"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान?

"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान?

स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती. कॉंग्रेसपासून विभक्त होऊन स्थापन झालेल्या "राष्ट्रवादी'चाही जिल्ह्यात चांगलाच जोर होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाला जिल्ह्याने साथ दिली. अगदी जिल्हा परिषदेपासून तर थेट जिल्हा बॅंकेपर्यंत पक्षाची सत्ता होती, शिवाय सहा आमदारांचे भक्कम पाठबळ होते. परंतु आज पक्षाकडून भाजप व सेनेने सर्वच हिसकावून घेतले आहे. अगदी सहकार क्षेत्रातही भाजपच्या ताब्यात गेले आहे. जिल्ह्यात पक्षाचा केवळ एकच आमदार आहे. खासदारकीच्या दोन जागा पक्षाकडे आहेत. मात्र, त्यातही अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात परिवर्तन होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसलाही बळ मिळेल काय, हाच खरा निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या निमित्ताने प्रश्‍न आहे. 
..... 

जळगाव जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहिल्यास जनतेने नेहमीच कॉंग्रेसला बळ दिले आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वालाही भक्कम साथ दिलेली आहे. विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर "शेतकरी दिंडी'चे आयोजन केले होते. त्याचा प्रारंभ करण्यासाठी पवार यांनी जळगावच निवडले होते. या ठिकाणच्या तत्कालीन नेत्यांनीही जोमाने काम केले आणि नूतन मराठा विद्यालयाच्या मैदानावरून भव्य ऐतिहासिक शेतकरी दिंडी निघाली होती. सहकार क्षेत्रातही हा जिल्हा शरद पवार यांच्याच नेतृत्वाच्या पाठीशी उभा होता. जिल्हा बॅक, दूध विकास संघ, बाजार समिती, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व होते. राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती; तर जिल्ह्यात सहा विधानसभेचे आमदार, एक शिक्षक मतदारसंघातील आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या हातून हा जिल्हा निसटला. भाजप व शिवसेनेने आपली ताकद निर्माण करीत सत्तेचे एकेक केंद्र काबीज केले. आज जिल्हा परिषद भाजपकडे आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघावर भाजपचे नेतृत्व आहे. बाजार समिती शिवसेनेकडे आहे; तर महापालिकेवरही आज भाजपचा झेंडा फडकतो आहे. या महापालिकेत तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा साधा एक नगरसेवकही नाही. या शिवाय जिल्ह्यातील पालिकांमधील दोन्ही पक्षांची दयनीय स्थिती तर सांगण्यासारखीच नाही. 

नेत्यांची यादी मोठी पण... 
जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत पाहिल्यास या ठिकाणी पक्षाकडे नेत्यांची यादी फार मोठी आहे. आपापल्या तालुक्‍यात तसेच मतदारसंघाच्या क्षेत्रात हे नेते भक्कम आहेत. त्या भागात त्या नेत्यांचे वलय आजही मोठे आहे. असे असताना नेतृत्वाला यश का मिळत नाही, हाच खरा प्रश्‍न आहे. त्याकडे या नेत्यांनीही गांभीर्याने पाहिलेले नाही. हीच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचीही खंत आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनता यांचा संवाद नेमका कुठे कमी पडत आहे, याचाही आता नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात परिवर्तन होईल? 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश स्तरावरील नेतृत्वाने जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षात मोठे प्रयत्न केले आहेत. पक्षातर्फे संघर्षयात्रा, हल्लाबोल यात्रा जिल्ह्यातून काढण्यात आली; तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळावे घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांत ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यातून काहीअंशी प्रेरणा घेतली आहे. त्यानुसार त्यांनी कार्य सुरू केले असल्याचे दिसत आहे. परंतु, आता तेवढ्याने भागणार नाही. त्याचा वेग वाढवावा लागणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. जिल्ह्यात पक्ष बळकट करून आगामी निवडणुकीत यश मिळवायचेच, असा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही करण्याची गरज आहे. हेच या "निर्धार' यात्रेचे उद्दिष्ट साध्य होईल. मात्र, यावेळी जर जिल्ह्यात पक्षाला यश मिळाले नाही, तर मात्र भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. हे जिल्ह्यातील नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनीही लक्षात ठेवण्याची गरज आहे, एवढे मात्र निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com