माधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

manmad
manmad

मनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या  पार्थिवावर मनमाडच्या आययुडीपी शेजारील मोकळा जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अभिवादन करण्यासाठी अवघा लाल जनसागर उसळला होता. स्वातंत्र्य सैनिक व  राज्य विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते असलेल्या कॉम्रेड गायकवाड यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमात करण्यास शासनाने उदासीनता दाखविल्याने उपस्थितांनी निषेध व्यक्त केला 

भारतीय स्वातंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ति, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचा सक्रिय सहभाग होता शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी, विचारांशी ते एकनिष्ठ होते. विशेष म्हणजे विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला होता इतकेच नव्हे तर कामगार, शोषितांचे नेते, जागतिक पातळीवर दखल घेतलेल्या ६० वर्ष चाललेल्या ऐतिहासिक खंडकरी शेतकरी लढ्याचे ते प्रेणेते होते. त्यामुळे राजकारण, समाजकारणात असतांनाही बाबूजी तत्वाशी, विचारांशी एकनिष्ठ राहिले मात्र निधनानंतर या लोकनेत्याला शासकीय इतमामात मानवंदना देणे गरजेचे असतांनाही हिंदुत्व विचार जपणाऱ्या या शासनाने पुरोगामी, कम्युनिस्ट विचार जगलेल्या या स्वातंत्र्यसैनिकाला मानवंदना देण्यास असंवेदना दाखविल्याने कॉ गायकवाड यांच्या कुटुंबियासह कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत जाहीर निषेध केला काल सकाळी राहत्या घरी बाबूजींचे निधन झाले बाबूजींच्या निधनाची वार्ता महाराष्ट्रात वाऱ्या सारखी पसरली बाबूजी भारतीय स्वातंत्र लढ्यात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात, गोवा मुक्ति संग्राम लढ्यात, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात सक्रिय सहभाग होता शासनाने त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव केला होता त्यामुळे बाबूजींना अखेरचा निरोप शासकीय इतमामात दिला जावा यासाठी बाबूजींच्या मानसकन्या एड साधना गायकवाड, कॉ राजू देसले आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावाची पूर्तता केली जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव शासन दरबारी मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला मात्र सदर कार्यालयाकडून कोणतेच उत्तर न आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कॉ देसले यांना कळविले त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक असतांनाही केवळ वैचारिक दृष्ठीकोण ठेवून बाबूजींना शासकीय इतमामात मानवंदना नाकारल्याची भावना कुटुंबियांसह पक्षाच्या नेत्यांमध्ये होती आज सकाळी बाबूजींची अंत्ययात्रा निघण्याची वेळ झाली तरी कोणतेच आदेश आले नसल्याने पार्थिव गुंडाळण्यासाठी तिरंगा ध्वज नसल्याने अखेर बाबूजी हयातभर शेवटच्या श्वासापर्यंत ज्या कम्युनिस्ट विचारांशी, पक्षाशी एकनिष्ठ राहिले अखेर त्याच कम्युनिस्ट लाल ध्वजात बाबूजींचे पार्थिव गुंडाळून अंत्ययात्रा काढण्यात आली शहरातून अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली पार्थिव सरणावर ठेवण्यात आले कॉ भालचंद्र कांगो, कॉ तुकाराम भस्मे आदींनी प्रतिज्ञा घेत सन्मानाने बाबूजींच्या पार्थिवावर ठेवलेला कम्युनिस्ट लाल ध्वज गायकवाड कुटुंबियांच्या स्वाधीन केला अग्निसंस्कार करणार तेंव्हाच जिल्हा प्रशासनाचा मॅसेज आला. दोन तास थांबा. मात्र अग्निसंस्काराची वेळ झाली होती. अखेर बाबूजींच्या पुरोगामी विचाराला, कार्याला प्रतिगामी विचारांच्या तराजूत तोलून शासनाने शासकीय मानवंदना नाकारत बाबूजींची अवहेलना केली असल्याने शासनाचा जाहीर निषेध कॉ भालचंद्र कांगो, कॉ राजू दिसले, कॉ साधना गायकवाड आदींनी केला 

कॉ माधवराव गायकवाड हे राज्याचे मोठे नेते, माजी विरोधी पक्षनेते होते इतकेच नाही तर बाबूजी हे स्वातंत्र्य सैनिक होते संयुक्त महाराष्ट्र संग्राम लढा, गोवा मुक्ती संग्राम लढा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम या तिन्ही लढ्यात त्यांचे सक्रिय योगदान होते मात्र शासनाने त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यास टाळाटाळ केली मी शासनाचा जाहीर निषेध करते
- एड साधना गायकवाड, बाबूजी यांच्या मानसकन्या 

कॉम्रेड माधवराव गायकवाड हे स्वातंत्र्य सैनिक व विरोधी पक्षनेते होते. मात्र शासनाने त्यांची अंत्यविधी शासाकीय इनामात करण्यास उदासीनता  दाखविली ही त्यांच्या कार्याची अवहेलना आहे त्यांचा आम्ही निषेध करतो
- कॉ . भालचंद्र  कांगो, कम्युनिष्ट पक्षाचे नेते  

कॉ माधवराव गायकवाड हे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार, माजी विरोधी पक्षनेते होते त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला त्यांनी प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला २४ तास झाले मात्र कोणतीच भूमिका घेतली गेली नाही अंत्यविधी वेळी सांगता दोन तास थांबा संपुर्ण आयुष्य देश, राज्यासाठी वेचणाऱ्या व्यक्तीला मानवंदना नाही मात्र श्रीदेवी सारख्या नटीला ताबडतोब शासकीय इतमामात मानवंदनेची कार्यवाही होते मात्र बाबूजींची अवहेलना केली हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे बाबूजींना जनतेने मानवंदना दिली आहे त्यामुळे या सरकारचा निषेध याबाबत मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी केली.
- कम्युनिस्ट नेते कॉ राजू देसले 

जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून कॉ माधवराव गायकवाड यांचा अंत्यविधी  शासकीय इतमामात करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यांना मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक नाशिकवरून रवाना होणार होते तशी कल्पना आम्ही बाबूजी यांच्या कुटुंबियांना दिली होती मात्र उशीर होईल या कारणाने  त्यांनी शासकीय इनामात अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आणि अंत्यसंस्कार उरकला. 
- भीमराज दराडे, प्रांताधिकारी येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com