भंगलेलं स्वप्नं (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं.

रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी अमृतसरमध्येच केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) ‘उपमहानिरीक्षक (डीआयजी),ऑपरेशन्स’ म्हणून रुजू झालो. हे पद नव्यानंच निर्माण झालं होतं. अमृतसर जिल्ह्यातल्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्याची जबाबदारी मुख्यत्वे सीआरपीएफवर टाकण्यात आली होती. हा नवा सेटअप आम्ही इरिगेशन विभागाच्या कॅनॉल रेस्ट हाउसमध्ये उभारला होता. आमचे महानिरीक्षक के.पी.एस. गिल यांचं कार्यालयही याच परिसरात होतं. कार्यालयाच्याच एका भागात ते राहत असत. रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या भागात माझं कार्यालय होतं आणि मीदेखील बाजूच्याच एका खोलीत राहत असे. नियंत्रणकक्ष दोन्ही कार्यालयांच्या मध्ये होता. नियंत्रणकक्षातले कर्मचारी रात्रंदिवस अमृतसर जिल्ह्यात तैनात केलेल्या सीआरपीएफच्या बटालियन्सच्या आणि त्यांच्याद्वारा जिल्ह्यात गस्तीवर असणाऱ्या किंवा नाकाबंदी करणाऱ्या सीआरपीएफच्या कंपन्या आणि प्लाटून्सच्या संपर्कात राहायचे.

वडिलांबरोबर रणजित पहिल्यांदा माझ्या नव्या कार्यालयात आला तेव्हा ती छोटीशी जागा पाहून तो जरा खट्टू झाला होता. मीदेखील नेहमीच्या पोलिसी गणवेशाऐवजी लष्करी पद्धतीच्या गणवेशात होतो. अमृतसरचा वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून मी जिथं काम करत होतो ते कार्यालय यामानानं कितीतरी मोठं आणि वेल-फर्निश्‍ड् होतं असं त्यानं बोलून दाखवलं.
‘‘नोकरीत आणि एकंदर आयुष्यातही आपल्या भूमिका सतत बदलतात. आताची माझी भूमिका वेगळी आहे. इथं पोलिसांच्या नेहमीच्या कामाऐवजी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहिमा आखणं हे माझं काम आहे,’’ मी त्याला समजावलं.
मला बाहेर जायचं असल्यानं सगळ्यांसाठी आणलेले लाडू वाटून झाल्यावर थोडा वेळ थांबून ते निघाले. मी रणजितला आणि त्याच्या वडिलांना शुभेच्छा देऊन संपर्कात राहण्यास सांगितलं.

नंतरही रणजित अधूनमधून येत राहिला. दहशतवाद्यांना सामील झालेल्या त्याच्या मित्रांबरोबरचा संपर्क त्यानं आता कमी केला होता. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यानं लखनौ विद्यापीठात प्रवेशही घेतला होता. ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड’ या न्यायानं तो लांब जात होता हे एका अर्थानं चांगलं होतं. त्याच्या दहशतवादी मित्रांनी त्याला काही शूट आऊट्समध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यानं मला एका भेटीत सांगितलं होतं: पण तो त्यांच्या दबावाला बळी पडला नाही. नागरिकांच्या हत्या करणं हे प्रेम आणि सर्व धर्मांचा आदर राखायला शिकवणाऱ्या शीख धर्माच्या तत्त्वांशी विसंगत आहे, असं त्यांना सांगण्याचाही त्यानं प्रयत्न केला. ‘‘मित्रांना माझं ते बोलणं आवडलं नाही; पण मी एआयएसएसएफचं काम व्यवस्थित सांभाळत असल्यानं त्यांनी माझं बोलणं सहन केलं,’’ तो सांगत होता. शिक्षणासाठी लांब जाणं गैरसोईचं होतं; पण त्याच्या अचानक नाहीसं होण्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांना फारसा फरक पडला नव्हता.

सुटीवर आल्यावर तो थोड्या वेळाकरता तरी मला भेटून जात असे. सुवर्णमंदिरात प्रार्थनेला गेल्यावर तिथल्या मित्रांनाही भेटत असे. त्याच्याशी होणाऱ्या गप्पांमधून मला सुवर्णमंदिराच्या परिसरात काय चाललं आहे आणि मुख्य म्हणजे, खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांच्या जवळ गेलेल्या स्टुडंट्स फेडरेशनचा थिंक टँक समजल्या जाणाऱ्या लोकांच्या मनात काय आहे याचाही अंदाज येत असे. फेडरेशनच आता या सगळ्या गटांचं मध्यवर्ती केंद्र बनलं होतं. त्यांच्याशी होणाऱ्या बोलण्याबद्दल रणजितकडून जी माहिती मिळायची तीवरून दहशतवाद्यांच्या हालचालींचं विश्‍लेषण करायला मदत होत असे.

दरम्यानच्या काळात दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आम्ही आमच्या परीनं दहशतवाद्यांशी मुकाबला करत होतो. सुवर्णमंदिराच्या परिसरातला दहशतवाद्यांचा मुक्त वावर पाहून मी अस्वस्थ होत असे. विशेषतः ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झाल्यानंतरसुद्धा अशा कारवाईला सरकार का परवानगी देत नाही असा प्रश्न पडायचा; पण परिस्थिती आमच्या विरोधात जाते आहे, समस्या येत आहेत हे दिसत असतानाही निष्ठावान सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हीही कधी प्रश्न विचारले नाहीत.
प्रत्येक वेळी रणजित आल्यानंतर गप्पा व्हायच्या; पंजाबमधली परिस्थिती, सुवर्णमंदिराचा परिसर, तिथले वेगळेवेगळे ग्रूप, दहशतवाद्यांच्या हालचाली, त्यांचे अंतःप्रवाह या सगळ्यांविषयी आम्ही बोलायचो. रणजितशी बोलल्यानं आणखी एक दृष्टिकोन समोर यायचा - पंजाबमधल्या तरुण पिढीची त्या वेळची मन:स्थिती. तरुणांच्या मनात नेमकं काय चाललं आहे त्याचा मला अंदाज यायचा.
पंजाबमधलं राजकारणही या काळात वेगानं बदलत होतं. शिरोमणी अकाली दल-भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थिर होण्याच्या प्रयत्नात होतं; पण दहशतवादाविरुद्ध परिणामकारक उपाययोजना करण्यात मात्र ते सरकार फारच कमी पडत होतं.
अनेकांच्या आशा जागवत सप्टेंबर १९८५ मध्ये सत्तेवर आलेलं हे सरकार अखेरीस ११ मे १९८७ या दिवशी बरखास्त करण्यात आलं. पंजाबात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. सिद्धार्थ शंकर रे पंजाबचे नवे राज्यपाल झाले. ते मुरब्बी राजकारणी होते. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना तिथला नक्षलवाद्यांचा हिंसाचार त्यांनी हाताळला होता. दहशतवाद्यांशी प्रत्यक्षपणे दोन हात करताना, सामान्य नागरिकांचा विश्वास मिळवणं, त्यांच्या मनात आणि हृदयात स्थान निर्माण करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं याची त्यांना जाणीव होती. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाया करतानाच, दहशतवाद्यांकडून होणाऱ्या अत्याचारांना जाहीरपणे वाचा फोडणाऱ्या सभाही आयोजित करण्यात येत होत्या. स्वतः राज्यपालांचा आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग असायचा. दहशतवाद्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या स्थानिक नेत्यांना या सभांमध्ये बोलण्यास आमंत्रित केलं जायचं. मवाळ अकाली नेत्यांबरोबर काँग्रेस, कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे नेते, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते एकाच व्यासपीठावरून दहशतवाद्यांविरुद्ध मतं व्यक्त करत असत. या सभांमुळे, शीख समाजावर अन्याय होत असल्याचा खोटा, काल्पनिक, अतिशयोक्तीपूर्ण प्रचार करणाऱ्या दहशतवाद्यांपासून सामान्य लोक फटकून वागायला लागले.

रणजितचा कायद्याचा अभ्यास व्यवस्थित चालला होता. वेळच्या वेळी तो चांगल्या मार्कांनी पास होत होता. दिवस जसजसे पुढं सरकत होते तसतशा हिंसाचाराच्या घटनाही घडत होत्या. सन १९८८ च्या मे महिन्यात एक दिवस मी सुवर्णमंदिराच्या परिसरातल्या सीआरपीएफच्या चौक्‍यांची पाहणी करत असताना मंदिरपरिसरात मोर्चे लावलेल्या दहशतवाद्यांनी माझ्यावर गोळीबार केला. जबड्याला गोळी लागून मी गंभीर जखमी झालो. आम्हीही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. त्यातूनच पुढं ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर -२’ घडलं; पण त्याबाबत मी नंतर सांगेन. आत्ता आपण मुख्य राष्ट्रीय प्रवाहात परत येण्याचा आणि मधल्या काळात झालेलं आपलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रणजितबद्दल चर्चा करतो आहोत. त्या वर्षी मी त्याला भेटू शकलो नाही; पण पुढच्या वर्षी मात्र त्यानं फोन करून ‘भेटायला येतो आहे,’ असं सांगितलं.

माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे रणजितला धक्का बसला होता. त्यानं मला भावनांनी ओथंबलेलं एक पत्रही लिहिलं होतं. अर्थातच त्या वेळी मी त्या पत्राला उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हतो; पण माझ्या चेहऱ्याला फार गंभीर दुखापत झाली नाही, मुख्य म्हणजे डॉक्‍टरांनी माझ्या चेहऱ्यावर हल्ल्याची कोणतीही मोठी खूण राहू दिली नाही म्हणून त्याला बरं वाटत होतं. मी हसून त्याला म्हटलं : ‘‘रणजित अरे, आपण कसे दिसतो याला फार काही महत्त्व नसतं. आयुष्यात केव्हा ना केव्हातरी चेहरा सुरकुतणारच आहे.’’ तो अजून खूप तरुण असल्यानं त्याला माझं म्हणणं पटलं नाही.
सुवर्णमंदिरात प्रार्थनेसाठी गेल्यावर त्याचे जुने मित्र त्याला भेटत असत. माझ्यावरच्या हल्ल्यानंतर मे १९८८ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर-२’ मुळे त्यांचा खरा चेहरा समोर आल्यानं त्यांना शरम वाटत होती, असंही मला त्याच्याकडून समजलं.

लखनौमधल्या वास्तव्यानं रणजितचा धर्माकडे आणि देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साफ बदलला होता. शीख समाजावर अन्याय होतो आहे असा त्याचा समज होता; पण लखनौमध्ये त्याला अशी कोणतीच भावना कधी जाणवली नाही. तिथं त्याला त्याच्यावर प्रेम करणारे मित्र, शिक्षक मिळाले होते. राखीपौर्णिमेच्या दिवशी त्याच्या बहिणी दूर कुठंतरी असतात म्हणून एका हिंदू मुलीनं त्याला राखीही बांधली होती. ‘‘लखनौचे लोक खरंच खूप प्रेमळ आणि चांगले आहेत. इथं अमृतसरमध्येही मला त्यांची खूप आठवण येते आहे,’’ असं तो म्हणायचा.
‘‘भारत नावाचं ‘कोडं’ समजून घ्यायला थोडा वेळ लागतोच,’’ मी त्याला समजावण्याच्या सुरात म्हणायचो.
रणजित आता अमृतसरमध्ये वकिली सुरू करण्यासाठी नावनोंदणी करण्याच्या प्रयत्नात होता. तो योग्य मार्गावर आहे हे पाहून मला आणि त्याच्या घरच्यांनाही बरं वाटत होतं. त्याच्या बीएड झालेल्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचाही विचार घरात सुरू होता.

रणजितचे विचार खूपच बदलले होते. आता तो पूर्वीसारखा कट्टरवादी राहिला नव्हता. हिंसाचार आणि हत्या त्याच्या लेखी निषेधार्ह होत्या. सुवर्णमंदिराच्या परिसरात राहणाऱ्या त्याच्या मित्रांच्या दहशतवादी कृत्यांबद्दल त्याच्या मनात तिटकारा होता. त्याच्या आधीच्या सगळ्या मतांच्या बुडाशी काल्पनिक भीती होती, तशी परिस्थिती नव्हतीच, हे त्यानं एकदा अशाच गप्पा मारताना कबूल केलं. त्याला आधी वाटायचं तसं भारतात शिखांना दुय्यम वागणूक मिळते हे मत आता तो खोडून काढायचा. लखनौच्या अनुभवानं त्याची मतं पार बदलून गेली होती.
असाच एक दिवस त्याचा फोन आला. तो बराच क्षुब्ध दिसत होता. आदल्या दिवशी रात्री काही जुन्या कट्टर दहशतवाद्यांनी घरी येऊन त्याला पुन्हा शस्त्र घेऊन संघर्षात सामील व्हायला सांगितलं होतं. रणजितनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
‘‘साहेब, मी त्यांना एवढंही सांगितलं की आता मी वकील झालो आहे, मी त्यांच्या केसेस चालवेन.’’

पण त्या दहशतवाद्यांनी त्याचं काही ऐकलं नाही. ‘‘कोर्टात आमच्या केसेस लढवायला खूप वकील आहेत. आम्हाला तू आमच्याबरोबर लढायला हवा आहेस. जिवंत राहायचं असेल तर तुला आमच्यात सामील व्हावं लागेल. तू तुला हवं तेव्हा आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस. हा ‘पंथक कमिटी’चा आदेश आहे. तो तू नाकारलास तर तुझ्याबरोबरच तुझे कुटुंबीयही संकटात सापडू शकतात,’’ त्यांनी रणजितला सुनावलं. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याला स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायचं होतं; पण त्यानं अशी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये असं मला वाटत होतं.
त्या दिवशी रात्री काय झालं ते नेमकं कुणालाच समजलं नाही. जवळच्या गावातल्या लोकांनी त्या रात्री गद्दरज़ादा गावातल्या त्या एकाकी शेतघरातून येणाऱ्या किंकाळ्या आणि जबरदस्त गोळीबाराचे आवाज ऐकले. नंतर सगळीकडे शांतता पसरली. थोड्या वेळानं पोलिसकुमक तिथं पोचली. पोलिसांनी नियंत्रणकक्षाला कळवलं : ‘‘गद्दरज़ादा गावाच्या हद्दीत अनोळखी दहशतवाद्यांनी एका डेऱ्यावर हल्ला करून मास्टर गुरदीपसिंग, त्यांची पत्नी, २३ वर्षांचा मुलगा रणजितसिंग आणि चार मुलींची गोळ्या घालून हत्या केली आहे. हल्ल्याचा उद्देश समजलेला नाही. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.’’

चार वर्षांपूर्वी सुरू झालेली रणजितसिंगची कहाणी इथं संपते.
हे हत्याकांड घडलं तेव्हा मी एका बैठकीसाठी दिल्लीत होतो. तातडीनं परतणं शक्‍य नव्हतं; पण आल्यावर मी लगेच गद्दरज़ादाला गेलो. रणजित किंवा त्याच्या वडिलांशी माझा काँटॅक्‍ट होता याची तिथं कुणालाच कल्पना नव्हती. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊन गेले होते; पण चितेची धग अजून कायम होती. मी तिथंच एका चारपाईवर बसलो. अजून मी धक्‍क्‍यातून सावरलो नव्हतो. चार वर्षांची कहाणी किती अचानकपणे संपवली गेली होती. शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. मी भावनाप्रधान माणूस आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला; पण अश्रू थांबवणं अवघड झालं होतं. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसत मी उठून माझ्या कारकडं जाताना त्या हत्याकांडाचा तपास करणारे कत्थू नंगलचे नवे ठाणेदार माझ्यासोबत कारपर्यंत आले.
‘‘जनाब, तुमचं-त्यांचं काही नातं होतं का?’’ त्यांनी विचारलं. आधी मी ‘नाही’ म्हणालो; पण मग ‘हो’ म्हणत कारमध्ये बसलो.
परमेश्‍वरानं आपल्यासाठी जे योजलेलं असतं त्याकडं आपल्याला आपलं दैव घेऊन जातं असं मला आता मागं वळून पाहताना वाटतं. रणजितला मुख्य प्रवाहात आणण्यात मी यशस्वी झालो होतो; पण मी त्याला त्याच्या शेवटाकडे ढकलतो आहे अशी जाणीव मला मुळीच नव्हती. त्याच्या कुटुंबातलंही कुणी वाचलं नाही. ही दुर्दैवी कहाणी सांगायलाही कुणी उरलं नाही. आजही त्या आठवणीनं मला फार वाईट वाटतं. माझ्या मनाची ही स्थिती मी कुणाला सांगूही शकलो नाही. मारेकऱ्यांनी संपवलेल्या त्या अनाम नायकासाठी, अनसंग हीरोसाठी त्या रात्री मी खूप रडलो; पण आज माझ्या लक्षात येतं, पंजाबमध्ये प्रस्थापित झालेली शांतता हीच रणजितसारख्या या अनाम नायकांना खरी श्रद्धांजली आहे. आमेन.
(संपूर्ण)
===========
(या कथनातल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com