vishnu manohar
vishnu manohar

वैदर्भीय खाद्यसंस्कृती (विष्णू मनोहर)

वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी..

महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य प्रांतात होता. बुलढाणा या जिल्ह्यापासून ते भंडारा जिल्ह्यापर्यंत एकूण आठ जिल्ह्यांचा हा प्रदेश वऱ्हाड किंवा विदर्भ म्हणून ओळखला जातो. विदर्भात कापूस, तांदूळ, गहू, मूग, तीळ, ज्वारी, तूर, संत्री आदी प्रमुख पिकं आहेत. त्यात आता सोयाबीनचीही भर पडलेली आहे. याशिवाय, पावसाळ्यानंतर मका, घोळ, तरोटा, विविध प्रकारच्या भाज्या खूप पाहायला मिळतात. इथली 70 टक्‍के जमीन सुपीक आहे. याशिवाय कोळशाच्या, अभ्रकाच्या खाणीही या प्रदेशात आहेत. भारतातलं उच्च प्रतीचं सागवान लाकूड इथं आहे. चारही बाजूंनी जंगल, त्यात सहा व्याघ्रप्रकल्प असल्यानं पर्यटकांची संख्याही वाढलेली आहे. विदर्भात आणि मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या भागात पाटील, देशमुख मोठ्या संख्येनं होते. ही संख्या सध्याही काही प्रमाणात दिसते. मूळ मालगुजारी आणि सावकारी हा त्यांचा व्यवसाय. इथं पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे तिन्ही ऋतू तीव्र असतात म्हणूनच कदाचित हा अतिरेक इथल्या मंडळींच्या खाण्या-पिण्याच्या सवयीतसुद्धा दिसतो.

चमचमीत व तिखट खाण्याबाबत विदर्भाची प्रसिद्धी आहे. इथल्या भाज्यांमध्ये तिखटाचं प्रमाण जसं जास्त असतं, तसंच तेलाचं प्रमाणही बरंच असतं. मुख्यत्वेकरून जवसाचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरण्याची पद्धत एकेकाळी होती, पण आता वेगवेगळ्या प्रकारचं तेल लोक वापरतात. वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. अगदी गुरू गोविंदप्रभूंच्या "लीळाचरित्रा'तही अनेक पारंपरिक पाककृतींचा उल्लेख आढळतो. पु. ल. देशपांडे यांनीही या पाककृतींचं वर्णन केलेलं आहे. बिनधास्त, बेधडक, रांगड्या व्यक्तिमत्त्वाचे इथले लोक येणाऱ्या-जाणाऱ्यांशी सहज ओळख करून घेत तंबाखूची डबी काढून "चुन्याची पुडी आहे का जी?' असं विचारणारे! "विदर्भातलं जेवण म्हणजे जहाल तिखटच,' असं कित्येकांना वाटतं; पण तसं नाही. काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र, इथला सुविख्यात असा "सावजी' प्रकार तिखटच असतो, हे खरं.
"सावजी' हा चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचाच. नागपूरला गेलेल्या खवय्यांना हा पदार्थ नेहमीच आवडतो. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी कोष्टी समाजबांधवांनी "सावजी' या प्रकाराला नागपुरात जन्म दिला. पूर्वी नागपूर मध्य प्रदेशात होतं, याचा उल्लेख वर आलेला आहेच. कोष्टी मंडळी मूळची मध्य प्रदेशातल्या मुलताई, बैतूल, पांढुर्णा, छिंदवाडा आदी भागांतली. हातमाग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. विदर्भ हा प्रदेश कापसासाठी प्रसिद्ध होता, त्यामुळे नागपुरात त्या काळी भरपूर कापडगिरण्या असल्यामुळे हातमागाचा व्यवसाय साहजिकच जोरात होता. परिणामी, पोटापाण्यासाठी कोष्टी बांधव नागपुरात आले. यातलेच काही लोक सोलापुरातही गेले. मात्र, सोलापुरातल्या "सावजी'ची चव वेगळी आणि विदर्भातल्या "सावजी'ची चव वेगळी. नागपुरात ही मंडळी वेगवेगळ्या भागांत स्थिरस्थावर झाली. दिवसभर कापडगिरण्यांमध्ये मेहनत केल्यानंतर रात्री हे कोष्टी बांधव एकत्र येत. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी त्यांना काहीतरी विरंगुळा हवा असायचा. मग काय करायचं, तर विविध खेळ खेळले जायचे. "चविष्ट भोजन तयार करण्याची स्पर्धा घ्यायची', अशी कल्पना नंतर पुढं कधीतरी कुणाच्या तरी डोक्‍यात आली. सर्वांना ही कल्पना पटली; पण तयार काय करायचं? बदल म्हणून रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं चमचमीत असलं पाहिजे, असं ठरलं. मग मांसाहारी पदार्थ तयार करण्याचं निश्‍चित झालं. चिकन, मटण शिजवलं गेलं; पण एवढ्यावरच हे बांधव थांबले नाहीत. नंतर कुणी तरी बोकडाच्या खुराची भाजी तयार करायला सुरवात केली. जे मासांहारी नाहीत त्यांच्यासाठी शाकाहारी पद्धतीचे किती तरी वेगवेगळे पदार्थ तयार झाले. इथूनच खऱ्या अर्थानं "सावजी'ला सुरवात झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बाहेरसुद्धा "सावजी' प्रकारच्या जेवणाचा उल्लेख केला जातो.

काही गावं व काही सणवार यांची नाळ ठराविक पदार्थांशी जोडली गेलेली असते. भंडारा, सकोली, चंद्रपूर, नवरगाव, भद्रावती, वरोरा या भागांत लाल भोपळा मोठ्या प्रमाणावर पिकतो व हा भाग कोहळी शेतकऱ्यांचा आहे. ज्याप्रमाणे जळगावात कुठल्याही लग्नात वांग्याची भाजी आवश्‍यक असते, त्याचप्रमाणे या कोहळी जमातीतल्या लग्नात लाल भोपळ्याची भाजी केली जातेच. तिलाच कोहळ्याची भाजी किंवा कोहळ्याची गाखर-भाजी असं म्हटलं जातं. परतवाड्याजवळ बहिरामबाबांची जत्रा भरते. या जत्रेचा देव बहिरामबाबांना मटणाचा/चिकनचा नैवेद्य दाखवला जातो, हे या जत्रेचं वैशिष्ट्य. डोंगराच्या पायथ्याशी ही जत्रा भरते. तिथं 1 किलो, 2 किलो, अर्धा किलो मटण मावेल अशी मातीची भांडी विकत मिळतात. जवळच मटण/चिकनसुद्धा मिळतं. जेवढा नैवेद्य दाखवायचा आहे, त्या प्रमाणात मटण/चिकन व मातीचं भांडं घेऊन ते जत्रेतल्या टपरीवर दिलं जातं. तिथले लोक त्या त्या हिशेबानं तेल, मीठ, मसाला घालून मटण शिजवून देतात. नंतर हा नैवेद्य बहिरामबाबांना दाखवला जातो. नंतर मैदानात बसून हा नैवेद्य पोळ्यांबरोबर फस्त करायचा हा इथला रिवाज! काही करमणुकीचे खेळसुद्धा इथं खेळले जातात. म्हणजेच जत्रेबरोबर सहलीचासुद्धा अनुभव इथं येणाऱ्यांना मिळतो. या गावची आणखी एक गंमत म्हणजे, या गावात पूर्वी एक दगड होता व त्या दगडाची अजूनही पूजा केली जाते. या जत्रेत येणारे लोक त्या दगडाला लोणी व शेंदूर चढवतात. त्या कारणानं या दगडाची उंची आता 5 फूट इतकी झालेली आहे. आता इथं केवळ खाण्याच्याच नव्हे, तर अन्य वस्तूंचाही बाजार लागलेला दिसतो. ही जत्रा जानेवारीत सुरू होते. अमरावतीहून 30 किलोमीटरवर ही जत्रा भरते.

आमच्या विदर्भात पूर्वी रोडग्याची प्रथाही मोठ्या प्रमाणात होती. कुठलाही नवस बोलायचा असेल तर "माते, अमुक अमुक काम कर...मी तुला रोडगा वाहीन' असा नवस बोलला जायचा. बुलढाण्यातल्या पळशीच्या महादेवमंदिरात महाशिवरात्रीला दहा किलो पिठाचा रोडगा केला जातो. त्या दिवशी त्यात सुका मेवाही घातला जातो.
याशिवाय, विदर्भात वऱ्हाडी पद्धतीचं जेवणही प्रसिद्ध आहे आणि या जेवणावर तेलंगी पद्धतीचा प्रभाव आहे, तो यासाठी की विदर्भातले चंद्रपूर, गडचिरोली, अदिलाबाद हे भाग तेलंगणाच्या लगतच आहेत. स्वयंपाक करणारी तेलंगणातली माणसं विदर्भात आली आणि त्यांचं नामकरण झालं "तेलंगी आचारी'. याची सुद्धा एक सुरस आख्यायिका आहे, ती अशी : महाभारतातला भीम जेव्हा त्याचा "बल्लवाचार्या'चा वेश त्यागून सामान्य झाला त्या वेळी त्यानं त्याच्या जवळचे झारे, सराटे (उलथणी, उचटणी), स्वयंपाकाची भांडी एकत्र केली आणि त्याच्या भल्या मोठ्या उपरण्यात ती बांधली व ते बोचकं तेलंगणात फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी लोकांनी ते बोचकं पाहिलं. "आपण स्वयंपाकी व्हावं यासाठी देवानं हा आपल्याला दिलेला आशीर्वादच आहे,' असं तिथल्या लोकांना ते बोचकं पाहून वाटलं आणि त्यामुळे इथले लोक पिढ्यान्‌पिढ्या स्वयंपाकी झाले. आपल्या इथल्या पद्धतीप्रमाणे चिंचेबरोबर गूळ, खसखस, खोबरं, तिखटपणा यावरून वऱ्हाडी पद्धतीच्या जेवणाची सुरवात झाली.

विदर्भात ताटातल्या उजवीकडच्या पदार्थांबरोबर डावीकडच्या पदार्थांनाही तितकंच महत्त्व आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कोरड्या चटण्या, उदाहरणार्थ : जवस, काळे तीळ, मोकळी डाळ, शेंगदाण्याची चटणी. याशिवाय लाल ठेचा, हिरवा ठेचा, पंचामृत, मेथांबा इत्यादी तोंडी लावण्याच्याही पदार्थांची रेलचेल असते. उन्हाळ्यात इथल्या प्रचंड उन्हामुळे या काळात भाज्यांची कमतरता जाणवते. म्हणूनच पूर्वीपासून इथं वाळवणाच्या पदार्थांना महत्त्व प्राप्त झालं आहे. मूग वडी, वाळलेले कांदे, आंबोशी, बोरकूट, सुकवलेल्या भाज्या, टोमॅटोचं लोणचं, सांडगे, सरगुंडे, दही-मिरची, धापोडे, चनोडे, सांड्या, कुरडया, मिरचीचं गोज, वऱ्हाडी ठेचा, उकडलेली बोरं हे प्रकार आता इतरत्रही बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले आहेत.

सणासुदीला मात्र पुरणाची पोळी, खवापोळी, शेवयांची खीर, आमरस-पुरी इत्यादी प्रकार असतात. इथली पुरणाची पोळी मात्र अतिशय जाड असते. मात्र, तीवरचा पापुद्रा इतका पातळ असतो की पोळी तोंडात घातल्याक्षणी विरघळून जाते. साधारणपणे 120 ग्रॅम पुरण, तर 30 ग्रॅम कणीक वापरून ही पोळी तयार केली जाते. पोळीबरोबरच ताटात तुपाची छोटी वाटी हमखास दिसेल. पोळी तुपात बुडवून खाण्यासाठी!
विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांत तांदळाचं पीक मोठ्या प्रमाणात होतं; त्यामुळे इथं भाताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. भातापासून आंबवलेल्या पेजेचा प्रकार इथं केला जातो. तो प्रकार प्यायला की एक प्रकारची नशा येते आणि त्यामुळे कामसुद्धा चपळाईनं होतं. म्हणून इथला बहुतांश मजूरवर्ग अशा प्रकारची पेज बनवून तिचं सेवन करत असतो. याशिवाय, गोळाभात, भरडाभात, भजीभात, वडाभात, हातफोडणीचा भात, मूग वड्याचा भात, खिचडी, बेसनभात, रावणभात, वांगीभात असे भाताचे नाना प्रकार विदर्भात आहेत. वांगीभाताबाबतचा एक किस्सा तुम्हाला सांगतो : विदर्भातली झाडीपट्टीतली रंगभूमी बरीच प्रसिद्ध आहे. साधारणत: दिवाळीच्या सुमारापासून मे महिन्यापर्यंत ही नाटकं पाहायला मिळतात. मोठ्या शेतात मैदान तयार करून चारही बाजूंनी बसून लोक या नाटकांचा आनंद लुटत असतात. हे नाटक झाल्यानंतर कार्यकर्ते व रंगकर्मी यांच्यासाठी वांगीभात तयार केला जातो. वांगीभाताचं महत्त्व आणि त्याची चव याची अनेक दिग्गज नटांनी स्तुती केलेली आहे. शेवटी, जाता जाता विदर्भातल्या माशांबद्दल सांगतो. विदर्भाला समुद्रकिनारा नाही, त्यामुळे गोड्या पाण्यातले मासे हे इथलं वैशिष्ट्य. त्यात जास्तकरून झिंगे, रोहू, कटला, मुरगल, मांगुर इत्यादी प्रकारचे मासे वापरले जातात. समुद्रकिनारी असलेल्या लोकांना झिंग्याचं जास्त अप्रूप वाटत नसलं, तरी इथं गोंड राजाच्या आश्रयात वाढलेल्या झिंग्यांना मेजवानीत राजेशाही प्रतीक म्हणून ओळखलं जातं.
***

चंद्रपुरी वडा

साहित्य :- हरभऱ्याची भिजवलेली डाळ : 2 वाट्या, बारीक चिरलेला कांदा : 2 वाट्या, बारीक चिरलेल्या मिरच्या : 2 ते 3, बारीक चिरलेली कोथिंबीर : अर्धी वाटी, भरडलेले धने : 2 चमचे,
हळद : अर्धा चमचा, तिखट, मीठ चवीनुसार, आलं-लसूण पेस्ट : 2 चमचे, तेल तळायला.
कृती :- डाळ भिजवून वाटून घ्यावी. तिच्यात सगळे घटकपदार्थ घालून पाण्याच्या हातानं गोल वडे करून तेलात हाफ फ्राय करून घ्यावेत. सर्व्ह करताना हे गोल वडे पुन्हा पाण्याच्या हातानं चपटे करून मंद आचेवर डीप फ्राय करावेत. तळलेल्या मिरचीबरोबर सर्व्ह करावेत.
टीप :- गोल वडा चपटा केल्यानंतर दुसऱ्यांदा तळल्यावर जास्त खुसखुशीत होतो. यातच मेथीच्या हंगामात मेथीची भाजी घालूनही हे वडे करता येतील.
***
कोथिंबीरवडी

कोथिंबीरवडीच्या आवरणासाठी साहित्य :-
बेसन :- 1 वाटी, मैदा : 2 चमचे, आरारूट किंवा कॉर्न स्टार्च : 1 चमचा, हळद : पाव चमचा, मीठ चवीनुसार.
कृती :- सर्व घटकपदार्थ एकत्र करून घेऊन त्यांत थोडं पाणी घालून 1 चमचा तेल घालावं व मळून गोळा तयार करावा.
मसाल्यासाठी साहित्य :- तेल : 2 चमचे, आलं-लसूण पेस्ट : एकेक चमचा, हळद : पाव चमचा, तिखट चवीनुसार, जिरेपूड : 1 चमचा, गरम मसाला : 1 चमचा, आमचूर : अर्धा चमचा, साखर चवीनुसार. भाजलेली खसखस : 1 चमचा, दाण्याचं कूट : 4 चमचे, खोबऱ्याचा कीस : अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर : अर्धा किलो, बेदाणे : 2 चमचे
कृती :- दोन चमचे तेलात आलं-लसूण पेस्ट घालून तीत हळद, तिखट, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर आणि चवीनुसार साखर घालावी. नंतर त्यात दाण्याचं कूट, 1 चमचा भाजलेली खसखस व बेदाणे घालावेत. त्यानंतर खोबऱ्याचा कीस घालून थोडंसं परतून थंड झाल्यावर हा मसाला बारीक चिरलेल्या अर्धा किलो कोथिंबिरीत घालावा. नंतर बेसनाच्या गोळ्याची पोळी लाटून तीवर गरम मसाला व अर्धा चमचा आमचुराचं पाणी करून लावावं. त्यावर हा मसाला पसरून त्याचे रोल करावेत व दोन्ही कडा ओल्या पाण्यानं बंद कराव्यात व मंद आचेवर तळून घ्याव्यात.
***
सांजा

साहित्य :- रवा : 2 वाट्या, बारीक चिरलेला कांदा : अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या : 3-4, लसूण : 1 चमचा, हिंग : पाव चमचा, हळद : पाव चमचा, आमचूर : अर्धा चमचा, मीठ-साखर : चवीनुसार.
कृती :- बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद व रवा घालून हे सगळं चांगलं भाजून घ्यावं. नंतर आमचूर, चवीनुसार मीठ, साखर व गरम पाणी घालून चांगली वाफ आणावी. सांज्यावर कोथिंबीर घालून खायला द्यावा.
***
सावजी रस्सा (ग्रेव्ही)

साहित्य :- कांद्याचं वाटण : 200 ग्रॅम (300 ग्रॅम कांदे तेलावर परतून त्यांची पेस्ट करावी), आलं-लसूण पेस्ट : 1 वाटी, लाल मिरच्या : 8 ते 10, बडीशेप : 1 चमचा, मोठे वेलदोडे : 4-5
छोटे वेलदोडे : 8-10, स्टार-फुलं : 4-5, दालचिनी : 2-3, लवंगा : 2 चमचे, जायपत्री : 1 चमचा, काळी मिरी : 2 चमचे, शहाजिरे : 2 चमचे, धने : अर्धी वाटी, खसखस : पाव वाटी, ज्वारीचं पीठ : 2 चमचे, शेंगदाणातेल : 1 वाटी, खोबरेलतेल : अर्धी वाटी, तिखट : 2 चमचे, तमालपत्र : 4-5, हळद : 1 चमचा, मीठ चवीनुसार.
कृती :- कांदा व लसूण सोडून सर्व मसाले लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात 10 मिनिटं उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावेत. पातेल्यात तेल घेऊन प्रथम आलं-लसूण पेस्ट टाकून ती शिजवल्यावर कांद्याचं वाटण, तसंच वाटलेला वरील मसाला व तमालपत्र घालावं. थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेपर्यंत उकळावं. सगळ्यात शेवटी हळद, तिखट व खोबरेलतेल टाकावं. वरून थोडी कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ घालावं.
***
पाटोडी रस्सा : पाटोडीसाठी ( हिला "पाटवडी' असंसुद्धा म्हणतात )

साहित्य :- सावजी ग्रेव्ही : 2 वाट्या, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ : 1 वाटी, खोबऱ्याचा कीस : 2 चमचे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, तेल : 2 चमचे, मोहरी, हिंग.
कृती (पाटोडीसाठीची) :- थोड्या तेलात मोहरी फोडणीला घालून त्यात हिंग, हळद, तिखट, मीठ व 1 वाटी पाणी घालून, बेसन घालावं आणि ढवळत राहावं. मिश्रण शिजवावं. थोडं घट्ट झाल्यावर त्यात थोडी कोथिंबीर घालावी. नंतर हे मिश्रण ट्रेमध्ये घालून थापावं. वरून खोबऱ्याचा थोडा कीस घालावा. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. भाजी सर्व्ह करताना सावजी ग्रेव्ही थोडीशी पातळ करून चवीनुसार मीठ घालावं. नंतर यात तयार पाटोड्या घालून एक उकळी आणावी.
***
वऱ्हाडी प्रकारची पातळ भाजी

साहित्य :- बारीक चिरलेला पालक : 2 वाट्या, मेथी किंवा आळू : अर्धी वाटी, मुळ्याच्या चकत्या : अर्धी वाटी, चिरलेली हिरवी मिरची : 2 चमचे, आलं-लसूण पेस्ट, हळद, तसंच तिखट चवीनुसार, मेथीचे दाणे : अर्धा चमचा, खोबऱ्याचे काप : 2-3 चमचे, भिजवलेले शेंगदाणे : 1 चमचा,
भिजवलेली हरभराडाळ : अर्धी वाटी, हिंग : अर्धा चमचा, धने-जिरेपूड : 2 चमचे, तेल : अर्धी वाटी
कृती :- प्रथम एका भांड्यात दाणे, हरभराडाळ एकत्र शिजवून घ्यावी. अर्धी वाटी तेलापैकी थोडं तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण, शिजवलेले दाणे, हरभराडाळ, कढीलिंबाची पानं, खोबरं-मुळा, हळद, तिखट, मेथीचे दाणे घालून चांगलं परतून घ्यावं. नंतर बारीक चिरलेला पालक, मेथी टाकून खरपूस परतून घ्यावा. आवश्‍यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर बेसनपिठाची थोडी पेस्ट करून भाजी घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून उकळून घ्यावी. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, हिंग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणी वरून भाजीवर घालावी.
***
झुणका

साहित्य :- बेसनपीठ : 1 वाटी, बारीक चिरलेले कांदे : अर्धी वाटी, तेल : अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट : एकेक चमचा. हळद : पाव चमचा, धनेपूड : अर्धा चमचा, तिखट चवीनुसार, आमचूर, मीठ, साखर चवीनुसार, मोहरी : अर्धा चमचा
कृती :- तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावेत. नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, आमचूर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडा वेळ परतून घ्यावं. शेवटी बेसनपीठ घालावं व वरून थोडं पाणी घालून वाफेवर शिजवावं. वरून सजावटीसाठी कोथिंबीर घालावी.
***
मिसळींची भाकर :

साहित्य :- ज्वारी : 1 वाटी, बाजरी : 1 वाटी, गहू : अर्धी वाटी, हरभराडाळ : अर्धी वाटी, मुगाची डाळ : अर्धी वाटी, मीठ चवीनुसार.
कृती :- एक वाटी ज्वारी, एक वाटी बाजरी, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी हरभराडाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ एकत्र करून दळून घ्यावी. चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्यात भिजवून भाकरी कराव्यात.
***
आंब्याची पुरणपोळी

साहित्य :- आंब्याचा रस : 2 वाट्या, साखर : अर्धी वाटी, कणीक : 1 वाटी, मैदा : 1 वाटी, साजूक तूप : पाव वाटी, तेल : 2 चमचे
कृती :- आंब्याचा घट्ट रस काढून तो नॉनस्टिक पॅनमध्ये आटवून घ्यावा. घट्ट गोळा होत आला की थंड करून त्यात चवीनुसार पिठीसाखर मिसळावी. थोडी वेलदोडापूड किंवा केशरसुद्धा मिसळावं आणि पसरून ठेवावा; जेणेकरून तो ओलसर होणार नाही. कणीक, मैदा, थोडं मीठ मिसळून, 2 चमचे तेल मिसळून चांगला भिजवून मळून घ्यावा. त्यानंतर आंब्याचं पुरण या पिठीत पुरणपोळीप्रमाणे मिसळून त्याची पोळी लाटावी. तव्यावर खरपूस भाजून साजूक तुपाबरोबर सर्व्ह करावी.
***
अनारसा

साहित्य :- तांदूळ : 1 वाटी, पिठीसाखर : 1 वाटी, खसखस : पाव वाटी, तूप तळण्यासाठी.
कृती :- तांदूळ चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेऊन 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवावेत. मात्र, पाणी रोज बदलत राहावं. चौथ्या दिवशी तांदूळ चाळणीत घेऊन पाणी निथळून टाकावं आणि ते कपड्यावर पसरून 2-3 तास वाळवून घ्यावेत. नंतर मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावेत. मिक्‍सरमध्ये बारीक केलेल्या तांदळाच्या पिठात पिठीसाखर व 1 चमचा तूप गरम करून घालावं व त्याचे मोठे मोठे गोळे करून ठेवावेत. 2-3 दिवसांनी एक गोळा घेऊन तो फोडावा. गोळा जास्त कडक असल्यास 1 चमचा दूध घालून हातानं मळून घ्यावा. नंतर एका ताटात थोडीशी खसखस घेऊन तीवर वरील तयार केलेल्या पिठाचा अनारसा हातानंच (पुऱ्यांचा आकाराएवढा) थापून घ्यावा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात तयार केलेला अनारसा तांबूस होईपर्यंत तळून घ्यावा. थंड झाल्यावर खायला द्यावा.
टीप :- खसखस लावलेला भाग तळताना वर असायला हवा, हे मात्र लक्षात ठेवावं.
***
सावजी मटण

साहित्य :- ताजं मटण : 1 किलो, सावजी ग्रेव्ही : 4 वाट्या, (सावजी ग्रेव्हीची कृती वर दिलेली आहे).
आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचं वाटण : 1 वाटी, आंबट दही : 2 वाट्या, खडा मसाला : अर्धा चमचा, कसुरी मेथी : 1 चमचा, कोथिंबीर :2 चमचे
कृती : स्वच्छ धुतलेल्या मटणात सर्व मसाले, हिरव्या मिरचीचं वाटण व दही मिसळून दीड ते दोन तास ठेवावं. नंतर ते त्याच पाण्यात शिजवावं आणि शिजवलेल्या मटणात सावजी ग्रेव्ही घालून थोडीशी कसुरी मेथी घालावी व 5-7 मिनिटं शिजवावं. कोथिंबीर घालून गरम गरम वाढावं.
***
वऱ्हाडी झिंगे

साहित्य :- टरफलासकट झिंगे : 15 -20, गरम मसाला : 2 चमचे, वऱ्हाडी रस्सा : 1 चमचा, चिंचेचा गर : 4 चमचे, हळद : अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.
कृती : झिंगे धुऊन त्यांना हळद, चिंचेचं पाणी व मीठ लावून ठेवावं. अर्ध्या तासानं त्यातलं पाणी काढून त्यात वऱ्हाडी रस्सा घालून ते शिजवावेत. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करावेत.
टिप :- झिंग्याची भाजी दोन पद्धतींनी केली जाऊ शकते. 1) टरफलं न काढता, 2) टरफलं काढून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com