"लेअर पोल्ट्री' व्यवसायात "बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट

residentional photo
residentional photo


नाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्याचे भाव गडगडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत 170 कोटींचा दणका शेतकऱ्यांना बसला. तसेच खाद्याचे भाव वाढून दुहेरी कात्रीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवत कोंबड्यांची विक्री सुरु केली. "लेअर पोल्ट्री' व्यवसायात 2006 च्या "बर्ड फ्लू'पेक्षा मोठे संकट कोसळले. 

अंडी उत्पादनाचा तोटा सहा महिन्यानंतरही थांबत नसताना खाद्यापुरते पैसे मिळत नसल्याने सुरु असलेल्या "पॅनिक सेलिंग'मुळे अंड्यांचे भाव दररोज तळाला जात आहेत. त्यामुळे 90 आठवड्यापर्यंत अंडी देणाऱ्या कोंबड्यांची उपासमार टाळण्यासाठी 50 आठवड्यात कोंबड्या विक्रीला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर पहिल्यांदा आली आहे. आज पुणे आणि नाशिक विभागात अंड्यावरील कोंबड्यांचा भाव किलोला पन्नास रुपयांपर्यंत ढासळला. तीनशे रुपये खर्च केलेल्या दीड किलोच्या कोंबडीची 75 रुपयांत शेतकऱ्यांना विक्री करावी लागली.

2006 च्या "बर्ड फ्लू' दणक्‍यात नवापूरचा अपवाद वगळता इतकी वाईट स्थिती "लेअर पोल्ट्री'धारकांवर यापूर्वी कधीही आलेली नाही. तसेच काल (ता. 22) पुणे विभागात "पोल्ट्री फार्म' मधील अंड्याला 2 रुपये 80 पैसे इतका निच्चांकी भाव मिळाला. गेल्यावर्षी अंड्याचा उत्पादन खर्च तीन रुपये होता. त्यावेळी पावणेचार रुपये भाव मिळाला. आता एका अंड्याचा उत्पादन खर्च चार रुपयांपर्यंत पोचला असून अंड्यामागे शेतकऱ्यांना एक रुपाया वीस पैशांचा दणका बसला. यापुढील श्रावणाच्या सावटामुळे भाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच, राज्याला दिवसाला सव्वादोन कोटी अंड्यांची गरज आहे. प्रत्यक्षात राज्यात एक कोटी अंड्यांचे दिवसाला उत्पादन होते. उरलेली अंडी तेलंगणा आणि कर्नाटकमधील व्यावसायिकांकडून राज्यात येतात. आता याही राज्यातील "लेअर पोल्ट्री' व्यवसाय महाराष्ट्राप्रमाणे संकटात सापडला आहे. 

दिवसाला 7 हजाराचा तोटा 
अंडी आणि कोंबड्याच्या विक्रीतून पाच हजार "लेअर' कोंबड्यांच्या "पोल्ट्री'धारकांना दिवसाला सात हजाराचा तोटा सहन करावा लागत आहे. फेब्रुवारी 2019 पासून अंड्याच्या सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 25 टक्के तोटा सहन करतव्यवसाय सुरू ठेवणे आता अशक्‍य झाले आहे. सततच्या तोट्यामुळे शेतकऱ्यांकडील खेळते भांडवल संपले आहे. हे कमी काय म्हणून बॅंकांचे "कॅश क्रेडीट' संपले आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून टाकले आहेत. 

160 कोटींची गुंतवणूक अन्‌ 20 हजार रोजगार 
"लेअर पोल्ट्री' व्यवसायात 2016 ते 18 या दोन वर्षांत कच्च्या मालाचे दर मंदीत होते. त्या तुलनेत अंड्यांना चांगले दर मिळत होते. त्यामुळे किफायती ठरलेल्या "लेअर' व्यवसायात पहिल्यांदा 15 टक्के नवे शेतकरी आले. त्यांनी 160 कोटींची गुंतवणूक वाढली. त्यातून 20 हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला. पण यंदा सुरवातीपासून व्यवसायाचे उलटे चक्र फिरले आहे. 

खाद्याचा भाव 16 रुपयांवरुन 28 पर्यंत 
अगोदर "मॉन्सून'ने उशिरा हजेरी लावली. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने मक्‍याच्या क्षेत्रात घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच, मक्‍यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पीक संकटात सापडले आहे. येत्या दिवाळीनंतर महाराष्ट्रात नव्या मक्‍याच्या आवकेबाबत प्रश्‍चिन्ह आहे. आज सांगली विभागात मक्‍याचे दर उच्चांकी क्विंटलला 2 हजार 530 रुपयांपर्यंत पोचला. दुष्काळामुळे उत्पादन घटून मक्‍याचा बाजारभाव गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीवर पोचलप्त. त्यामुळे "लेअर' खाद्याचा किलोचा भाव 15 ते 16 रुपयांवरुन 27 ते 28 रुपयांपर्यंत पोचला आहे. कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे एक टन खाद्यामागे 12 हजार रूपये अधिक खर्च होताहेत. नेमका इथेच तोटा झाला आहे. प्रत्येक अंड्यामागे 25 टक्के "शॉर्ट मार्जिन'ची वेळ ओढावली. अशातच, कच्चा माल पुरवठादारांनीही रोखीशिवाय माल देणार नाही अशी भूमिका स्विकारली आहे. 
... 
 
""तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनुदानित भावात "लेअर पोल्ट्री' व्यवसायासाठी मका, गहू उपलब्ध करून द्यायला हवा. तसेच अल्प व दीर्घ मुदत कर्जाची पुनर्गठण योजना राबवायला हवी. केंद्र सरकारने कच्चा माल आयातीचा पुरेसा कोटा वाढवून द्यावा आणि तातडीने निर्णय अंमलात आणावा. दैनंदिन शालेय पोषण आहारात अंडयाचा समावेश करावा. या केंद्र व राज्य सरकारच्या अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवण्यात आल्यात.'' 
- दीपक चव्हाण (शेती अभ्यासक, पुणे) 

""ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन मी 1998 पासून 2006 पर्यंत करत होतो. बर्ड फ्लूमुळे 2007 पासून अंडी उत्पादनाकडे वळालो. माझ्या फार्ममध्ये दिवसाला साठ हजार अंड्यांचे उत्पादन होत असून माझ्याकडे एक लाख पिल्लांपासून ते कोंबड्यांपर्यंतचे पक्षी आहे. अंड्यांचे भाव गडगडल्याने दहा हजार कोंबड्या अंड्यांचे उत्पादन थांबवून विकल्या आहेत. मात्र तोटा थांबण्याचे नाव घेत नसल्याने बॅंकेचे 52 लाखांचे "कॅश क्रेडीट' संपवले. त्याचबरोबर ठेवी मोडून 50 लाख व्यवसायातील तोट्याची तोंडमिळवणी करण्यासाठी वापरावे लागलेत.'' 
- शशिकांत तिसगे (लेअर पोल्ट्री व्यावसायिक, वझीरखेडे, ता. मालेगाव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com