Loksabha 2019 : राजकीय नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांना ‘एनर्जी’! 

Loksabha 2019 : राजकीय नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांना ‘एनर्जी’! 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप- शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी तालुक्याचा धावता दौरा केला, तर भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांना ‘एनर्जी’ मिळाल्याचे चित्र भडगाव तालुक्यात दिसत आहे. 
भडगाव तालुक्यात महायुती व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यांवर घेतल्याने गावागावांत प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांना प्रत्येक गावाला येणे शक्य नसल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ‘आपणच उमेदवार’ असल्याचे समजून प्रचारमोहीम राबविली आहे. गावपातळीवरील कार्यकर्ता उमेदवाराइतकाच जोशात आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

मित्रपक्ष प्रचारात सक्रिय 
भाजपचा मित्रपक्ष शिवसेना प्रचारात गेल्या चार- पाच दिवसांपासून सक्रिय झाला आहे. आमदार किशोर पाटील स्वत: ग्रामीण भागात प्रचारात उतरले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या बूथप्रमुखांचा संयुक्त मेळावा पार पडला. ‘आरपीआय’चे तालुकाध्यक्ष एस. डी. खेडकर यांनी स्वतंत्र प्रचारमोहीम राबविली आहे. भाजपकडून तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, ‘भाजयुमो’चे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विलास पाटील, शहराध्यक्ष मनोहर चौधरी हे दररोज गावनिहाय प्रचाराचे नियोजन करून प्रचार यंत्रणा राबवीत आहेत. बूथप्रमुखांनी घराघरांत जाऊन प्रचार करायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष काँग्रेसनेही प्रचारात जोर पकडला आहे. ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार गुलाबराव देवकरांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच तालुक्यात भेटीगाठी झाल्या होत्या. दोन्ही पक्षांचे मेळावेही घेण्यात आले आहेत. ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते कधी नव्हे; ‘सोशल मीडिया’वर सक्रिय झाले आहेत. माजी आमदार दिलीप वाघ, ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष श्यामकांत भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीपराव पवार आदींनी गावपातळीवर जाऊन कार्यकर्त्यांना सक्रिय करत प्रचारमोहिमेला गती दिली आहे. 

दोघांमध्ये मोठी चुरस 
‘राष्ट्रवादी’चे उमेदवार गुलाबराव देवकर हे तालुक्यासाठी नवखे नाहीत. त्यांनी कजगावात शिक्षण घेतले आहे. त्यांचे तालुक्यात नातेगोते आहे. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होत आहे. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील हेदेखील तालुक्यात चांगले परिचित आहेत. त्यांच्यासाठी भाजपने जोरात प्रचारमोहीम उघडली आहे, तर शिवसेनेची त्यांना भक्कम साथ मिळत आहे. गेल्या वेळी भाजपचे ए. टी. पाटील यांना पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. याही वेळी ते मताधिक्य टिकविण्यासाठी भाजपने तयारी चालवली आहे. ‘राष्ट्रवादी’ने आपल्याच उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com