आपुलीच प्रतिमा होते... (डॉ. मानसी रानडे)

dr manasi ranade
dr manasi ranade

सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-अपरिहार्यता आदी गोष्टींचं विश्‍लेषण.

गीतकार जगदीश खेबूडकर यांचे जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचे हे शब्द आजच्या काळातल्या एका मानसिक आजारासाठी चपखल बसू शकतील अशी कल्पना खुद्द त्यांनाही आली नसेल. त्यांची क्षमा मागून या गीतात काही शब्द घालून असं म्हणावसं वाटतं ः "आपुलीच प्रतिमा (घेत बसण्याची सवय) होते आपुलीच वैरी!' हा वैरी आहे- सेल्फी- हे वेड आहे सेल्फीचं. स्वतःच स्वतःचे फोटो काढण्याचं आणि नुसतं तेवढ्यावर न थांबता ते कुठल्यातरी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यावर मिळालेल्या लाईक्‍सवरून स्वतःची किंमत ठरवण्याचं. सेल्फी म्हणजे काय याची नव्यानं ओळख करू देण्याची आता गरज उरलेली नाही. हल्ली दोन-चार दिवसांनी एक तरी बातमी सेल्फी काढताना झालेल्या मृत्यूची असते आणि मृत्यू पावलेली व्यक्ती ही बहुतांश वेळा पंधरा ते पस्तीस अशा वयोगटांतली असलेली आपल्याला आढळून येतं. अगदी सुरवातीला कोणीतरी आपला फोटो काढत असे, मग कॅमेऱ्यामध्ये टायमर लावून पळत पळत येऊन जागेवर उभे राहून आपण आपला फोटो काढत होतो आणि आता तर नुसता आपलाच फोन आपल्या तोंडासमोर धरून आणि मग त्यात तोंडाचे हावभाव करून वाट्टेल त्या ठिकाणी, वाट्टेल त्या परिस्थितीत मनमुराद सेल्फी काढण्यात सर्वजण मग्न झालेले असतात. यातून मोठमोठ्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, खेळाडू, सिने तारे-तारका यांच्यापासून रस्त्यावर वडापाव विकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत कोणी म्हणता कोणीही सुटलेलं नाही.

सन 2013 मध्ये इंग्लिश ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीनं सेल्फी हा शब्द word of the year म्हणून जाहीर केला होता. हे सेल्फीचं वेड आहे तरी काय? ते खरंच वेड आहे, की हल्ली रोज काहीतरी नव्याचा हव्यास असण्याच्या युगात काही काळानं ओसरून जाणारी ती लाट आहे? मानसशास्त्र याविषयी काय सांगतं?
काही वर्षांपूर्वी व्यसन म्हटलं, की सिगारेट-दारू, चरस, गांजा या गोष्टी डोळ्यासमोर येत. अलीकडच्या काळात त्यामध्ये इंटरनेट, स्मार्टफोन यांचं व्यसन आणि ही व्यसनं कमी पडतायत म्हणून आता सतत सेल्फी घेण्याची सवय याची भर पडत आहे. या सेल्फीच्या सवयीवर जगभरात आणि भारतातही काही प्रमाणात संशोधन झालं आहे आणि ही नुसती गंमत न राहता, सवयीच्या वळणावरून आता त्यांचं व्यसनामध्ये रूपांतर झालेलं आहे असे निष्कर्ष त्यातून आपल्याला मिळत आहेत. सतत स्वतःची सेल्फी घेण्याच्या सवयीला "सेल्फिटिस' असं नाव मिळालं आहे. सतत सेल्फी घेऊन ती सोशल मीडियावर अपलोड करणं आणि त्या अनुषंगानं होणारे मानसिक त्रास याचा समावेश अजूनतरी अधिकृतरीत्या मानसिक आजार म्हणून "अमेरिकन सायकीऍट्री असोसिएशन'चं मानसिक आजारांचं जे मॅन्युअल आहे त्यामध्ये झालेला नाही; पण कधीतरी गंमत म्हणून सेल्फी काढणं आणि सतत त्यातच गुंतून राहणं यामध्ये नक्कीच फरक आहे.

मानसिक आजार कधी?
सेल्फी घेण्याला मानसिक आजार असं का आणि कधी म्हणायचं? कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केली, सतत केली गेली, त्यातच आपला बराचसा वेळ जायला लागला आणि त्या सवयीमुळं इतर गरजेच्या गोष्टी करण्याकडं आपलं दुर्लक्ष होतंय, आपल्या ध्येयापासून, ते साध्य करण्यापासून आपण दूर जातोय आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यावर, नातेसंबंधांवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे- असं व्हायला लागलं, की समजावं की आपली आवड ही निव्वळ आवड किंवा गंमत न राहता आता त्याचं मानसिक त्रासात किंवा आजारात रूपांतर होऊ लागलं आहे.
मुळात आपली इतरांनी दखल घ्यावी, लोकांच्या नजरेत आपण भरावं, लोकांकडून आपलं कौतुक व्हावं ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि ती अयोग्य असते असंही नाही. योग्य गोष्टींसाठी, काही विशेष दाखल घेण्याजोगं काम केल्यावर मिळणारे कौतुकाचे, प्रोत्साहनाचे शब्द आपलाही उत्साह वाढवतात. परंतु विशेष काही म्हणण्याजोगं काम न करता केवळ सतत सेल्फी घेऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करून त्यातून मिळणाऱ्या लाईक्‍सवरून स्वतःची किंमत ठरवण्याचा आजच्या तरुणाईचा कल आणि त्याला खतपाणी घालणारी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखी माध्यमं हे घातक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही दिवसातून तीन किंवा अधिक सेल्फी घेताय का? नुसते घेऊन नाही थांबत, तर ते सोशल मीडियावर टाकताय का? किंवा सतत स्वतःचे सेल्फी घेण्याची इच्छा तुम्हाला थांबवता येत नाहीये, आणि त्यामुळे तुमच्या इतर दैनंदिन गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.. तर तुम्ही या "सेल्फिटिस'च्या जाळ्यात अडकला आहेत.

कारण काय?
सेल्फीच्या संदर्भात झालेल्या मानसशास्त्रीय संशोधनामध्ये असं दिसून आलंय, की सतत सेल्फी घेणाऱ्या लोकांमध्ये एकटेपणा, आत्मकेंद्रितपणा, आत्मविश्वासाचा अभाव, असुरक्षिततेची भावना, दुसऱ्यावर भावनिकदृष्ट्या असलेलं अवलंबित्व, खालावलेली स्वप्रतिमा, स्वतःची शारीरिक ठेवण किंवा काही शारीरिक वैशिष्ट्यं याविषयीची टोकाची नावड किंवा असमाधान; स्वतःविषयीचे, सेल्फी घेण्याविषयीचे ऑब्सेसिव्ह (सतत घोळत असणारे) विचार, व्यक्तिमत्त्वातले काही दोष- जसे नार्सिसिस्टिक कल्पना (स्वतःच स्वतःच्या प्रेमात असलेल्या व्यक्ती), स्वतःविषयीचा अहंगंड यासारख्या समस्या आढळून आल्या आहेत. पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये- जिथं सेल्फी घेण्याचं प्रमाण सर्वांत जास्त आहे, त्यांच्यामध्ये समवयस्कांमध्ये फिट होण्याची धडपड, त्यापासून आपण कुठं वेगळे ठरू नये यासाठीच अट्टाहास आणि तरीही आपण कोणीतरी वेगळे आणि इतरांपेक्षा अधिक खास आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न, सेल्फी पोस्ट केल्यावर आपल्या मित्र-मैत्रीणींमध्ये उंचावणारं आपलं स्टेटस, सेल्फी काढताना पत्करलेले आणि यशस्वीरित्या पार केलेले धोके आणि त्यातून स्वतःची इमेज उंचावण्याचा केलेला प्रयत्न, बेदरकार वृत्ती, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची तीव्र इच्छा, सेल्फी पोस्ट केल्यावर स्वीकारले गेल्याची आणि सेल्फी पोस्ट नाही केले तर इतरांपासून तुटलेपणाची भावना, एकांतात सेल्फी बघताना मनात येणारी आनंदाची भावना आणि स्वतःला असं बघून वाढणारा (बऱ्याचदा खोटा) आत्मविश्वास आणि सेल्फीवर मिळालेल्या लाईक्‍सवरून स्वतःचं सोशल स्टेटस ठरवणं या गोष्टी प्रामुख्यानं आढळून आल्या आहेत. याचबरोबर पालकांसोबत समोरासमोर संवादाचा अभाव, रोजच्या गरजांपलीकडे त्यांच्याशी बोलणंसुद्धा न होणं, आभासी जग सोडून इतरांशी वास्तवामध्ये जोडलं न जाणं; नको त्या वयात, गरज नसताना हातात आलेली महागडी गॅजेट्‌स, त्यांचा अनिर्बंध आणि अनियंत्रित वापर या सर्वांतून या सेल्फीच्या व्यसनाला खतपाणीच मिळत आहे.
सेल्फीच्या या व्यसनामुळं टोकाचं नैराश्‍य, चिंता, नातेसंबंधांमधला ताणतणाव, एकटेपणाची भावना, इतर व्यसनांची सवय, आत्महत्येचे विचार, व्यक्तिमत्वातील दोष (पर्सनॅलिटी डिसॉर्डर) यांसारखे अनेक मानसिक आजार उद्‌भवू शकतात आणि दीर्घकाळापर्यंत ते राहू शकतात. वेळीच याची दाखल घेऊन यावर उपाय न केल्यास गोष्टी आणखी गंभीर बनू शकतात. कधीकधी या सेल्फीच्या वेडाचं पर्यवसान स्वतःच्या जीवाची किंमत चुकवण्यानं होतं आणि तेव्हा मग फार उशीर झालेला असतो.

उपाय काय?
यातून दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यावर उपाय आहेत. सध्याच्या काळात आपल्या स्मार्टफोनपासून शंभर टक्के स्वतःला दूर ठेवणं हे होणार नाही आणि ते शक्‍य नाही. कारण लोकेशन शोधण्यापासून ते विजेची, वाण्याची बिलं भरण्यापर्यंत सर्व कामांसाठी आपण फोन वापरतो. परंतु, फोन आणि त्यातलं हाताळण्यास आणि वापरण्यास सोपं तंत्रज्ञान, त्यातली ऍप्स या सोयीच्या गोष्टींना आपण आपली गरज बनवायला लागलो, की तिथं खरी गडबड सुरू होते.

फोनच्या वापरावरचं कठोर स्वनियंत्रण हाच सर्वांत उत्तम उपाय आहे. कामाशिवाय करमणुकीसाठी ठराविक वेळेपलीकडं फोन न वापरणं इथूनच आपण सेल्फी आणि एकंदरीत स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. परंतु, या प्रकारचा सतत सेल्फी घेण्याचा आजार वर उल्लेख केलेल्या मध्यम ते तीव्र लक्षणांच्या स्वरूपात स्वतःमध्ये किंवा आपल्या प्रियजनांमध्ये आढळून आल्यास वेळेवर मानसोपचार तज्ज्ञांकडं त्या व्यक्तीला नेण्याची आवश्‍यकता आहे हे लक्षात ठेवा. कधीकधी यासाठी औषधोपचारांची गरज पडू शकते.

त्याबरोबरीनं सायकोथेरपी आणि समुपदेशन यांच्या मदतीनं त्या व्यक्तीला सेल्फीच्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्याला असा त्रास किंवा आजार आहे या गोष्टीचा संपूर्ण स्वीकार करणं. ही पहिली पायरीच सर्वांत महत्त्वाची आणि सर्वांत कठीण असते- कारण या आजाराचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत, त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे हवंहवंसं वाटत असतं आणि सुरवातीला तरी शारीरिक/ मानसिकदृष्ट्या काही त्रास दिसत नाही. त्यामुळंच अशा प्रकारचं व्यसन असणारी व्यक्ती सहजासहजी उपचारांसाठी येत नाही. तसंच काहीवेळा आजाराच्या तीव्रतेनुसार उपचारही दीर्घकाळासाठी घ्यावे लागतात. परंतु, या व्यसनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम बघता आत्ता थोडा त्रास सोसून त्यातून वेळीच बाहेर पडणं हे आपल्याच हिताचं आहे हे ध्यानी असू द्यावं. आपल्या प्रतिमेला आपली वैरी बनवण्यापेक्षा स्वनियंत्रणानं तिच्याशी मैत्री जोडून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com