होमगार्डना आता वर्षातून किमान सहा महिने ड्यूटी 

होमगार्डना आता वर्षातून किमान सहा महिने ड्यूटी 

जळगाव : गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जिल्हा समादेशक हे पद "वेतनी' केले. त्यानंतर पंधरा दिवसांतच शासनाने आता गृहरक्षक दलाच्या जवानांनाही वर्षातून किमान सहा महिने ड्यूटी देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात पटावर असलेल्या गृहरक्षक दलातील जवानांची साखळी पद्धतीने नियुक्ती होणार असून, संबंधित आयुक्त, अधीक्षकांकडून त्याबाबतचे प्रस्ताव गृह विभागातर्फे मागविण्यात आले आहेत. 

राज्यात कायदा- सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, विशेषत: सण- उत्सवांच्या काळात पोलिस दलास खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे योगदान मोठे आहे; परंतु हे पद तात्पुरत्या सेवेचे व मानधन तत्त्वावरील आहे. ज्या दिवशी ड्यूटी त्या दिवसाचे वेतन, अशी पद्धत आजपर्यंत चालत आली असून, सद्य:स्थितीत गृहरक्षक दलाच्या जवानांना शंभर दिवसही ड्यूटी मिळत नव्हती. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, वेतन नाही तर किमान पूर्ण वर्षभर ड्यूटी मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. 

आता सहा महिने ड्यूटी 
अन्य मागण्यांसंदर्भातही मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मार्च 2019 मध्ये होऊन तीत गृहरक्षक दलाला किमान 50 टक्के (सहा महिने) कर्तव्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गृहरक्षक दलाच्या महासमादेशकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना नुकतेच पत्र दिले. त्यानुसार सण- उत्सवांतील नियुक्तीसोबतच वाहतुकीचे नियमन, रुग्णालय सुरक्षा, शासकीय वसतिगृहांमधील सुरक्षा, कारागृहाबाहेरील सुरक्षा, अशा कामांसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांना किमान सहा महिने ड्यूटी देता येणार आहे. 

साखळी पद्धतीने काम 
जिल्ह्यात पटावर कार्यरत गृहरक्षक दलातील 35 ते 40 टक्के जवान या कामासाठी नियुक्त होऊ शकतात. त्यासाठी त्यांची साखळी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. दर दोन महिन्यांनी गृहरक्षक दलाचे जवान बदलले जातील. त्यामुळे सर्वांना किमान सहा महिने ड्यूटी मिळू शकेल. या नियुक्तीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, उपायुक्त अथवा अधीक्षकांनी विविध ठिकाणी सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची आवश्‍यकता असल्यास त्यासंबंधी प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश पोलिस महासंचालकांच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. 

सण-उत्सव अथवा तणावाच्या परिस्थितीत पोलिसांच्या बरोबरीने आम्ही कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असतो. अनेक वर्षांपासून सेवा करीत आहोत. वर्षातून सहा महिने ड्यूटी मिळत असेल, तर तो एक दिलासा आहे. तरीही कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी आमची मागणी कायम आहे. 
- किरण शिंदे, होमगार्ड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com