प्रतारणा (शर्मिला कारखानीस)

sharmila karkhanis
sharmila karkhanis

"ह्यां'च्या मुलाला मी माझाच मुलगा मानलं, अगदी मनापासून...सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं त्याला; पण मलाही आतून मातृत्वाची ओढ होतीच ना गं? पण नंतर काय, वयही सरलं होतं. शेवटी, मी वास्तव स्वीकारलंच होतं; पण आता सत्य स्वीकारणं फार जड जातंय गं! खूप कठीण जातंय!''

"आई, मला हे अजिबात पटलं नाही! काहीही म्हण; पण तूं असं करायला नको होतंस. इतकी मोठी गोष्ट का लपवून ठेवलीस तू जिऊपासून?'' मी जरा तणतणतच आईच्या घरी, माझ्या माहेरी, आले. मी आणि आई दोघीही नुकत्याच जिऊला भेटून परत आलो होतो.
""अगं, मी तरी काय करणार?'' प्रत्यक्ष तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनी तिच्यापासून लवपून ठेवलं, तर मी तरी कसं सांगणार नं!''
""पण ती इतक्‍या विश्‍वासानं, प्रेमानं, तुझ्याबद्दलच्या आदरानं आपल्याकडं यायची...तुझ्याशी सगळं मनातलं बोलायची आणि तू मात्र... जाऊ दे!''
""सगळं खरंय गं! पण मला सांग, मी तिला खरं सांगितलं असतं अन्‌ त्या नवरा-बायकोमध्ये भांडणं झाली असती, कदाचित त्यांचा चांगला चाललेला संसार मोडला असता, तर त्याला कोण जबाबदार ठरलं असतं? मीच ना?''
""पण आई, तूच म्हणतेस ना, संसाराचा पाया एकमेकांच्या विश्‍वासावर उभा राहायला हवा, तेव्हाच तो भक्कम असतो म्हणून...!
""अगं हो! पण एका अर्थानं जिऊचा संसार तसाच होता, एकमेकांच्या विश्‍वासावर उभा राहिलेला!''

""आता मात्र कमाल करतेस हं आई तू. हा कसला विश्‍वास? ज्याला तू विश्‍वास म्हणतेस ना तो तर चक्क विश्‍वासघात आहे, विश्‍वासघात...''
""जाऊ दे, तुला नाही समजायचं, मला काय म्हणायचंय ते!''
""हो! असं म्हटलं की झालं! मी काही लहान नाहीय आता. चांगली दोन मुलांची आई आहे. काय झालं मला न कळायला? पण तुझ्याजवळ मुद्दा नसला, उत्तर नसलं की हे वाक्‍य तोंडावर फेकायचं माझ्या. तुला नाही समजायचं म्हणे!'' माझी तळमळ माझ्या सात्त्विक संतापात व्यक्त व्हायला लागली आणि आईनं ती बरोब्बर ओळखली.
माझ्या पाठीवर हात फिरवत, समजावणीच्या सुरात ती म्हणाली ः ""हे बघ, मी तुझी तळमळ समजू शकते...तर मग आता ऐकच. जिऊचा तिच्या नवऱ्यावर विश्‍वास होता, कारण एका मुलाचा बाप होता तो, त्यामुळे अविश्‍वासाचं काही कारणच नव्हतं. आमच्या पिढीत ही गोष्ट सर्रास चालायची आणि आपली बायको समंजस आहे, म्हणूनच तिला सत्य समजलं तरी ती आपल्याला समजून घेईल, माफ करेल हा त्यांना विश्‍वास होता.''
आईचं हे बोलणं ऐकून मी तिच्याकडं बघतच राहिले!
""तू बस, मी चहा करून आणते आपल्या दोघींसाठी,'' म्हणून आई आत निघून गेली.
आईच्या बोलण्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं.
मला आठवतं तसं सगळेजण तिला "जिऊ'च म्हणायचे. तिचं खरं नाव काय होतं कोण जाणे! ती माझ्या आईला ताई म्हणायची. कुठली तरी लांबची बहीण होती ती आईची. माझी मोठी भावंडं तिला जिऊमावशी म्हणायची. मी मात्र तिला कायम जिऊमाऊ म्हणायची. अगदी मोठेपणीसुद्धा! ती खूपदा आमच्या घरी यायची, त्यामुळे नातं थोडं लांबचं असलं तरी सहवासानं ती जवळचीच झाली होती. ती आली की आई तिला वेळेनुसार कशाकशाचा आग्रह करायची.

""अगं जिऊ, बरी वेळेवर आलीस. सगळ्यांची जेवणं झाली, आता मी बसतेच आहे जेवायला. चल आपण दोघी बसू...'' म्हणत एका हातानं आई तिचा पाट मांडायची.
""ही आत्ताच जेऊन आले बघ ताई'' जिऊ
""अगं फार काही नाही, माझ्याबरोबर दोन घास खा. मेथीची पळीवाढी भाजी केलीय बघ. चांगली लसणाची फोडणी घालून आणि ज्वारीची भाकरी आहे. चटणी किंवा ठेचा मात्र नाहीय आज. कच्चा कांदा घे हवा तर तोंडी लावायला,'' म्हणत आई तिला आपल्याबरोबर खायला लावायची.
दोघींचे असे प्रेमळ संवाद बऱ्याचदा घडायचे. मी आसपासच खेळत असायची. मध्येच येऊन धप्पकन्‌ मी जिऊच्या मांडीत घुसायची, तिच्या गळ्यात पडायची. तीही माझे लाड करायची आणि "दांडगोबा कुठला' म्हणून एखादा प्रेमळ धपाटाही घालायची पाठीत.
तर ही माझी जिऊमाऊ! स्वभावानं खूपच मऊ. भोळा भाव तर तिच्याकडं बघूनच कळावा. तिची नेहमी कसली कसली व्रतं, वैकल्यं, उपासतापास सुरूच असायचे. मी कधी कधी तिला विचारायची ः "काय होतं गं हे सगळं केल्यानं?' तर म्हणायची ः ""अगं, देव आपल्या इच्छा पुऱ्या करतो.'' मी विचारात पडायची, "आपण अभ्यास करण्यापेक्षा उपास केला तर आपला पहिला नंबर येईल का? आणि जर पुष्कळ जणांनी उपास केला तर त्या सगळ्यांचा कसा येईल पहिला नंबर?'
***

असेच दिवस जात होते. जिऊचं येणं थोडं कमी होत गेलं. माझेही शाळा, क्‍लास, अभ्यास वगैरे व्याप वाढले. जिऊ आली तरी जुजबी बोलणं होऊन मी आपल्या खोलीत निघून जायची. कधी कधी जिऊचा मुलगाही यायचा तिच्याबरोबर. मी बाहेरून आले की माझ्या पाठोपाठ तोही यायचा माझ्या खोलीत. मला ताई म्हणायचा. खूप लाघवी आणि शांत, तितकाच मितभाषीही. माझ्याकडं असलेल्या वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं त्यालाही आवडायची वाचायला.

काळ पुढं जातच होता. दरम्यान, माझंही लग्न होऊन मी सासरी गेले. यथावकाश मला दोन मुलं झाली. प्रसंगानुरूप जिऊच्या तेवढ्यापुरत्या गाठी-भेटी व्हायच्या इतकंच. माझं सासर-माहेर एकाच शहरात असल्यामुळे माहेरी अगदी उभ्या उभ्या येणं-जाणं व्हायचं. एकदा मात्र मला जरा मोकळा वेळ मिळाला. मुलं ट्रिपला गेली होती. आईकडं जरा निवांत गप्पा मारायला म्हणून गेले तर तिथं जिऊ आलेली. इतका आनंद झाला मला. पूर्वीसारखी धप्पकन्‌ तिच्या मांडीत तर नाही बसू शकले; पण कडकडून गळामिठी मात्र मारली तिला. तर तिची हाडं तितकीच कडकडून मला टोचली. तिनंही पूर्वीच्याच प्रेमानं मला थोपटलं. हालहवाल विचारणं झालं. मी म्हटलं ः ""अगं, कसली गं ही तब्येत तुझी? अजून उपासतापास सुरूच आहेत वाटतं तुझे?''
जिऊ म्हणाली ः ""अगं, कसलं काय, दिले सगळे उपास सोडून! त्या देवाला काही माझी इच्छा पुरी करवेना, मग मी तरी कशाला उपास करू?''
जोरजोरात हसत मी म्हणाले ः ""अगं, कसली एवढी इच्छा आहे तुझी अजून? चल, मी पुरी करते तुझी इच्छा!'' असं म्हणत मी आईकडं पाहिलं, तर तिनं मला डोळ्यांनीच दटावलं! माझ्या मनात पुन्हा प्रश्‍नचिन्ह! काही दिवसांनी हा प्रसंगही मी विसरून गेले.
आणि अचानक एके दिवशी जिऊचे यजमान गेल्याचं कळलं. त्या वेळी नेमके आम्ही सहकुटुंब दोन-तीन दिवस बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर मी ताबडतोब आईला घेऊन जिऊला भेटायला तिच्या घरी गेले.
***

माझी लाडकी जिऊमाऊ पुरती खचून गेली होती. आधीच अशक्त, त्यात हे दुःख! अशा वेळी मला तर शब्दांनी सांत्वन करताच येत नाही. मी तिच्याजवळ बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले...बराच वेळ...निःशब्द. ती पण शांत, स्तब्ध! मला वाटलं होतं, मला पाहून तिला परत उमाळा यईल, ती रडेल; पण तिचे डोळे मला काहीतरी वेगळंच सांगत होते. ती खूप खूप दुःखी आहे हे तर जाणवत होतंच; पण आणखीही काहीतरी असावं...नक्कीच...! तिला काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं...तिचा मुलगाही आजूबाजूला वावरत होता. तिला त्याचा आणि त्याला तिचा खूप आधार होता. प्रेम होतं, लळा होता. असणारच! तो मुलगाच होता ना तिचा! आता एकदम कर्ता पुरुष झाल्यासारखा गंभीर दिसत होता. थोडा वेळ तिथं घुटमळत राहिला आणि नंतर काहीतरी किरकोळ निमित्त काढून बाहेर गेला.
तो बाहेर गेलेला पाहून जिऊ एकदम माझ्या गळ्यात पडली आणि धाय मोकलून रडायला लागली. मी तिला रडू दिलं थोडा वेळ. आईनं उठून पाणी आणून दिलं. थोडी शांत झाल्यावर ती आपण होऊनच बोलायला लागली.

""तू आता मोठी झालीस, लहान असताना मला विचारायचीस ना, उपास केल्यानं देव खरंच पावतो का? नाही गं, नाही! देवाचाही कधी कधी निरुपाय व्हावा, अशी परिस्थिती आपणच निर्माण करून ठेवत असतो. म्हणूनच अशी अपत्यहीनता, वांझपणा आला ना माझ्या नशिबी?''
""असं का म्हणतेस जिऊमाऊ? आहे ना तुला एक मुलगा! एवढा चांगला, प्रेमळ, सुस्वभावी, कर्तबगार...''
""हो, आहे ना! पण तो माझा नाहीय. अगं, माझ्या माहेरची गरिबी...त्यामुळे माझं, आम्हा सगळ्याच भावंडांचं शिक्षण जेमतेम, गरजेपुरतं. रूपही चारचौघींसारखं. म्हणून माझं लग्न बिजवराशी लावून दिलं, तेही एका मुलाचा बाप असलेल्या माणसाशी. बाबांनी त्यांची एक जबाबदारी कमी केली.''
""काय सांगतेस? मला हे माहीतच नव्हतं,'' असं म्हणत मी आईकडं प्रश्‍नार्थक पाहिलं. आईनंही माहीत असल्यासारखा मानेनंच होकार भरला.
जिऊ बोलतच होती ः ""अगं, ही गोष्ट काय खिरापत वाटल्याप्रमाणे सांगत फिरायची गोष्ट होती का? त्यातून माझं लग्न झालं तेव्हा तू तर लहानच होतीस. सुरवातीला वाटलं, आपल्यालाही मूल होईल म्हणून पहिली दोन-तीन वर्षं वाट पाहिली. मग मात्र मला लोकांच्या नजरा आणि प्रश्‍न छळायला लागले. वैद्यकीय तपासणी करून घ्यायचा विचार आला. "ह्यां'च्या बाबतीत तो प्रश्‍नच नव्हता. कारण, त्यांना एक मुलगा होताच ना! तपासणीअंती माझ्यातही काही दोष नसल्याचं निष्पन्न झालं. मला त्यातल्या त्यात समाधान वाटलं.''
""पण मग, तू हे आत्ता का सांगत्येस, जिऊमाऊ?''
""मला बोलू दे...मध्ये मध्ये थांबवू नकोस.''
""सॉरी, बरं मग? पुढं...''
पुन्हा एक-दोन वर्षं वाट पाहिली. नंतर मात्र मी शक्‍य तेवढे सगळे वैद्यकीय उपाय केले. खूप डॉक्‍टर्स झाले. भरपूर पैसा खर्च केला. काय काय नाही केलं मी...? उपचारांबरोबरच उपासतापास, देव-देव, व्रतं-वैकल्यंही खूप केली. तीर्थयात्रा केल्या. हसशील मला; पण साधू-बैरागी-मांत्रिक, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, ताईत... सगळं सगळं केलं...अगदी जिद्दीला पेटून! "ह्यां'नीही मला कधी अडवलं नाही.''
हे सांगताना ती पुन्हा फुटून रडायला लागली आणि पुन्हा स्वतःच शांत होऊन बोलायला लागली. ""सासूबाई, सासरचे सगळेच नातेवाईक, एवढंच नाही तर, माहेरचेही नातेवाईक माझ्या "वांझ'पणाबद्दल मला टोचून बोलायला लागले. खरं तर यात माझा काय दोष होता? असलाच तर माझ्या नशिबाचा दोष होता.
"ह्यां'च्या मुलाला मी माझाच मुलगा मानलं, अगदी मनापासून...सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं त्याला; पण मलाही आतून मातृत्वाची ओढ होतीच ना गं? पण आता तर काय, वयही सरलं होतं. मी वास्तव स्वीकारलंच होतं; पण आता सत्य स्वीकारणं फार जड जातंय गं! खूप कठीण जातंय!''

""म्हणजे?'' काही न कळून मी विचारलं.
""माझी प्रतारणा केली गं "ह्यां'नी! आत्ता "ह्यां'च्या शेवटच्या आजारपणात खूप सेवा केली मी त्यांची; पण त्यांनी मला काय दिलं? वंचना-फसवणूक-प्रतारपणा...हो, प्रतारणाच. घोर प्रतारणा.
माझ्या मुलालाच काय; पण कुणाही नातेवाइकांना न सांगण्याचं वचन माझ्याकडून घेतलं आणि मरता मरता मला सांगितलं...म्हणाले ः ""मी तुझा घोर अपराधी आहे, मी तुला मूल दिलं नाही...तू खूप उपासतापास केलेस, वैद्यकीय तपासण्या करून घेतल्यास, उपचारही करून घेतलेस आणि मीही तुला ते सगळं करू दिलं. कारण, जगाच्या दृष्टीनं मी बाप व्हायला समर्थ होतो; पण...पण...माझी पहिली बायको बाळंतपणातच गेली. तिच्या मृत्यूनंतर मी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती. मी तुझा अपराधी आहे...पण खरंच सांगतो, मी तुझ्या आई-बाबांना हे सांगितलं होतं. कारण, मला कुणाला फसवायचं नव्हतं गं!''
मी हादरल्यासारखी स्तब्ध झाले. जिऊ पण बराच वेळ गप्प राहिली, मग म्हणाली ः
"""ह्यां'नी हे सांगितलं मात्र...आणि माझ्याभोवती सारे नातेवाईक मला "वांझोटी", 'वांझोटी' म्हणत गरागरा फिरत असलेले मला दिसले. असं माझं हे "वांझोटं वांझपण' होतं, नसूनही असलेलं...! मरताना तरी "ह्यां'नी का गं सांगितलं हे मला? का? का? काय मिळवलं हे सांगून?
अज्ञानातच राहिले असते तर हे प्रतारणेचं दुःख तरी नसतं झालं! आणि माझे जन्मदाते आई-वडील? त्यांनीही...??
जिऊ असं म्हणाली मात्र आणि तिथंच मला ठेच लागली. माझ्या मनात आलं, माझ्या आईनंही तेच केलंय. आईसुद्धा जिऊची तितकीच अपराधी आहे.
क्षणभर माझं जिऊच्या बोलण्याकडं दुर्लक्ष झालं होतं. ती मात्र बोलतच होती...
""माझी मातृत्वाची तडफड माझ्या मातेलाही कळू नये? मी फक्त विधवा नाही झाले गं! जगात सगळ्यात जवळचं नातं असणाऱ्या तिघांनीही, आई-वडील-नवरा, माझ्या पुऱ्या आयुष्याची चिरफाड केली. आता हे प्रतारणेचं प्रचंड दुःख झेलत शेवटच्या श्‍वासाची वाट पाहायची...''

एवढं बोलून जिऊन टाहो फोडला. त्याच वेळी तिचा मुलगा दारात येऊन उभा राहिला. आईला रडताना पाहू मला म्हणाला ः ""ताई, मी तुझा खूप आभारी आहे...खरंच, तुझे खूप उपकार झाले. बाबा गेल्यापासून आई रडलीच नव्हती. डॉक्‍टरांनी सांगितलं होतं की त्या रडल्या नाहीत तर भ्रमिष्ट होतील... आणि खरं सांगू? मला तिच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते. खूप खचून गेल्यासारखे, हरल्यासारखे, दुःखापेक्षा उपेक्षेचे, वंचना झाल्याचे...कुणीतरी प्रतारणा केली असल्यासारखे...''
अगदी अस्सच जाणवलं होतं मलाही!
जिऊच्या डोळ्यात होते कुणीतरी प्रतारणा केल्याचे भाव...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com