प्रभाव ‘बिग थ्री’चा (केदार ओक)

kedar oak
kedar oak

टेनिसविश्वात सध्या रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल या तीन दिग्गजांचंच वर्चस्व आहे. गेल्या काही काळात झालेल्या ६५ ग्रॅंडस्लॅम्सपैकी तब्बल ५४ ग्रॅंडस्लॅम्स या तिघांनी जिंकलेल्या आहेत. तेवढंच नव्हे, तर सन २०१७ पासून झालेल्या एकूण ११ पैकी ११ अर्थात १०० टक्के ग्रँडस्लॅम याच त्रिकूटानं जिंकल्या आहेत. हा ‘बिग थ्री’चा प्रभाव कोणत्या पातळीपर्यंत आहे, तो चांगला की वाईट, ‘बिग थ्री’ची शक्ती नेमकी कशात आहे या सर्व गोष्टींबाबत चर्चा.

परवाचा रविवार (ता. १४ जुलै) जगभरातल्या क्रिकेट आणि टेनिस चाहत्यांना सढळहस्ते देऊन गेला. लंडन शहराच्या उत्तरेकडे लॉर्डस् मैदानावर क्रिकेट विश्वकरंडक आणि दक्षिणेकडे विंबल्डनला टेनिस स्पर्धेचे अंतिम सामने चालू होते. दोन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीचा इकडून तिकडे फिरणारा लंबक, जबरदस्त इच्छाशक्ती, चुरस, अथक प्रयत्नांनीही शेवटपर्यंत कोण जिंकणार ते ठरत नसल्यानं 'टायब्रेकर्स'चा करावा लागलेला वापर हे सगळंच अचाट होतं. खेळाडू नक्कीच थकले असतील; पण संपूर्ण प्रवासात प्रेक्षकांनीही आनंद, राग, चिडचिड, आश्चर्य, निराशा, सहानुभूती अशा सगळया भावनांची आवर्तनं अनुभवली.
विंबल्डनच्या गवतावर आठ वेळचा माजी विजेता रॉजर फेडरर आणि चार वेळचा माजी विजेता नोवाक जोकोविच एकमेकांना आव्हान देत होते. फेडरर लवकरच वयाची ३८ वर्षं पूर्ण करतोय, तर जोकोविचही ३२ वर्षांचा आहे. विशीतल्या तरुणांनी टेनिस कोर्टस् गाजवायच्या काळात हे तिशी-चाळीशीकडे झुकलेले दोन दिग्गज तब्बल पाच तास एकमेकांना शिरजोर होत होते. मात्र, ही फक्त या स्पर्धेपुरती झालेली अपवादात्मक गोष्ट नाही. ठराविक तीन-चार खेळाडू बऱ्याचदा अंतिम लढत खेळत आहेत. पुरुषांच्या टेनिसचं घड्याळ काही खेळाडूंसाठी स्तब्ध झालं आहे. हे असं का होतंय? जे घडतंय ते चांगलं की वाईट? टेनिसच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे?... हे आणि असे अनेक प्रश्न टेनिस चाहत्यांना भेडसावत आहेत. आज आपण त्यावर एक नजर टाकणार आहोत.

‘बिग थ्रीं’चा प्रभाव
जवळपास वर्षभर टेनिस स्पर्धा चालू असल्या, तरीही ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि अमेरिकेन ओपन या चार सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धा. त्याला ‘मेजर’ किंवा ढोबळपणे ‘ग्रँडस्लॅम’ असंही म्हणतात. सन २००३ मध्ये तेव्हाच्या नवोदित फेडररनं विंबल्डन जिंकून भविष्यातल्या ‘बिग थ्री’ क्लबची मुहूर्तमेढ केली. दोन वर्षांनी त्याला राफा नदाल येऊन मिळाला आणि पुढली पाच वर्षं दोघांनी हुकमत राखली. चालू दशकाच्या सुरवातीला सर्बियाच्या जोकोविचनं त्याचा धडाका सुरू केला आणि आज नऊ वर्षांनंतर तो ‘बिग थ्री’मधला सध्याचा सर्वोत्तम टेनिसपटू आहे. मध्यंतरी ब्रिटनच्या अँडी मरेनं सातत्यानं उपांत्य, अंतिम फेऱ्या गाठत आणि मास्टर्स स्पर्धा जिंकत ‘बिग थ्री’ क्लबच्या आसपास घुटमळत राहण्याचा प्रयत्न केला. ‘बिग थ्री’चं वर्चस्व भेदत त्यानं काही काळ नंबर वन पदापर्यंतही मजल मारली; पण ग्रँडस्लॅमसारख्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं जिंकण्यात येणारं अपयश आणि अधूनमधून डोकावणाऱ्या दुखापतींमुळं बिचाऱ्याचा प्रवास कायम खडतरच राहिला.
थोडं आकडेवारीकडे बघितलं तर रॉजर, राफा आणि नोवाक यांचं वर्चस्व किती आहे, ते समजून येतं. रॉजरनं त्याचं पहिलं स्लॅम जिंकल्यापासून गेल्या सोळा वर्षांत तब्बल ६५ ग्रँडस्लॅम खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी ‘बिग थ्री’चा वाटा ५४ स्लॅमचा म्हणजेच तब्बल ८३ टक्के आहे. फेडरर २०, राफा १८ आणि नोवाक १६! त्यातही २०१७ पासून झालेल्या एकूण ११ पैकी ११ अर्थात १०० टक्के ग्रँडस्लॅम याच त्रिकूटानं जिंकल्या आहेत. राफा ४, नोवाक ४ आणि रॉजर ३!
या ६५ मधल्या उरलेल्या ११ पैकी अँडी रॉडिक, गेस्टन गॉडीओ, साफिन, डेल पोट्रो, चिलीयाचा प्रत्येकी एक आणि अँडी मरे, स्टॅन वावरिंका यांचा प्रत्येकी ३ असा वाटा आहे. पुरुष एकेरीत १६ वर्षांत एकूण फक्त १० विजेते झाले आहेत.

थोडा इतिहास आणि ताजी फळी
दोन हजारचं दशक चालू झालं, तेव्हा टेनिससाठी मोठा स्थित्यंतराचा काळ होता. नव्वदीचं दशक गाजवणारे संप्रास आणि आगासी निवृत्तीकडे झुकले होते. सन २००० ते २००३, म्हणजे फेडररचा उदय झाला तोपर्यंतच्या चार वर्षांच्या काळातल्या १६ ग्रँडस्लॅमनी टेनिसला एकूण ११ विजेते दिले. त्यानंतर फेडररचा धमाका चालू झाला. फेडररनं त्याच्या आधीच्या पिढीवर वर्चस्व ठेवलं, त्यानंतर त्याच्या बरोबरीनं खेळणाऱ्या ह्युइट, रॉडिक, साफिन, लुबिचिच वगैरे मंडळींवर अंकुश ठेवला. त्यानंतर राफाबरोबर मिळून अजून एक फळी गारद केली. त्यानंतर जोकोविचला साथीला घेऊन अजून एक फळी. हे अजूनही चालूच आहे. वाटेत आलेल्या प्रत्येकाला मागं टाकून हे तिघं शिखरांवर शिखर चढत आहेत आणि बाकीचे कित्येक खेळाडू कायम बेस कँपजवळच घुटमळत बसले आहेत.
खरं तर प्रत्येक ताज्या पिढीत भरपूर ‘प्रोस्पेकट्स’ होते; पण त्याचं रूपांतर विजेत्यांमध्ये आणि सातत्यपूर्ण विजेत्यांमध्ये कधीच झालं नाही. ‘यंदा तरी चित्र बदलेल का?’ हा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला जातो; पण त्याचं उत्तर नेहमी ‘यंदा नाही’ असंच येत राहिलंय. साशा झ्वेरेव, बॉरना चॉरीच, ह्यन चंग, स्टेफनोस चिचीपास, डेनिस शपोवोलोव, टियाफो, आंद्रे रुब्लेव, खचनाव, डॉमी थीम, मेडवेडेव्ह, अलेक्स द मिनॉर, निक किरीऑस, फिलिक्स उजे आलियासिम अशी कितीतरी नवीन मुलं आहेत जी ‘आम्ही जिंकू’ अशी आशा दाखवतात; पण ‘ते तिघं’ प्रत्येक वेळी सगळ्यांना पुरून उरत आले आहेत.

‘बिग थ्री’ यशाची कारणं
संपूर्ण कारकिर्दीत राफाला बऱ्याच दुखापतींनी त्रास दिला; पण प्रत्येक वेळी तो नव्या जोमानं उभा राहिला. आज दीड दशकानंतरही प्रत्येक पॉइंट आयुष्यातला शेवटचा असल्याप्रमाणं खेळण्याची त्याची वृत्ती बघून तुम्ही तोंडात बोटं घालता. अजिंक्य जोकोविचलाही २०१६ च्या आसपास दुखापती आणि इतर कारणांनी ग्रहण लागलं होतं. दोन वर्षं तो ग्रँडस्लॅम जिंकू शकला नव्हता. भरपूर खस्ता खाल्ल्या; पण त्यातूनही त्यानं मुसंडी मारली आणि गेल्या ५ पैकी ४ ग्रँडस्लॅम जिंकून दाखवल्या. तीन वर्षांपूर्वी रॉजरचं पस्तिशी गाठलेलं वय बोलायला लागलं होतं. देदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा अधूनमधून दिसायच्या; पण त्या अस्पष्ट वाटांनी विजेतेपदाचा रस्ता शोधणं एका मेणबत्तीच्या जोरावर अंधारी जंगलवाट तुडवत जाण्यासारखं होतं. शेवटचं ग्रँडस्लॅम जिंकून बरोब्बर ४ वर्षं झाली होती आणि याचवेळी रॉजरनं सहा महिने विश्रांतीवर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. खेळापासून इतका काळ लांब राहण्याची जोखीम एखाद्या तरण्या खेळाडूनं घेतली, तर एकवेळ ठीक आहे; पण वयाची पस्तिशी झाल्यानंतर असं धाडस करणं तुम्हाला ‘आ’ वासायला लावतं... पण तो आला, नुसता आलाच नाही, तर त्यानं ३ ग्रँडस्लॅमही पटकावली आणि तेव्हा वाटलं - ‘याचसाठी केला होता अट्टहास!’
खेळावर प्रचंड प्रेम, जिंकण्यासाठी लागणारे भरपूर कष्ट, मानसिक कणखरपणा आणि त्याचबरोबर स्वतः आणि कुटुंबानं केलेले त्याग या सगळ्या गोष्टींचे धागे घट्ट जुळून आले, की मगच अशी अतुलनीय कामगिरी होऊ शकते. ‘बिग थ्री’ क्लबच्या त्रिकूटाची गोष्टच वेगळी आहे.

चांगलं की वाईट?
रॉजर, राफा, नोवाक या तिघांचा टेनिस जगावर असलेला प्रभाव चांगला की वाईट याचं उत्तर देणं अवघड आहे. चित्रपटातल्या कोर्टात दाखवतात तसं ‘सिर्फ हां या ना मैं जवाब दो’ असं इथं लागू होणार नाही. दोन हजारच्या दशकातल्या सुरवातीची किंवा सध्याच्या महिलांच्या टेनिसमधली सातत्यानं विजेते बदलणारी परिस्थिती चांगली की ‘बिग थ्री’मुळं निर्माण झालेली सध्याची परिस्थिती चांगली? दोन्ही गोष्टी साइन वेव्हप्रमाणे अधूनमधून व्हायला हव्यात; पण त्यातही मत द्यायचं झालंच तर मी सध्याची परिस्थिती ‘अधिक चांगली’ मानेन. त्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांना ‘सुपरस्टार्स’ची गरज असते. ती एक भावनिक गरज आहे. लोकांना कुणीतरी सतत जिंकणारा अजिंक्य योद्धा हवा असतो. काही काळानंतर त्यांना एक आव्हानवीरही हवा असतो. कारण लोकांना स्पर्धा, रायव्हलरी बघायची असते. एकतर्फी पाडाव लोकांना नकोसे होतात. तसा तो त्यांना मिळतो आणि त्या दर्जेदार मंथनातून मग अविस्मरणीय सामने खेळले आणि बघितले जातात. रॉजर, राफा आणि नोवाकनी दीड दशक हा हमखास निकाल देणारा ‘प्लॉट’ यशस्वी करून दाखवला.
खेळाडू हे कोणत्याही खेळाचा गाभा असले, तरी खेळाच्या यशस्वीपणाचं गणित चाहत्यांभोवतीच फिरत असतं. ‘स्टार्स’ आणि त्यांचे ‘फॉलोअर्स’ नसतील तर खेळ जगाच्या तळागाळात पोचू शकत नाही. गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात फेडरर आणि जोकोविच नसते, तर ‘रेग्युलर’ चाहते वगळता किती प्रतिसाद मिळाला असता हा एक संशोधनाचा विषय होईल.

याचा अर्थ नवीन विजेते तयार व्हायला नकोत असा आहे का? तर तसं नाही. तयार व्हायला हवेतच; पण त्यांनी पुढं सातत्य दाखवायला हवं. एक-दोन वेळचे विजेते लोकांची तात्पुरती तहान भागवतील; पण मोठा चाहतावर्ग निर्माण होणार नाही आणि पर्यायानं ते लोकांना नेहमी सामने बघायला उत्सुक करू शकणार नाहीत. लोकांना तरुण खेळाडू चांगला खेळताना बघायला आवडतो; पण त्यांच्या स्टारविरुद्ध जिंकताना बघायला आवडत नाही. मात्र, तोच नवीन मुलगा पुढं जेव्हा सातत्यानं जिंकायला लागतो, तेव्हा तेच लोक त्याचे चाहते बनू शकतात. तटस्थपणे विचार केला, तर ‘सुपरस्टार’ बनणारा कुणी विजेता आणि आव्हानवीर निर्माण होणार असेल, तरच हे बदल होणं खेळाच्या दृष्टीनं चांगलं आहे. केवळ, आता बदल घडायला हवा किंवा करायला हवा म्हणून उपयोग नाही. प्रत्येक स्पर्धेत निराळा विजेता ही गोष्ट त्या खेळाडूसाठी आयुष्यभर पुरेल इतकी पुंजी ठरेल; पण एकूण ही अस्थिरता खेळासाठी फार पोषक नाही.

थोडक्यात, खांदेपालट व्हायची वेळ झालेली आहे; पण सध्याचे भोई अजूनही थकलेले नाहीत आणि त्यांना पालखी खाली ठेवायचीही नाहीये. नवीन उमेदवार येणार असतील तर स्वागत आहेच; पण जबाबदारी घेतली तर पालखी डळमळीत होणार नाही याची काळजी त्यांनाच घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com