीवनातलं काही मूलभूत सत्य आपण सांगत आहोत, अशी भूमिका घेतलेली असते. त्यासाठी क्‍लृप्त्या वापरलेल्या असतात. अर्थघनता निर्माण करण्यासाठी प्रतिमांना प्राथम्य दिलेलं असतं. या सगळ्याला कविता म्हणून स्वीकारण्याची आपली सवय संदीप खरे यांच्या कविता वाचताना दूर सारावी लागते. किंबहुना त्यामुळेच ती समूहाशी अधिक संवादी होऊ शकली आहे. ही कविता वाक्‍यांच्या उतरंडीतून आपल्या श्रोत्यांशी थेट संवाद साधते. या कवितेत डोक्‍याला ताण देऊन अर्थ उलगडायला लावणाऱ्या प्रतिमा फारशा नाहीत; पण त्यातले तपशील जवळचे वाटतात आणि त्यातूनच एक प्रतिमा तयार होत जाते. ती त्या आशयाला पुढे नेते. इथं जीवनातलं मूलभूत सत्य आपण सांगत आहोत असा आव नाही; पण जीवनातल्या अनुभवांना भिडण्याची आस आहे. यात कोणत्याही गहनतेचा आभास नाही, ही साधी सरळ भिडणारी कविता आहे.

या संग्रहात जगण्याबिगण्याच्या मध्यंतरातले अनुभवही कविताबद्ध झाले आहेत; पण ते अल्पसंख्य आहेत. मुख्य भर आहे तो कविताशोधावर. कविता ही आंतरिकतेशी खूप निकटचं नातं सांगते. आपल्या आतल्या आवाजाचा शोध घेणं म्हणजे कविता असते. तसंच कविता लिहिणं हे एका परीनं आपली कवितेची संकल्पना मांडणंही असतं आणि कविता वाचताना कवीची ही कवितेविषयीची संकल्पना समजून घेणं असतं. "मी अन्‌ माझा आवाज...' वाचताना हे अधिक स्पष्ट होतं. कविता म्हणजे अमुक अमुक ही आपली संकल्पना कोणत्याही कवितेवर लादता येत नाही. या संग्रहातल्या बहुसंख्य कविता या आपल्या आंतरआवाजाचा, कवितेचा, काव्यनिर्मिती प्रक्रियेचा, प्रतिभेचा शोध घेणाऱ्या आहेत. कोणत्याही कवीला हा शोध घ्यावासा वाटत असतोच. केशवसुतांपासून असा शोध घेतला गेलेला दिसतो. तसा तो इथं घेतला गेला आहे. कवीला सद्यकालीन काव्यबंधाची नेमकी जाणही आहे. त्यामुळेच इथं कधी वृत्तबद्ध रचना येते. गझल येते. गाणं येतं; पण कवी या बंधामध्ये अडकत नाही. त्याची रचना ही दृश्‍यमय आहे. आपण एखादा नाट्यप्रवेश पाहावा किंवा लघुचित्रपट पाहावा असा अनुभव देणारी ही रचना आहे. त्यातली नाट्यमयता, त्यातले संवाद, त्यातल्या गप्पा यांना महत्त्व आहे. यालाही एक लय आहे आणि यमकांच्या बांधणीतून ती लय सांभाळली जाते. या कवितेत सूचितार्थापेक्षा कथनाला, निवेदनाला अधिक स्थान आहे, म्हणूनच या कविता म्हणजे आपल्या आतल्या आवाजाचा शोध घेणारी मुक्त स्वगतं झाली आहेत.

या संग्रहातल्या "पण' (पान 17) आणि "श्‍याम मनोहरची कळ' (पान 42) या कविता मला विशेष आवडल्या. या दोन्ही कविता निर्मितीप्रक्रियेचा तीव्र शोध घेताना दिसतात. आशयात्म, रुपात्म आणि भाषिक अंगानं या दोन्ही कविता सेंद्रिय अनुभव देतात. अन्य कवितांमध्ये प्राधान्यत: भावप्रतीतीवर भर आहे. खरे यांच्या काव्यव्यक्तित्वात भारतीय तत्त्वज्ञानानं मुरवलेली पारंपरिक जीवनरीती आणि विद्यमान जीवनशैलीनं आणलेली नवीन जीवनरीती यांच्यातला ताण आहेच. हा ताणच त्यांना आतल्या आवाजाशी असलेलं आपलं आजचं नातं तपासायला लावतो.
"सुचणे' हा काव्यनिर्मितीतील महत्त्वाचा भाग असतो.
"याला काय अर्थ आहे!
इतकीच होती मूळ ओळ'
हेच महत्त्वाचं. बाकी काव्यनिर्मितीभोवती गूढता पसरवण्यात आली आहे. मूळ ओळ सुचल्यानंतर बाकी पूर्वसंस्कारातून कवितेचं घडणं असतं. प्रत्येकवेळी ती ओळ म्हणजेच अखेरची ओळ असं कवीला वाटतं आणि त्या सगळ्या शेवटच्या ओळी हातात घेऊन कवी आरंभओळीच्या शोधाला निघतो. आपल्याला कविता सुचणार नाही, म्हणजे आपलं अस्तित्व नाही, अशी एक भीती कवीला असतेच. व्यावहारिक कोलाहलात आपला आंतरआवाज आपण गमावल्याची भीती त्याला असते. व्यक्त होता न येणं म्हणजे माणूसपण हरवणं असतं. ही भीती संदीप खरे आपल्या वरकरणी खेळकर शैलीत; पण तीव्रतेनं व्यक्त करतात.

पुस्तकाचं नाव : "मी अन्‌ माझा आवाज...'
कवी : संदीप खरे
प्रकाशक : रसिक आंतरभारती, पुणे
किंमत : 175 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com