भारताला बाहेरच्या, देशांतर्गत शत्रूंचाही धोका : निवृत्त जनरल बक्षी

भारताला बाहेरच्या, देशांतर्गत शत्रूंचाही धोका : निवृत्त जनरल बक्षी

जळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्लीत नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे परखड मत निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केले. 
श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे कांताई सभागृहात आज आयोजित "सोहळा कृतज्ञतेचा' या कार्यक्रमांतर्गत "दहशतवाद ः आज, काल आणि उद्या' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, डॉ. प्रताप जाधव, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती पुतळ्याची भेट देऊन मंडळातर्फे मेजर जनरल बक्षी यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण यांची मोठी उपस्थिती होती. कैलास सोनवणे यांनी आभार मानले. 

45 हजार सैनिकांसह नागरिक शहीद 
गेल्या तीस वर्षांत 45 हजारांपेक्षा जास्त सैनिक व नागरिक दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. हे दुःख घेऊन भारतीय जगत आहेत. पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. भारतीयांनो सशस्त्र सेनेत भरती व्हा, ऑफिसर व्हा, सेनेचे नेतृत्व करा आणि दहशतवादाला जबाबदार पाकिस्तानचे चार तुकडे करून शहीद जवान, नागरिकांच्या मृत्यूचा बदला घ्या, असे आवाहन श्री. बक्षी यांनी केले. तसेच पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील गुरू स्वामी प्रणवानंद सरस्वती यांची आठवण करीत जळगाव ही गुरूंची अन्‌ वीरांची भूमी असल्याचे गौरवोद्‌गार काढले. 

वीरपत्नींना धनादेशाद्वारे मदत 
मेजर जनरल बक्षींच्या हस्ते पुलवामा हल्ल्यातील मलकापूर येथील शहीद संजय राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमा राजपूत यांना तसेच बुलडाण्यातील शहीद नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना राठोड यांना प्रत्येकी सहा लाख 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील जितेंद्र शिवराम नेहते यांनी पाच हजार, सेवानिवृत्त भगवान चौधरी यांनी प्रत्येकी तीस हजार रुपये, तर राम दयाल सोनी यांनी अकरा हजार रुपये मदत दिली. 

पैसा न मिळाल्याने "राफेल'चा वाद उकरला 
भारत स्वतंत्र झाल्यानंतर वायुदलाकडे 42 स्क्वॉड्रन होती. त्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे "राफेल'ची खरेदी करणे खूपच गरजेचे असून, त्यामुळे देशाच्या वायुदलाला मजबुती मिळणार आहे. मात्र, नोकरशाह व काही राजकारण्यांना यामध्ये पैसा न मिळाल्याने त्यांनी "राफेल'चा वाद उकरून काढला. त्यामुळे शेजारील शत्रूराष्ट्र याचा फायदा घेत आहेत, अशी माहिती जळगाव जनता सहकारी बॅंकेच्या मुख्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना श्री. बक्षी यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com