सफाईवरील 14 कोटींचा खर्च कचऱ्यात 

live photo
live photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ फासला गेलांय... काही भागात स्वच्छता तर बहुतांश भागात कचऱ्याचे ढीग, साचलेले डबके, तुंबलेल्या गटार असे चित्र दिसतेय... नियमित सफाईअभावी निर्माण झालेल्या या स्थितीने जळगावकरांवर साथरोगांचे संकट आहे. स्वच्छतेवर वर्षाला खर्च होणारा 14 कोटींचा निधी कचऱ्यात जातोय, अशी स्थिती आहे. स्वच्छ, सुंदर शहर ही घोषणा नावालाच उरलीय.. "सकाळ'च्या "स्कॅनिंग'मधून समोर आलेले हे चित्र. 

घनकचरा प्रकल्पावर लाखो टन कचरा 
जळगाव शहर महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक कंपनीला दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या आठ वर्षांपूर्वीच सुरू होण्याआधी बंद झाला आहे. दररोज शहरातून 220 टन संकलित केलेला कचरा हा बंद घनकचरा प्रकल्पाच्या आवारात टाकला जातो. त्यामुळे येथे लाखो टन कचरा साचलेला आहे. प्रत्यक्षात आज कचऱ्याची समस्या गंभीर आहे. कुठेही नियमित स्वच्छता होत नाही, जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. आता पावसाळ्यात तर ही समस्या अधिक गंभीर होऊन साथरोग पसरण्याचा धोका आहे. 

नवीन घनकचरा प्रकल्प, स्वच्छतेचा ठेका 
महापालिकेस नवीन घनकचरा प्रकल्पासाठी 31 कोटी 75 लाखांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर आहे. त्यानुसार प्रकल्प उभारणीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर नवीन 100 घंटागाड्या, 12 कचरा कुंडी उचलणारे कॉम्पॅक्‍टर, 2 टॅंकर, 6 डंपर आदी वाहनांची खरेदी झाली आहे. साचलेला लाखो टन कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. शहराच्या दैनंदिन स्वच्छतेचा एकमुस्त ठेका महापालिकेने "वॉटरग्रेस' या एजन्सीला दिला असून 5 वर्षांसाठी 75 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. यात संपूर्ण रस्ते व गटारांची साफसफाई, प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा संकलन करणे आदी कामे होतील. शिवाय, त्यासाठी महापालिकेचे 400 व मक्तेदाराचे 400 कर्मचारी असतील, असे महापालिकेचे नियोजन आहे. 

खुल्या भूखंडांची थातुरमातूर स्वच्छता 
शहरातील खुल्या भूखंडांवरील अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर होता. त्यानुषंगाने महापालिकेने 20 डिसेंबर 2018 ला शहरातील चार प्रभाग समितीमधील 19 प्रभागांतील खुले भूखंड स्वच्छता करण्याची मोहीम 4 जेसीबी व 12 ट्रॅक्‍टरद्वारे साफसफाई कामाचा मक्ता 40 दिवसांसाठी मक्ता महापालिकेने दिला. यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अकरा लाख 52 हजार रुपये खर्च देखील करण्यात आला; परंतु या भूखंडांवरील स्वच्छतेचे काम थातुरमातूर झाल्याने पुन्हा "जैसे थे' परिस्थिती सध्या या भूखंडांवर आहे. 

दोन वर्षांत साथरोगांचे प्रमाण वाढले 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तसेच खासगी मक्तेदारांकडून गेल्या तीन वर्षांत नियमित साफसफाई होत नसल्याने शहरातील सर्वच भागात अनेक ठिकाणी अस्वच्छता, गटारी तुंबलेल्या, नवीन वसाहती तसेच मोकळ्या जागेत साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने साथरोग त्या परिसरात अधिक झाली. दोन- तीन दिवस साचलेल्या कचरा कुंड्या व ढिगारे तसेच पडून असतात. मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. 

व्यापारी संकुले, बाजारपेठेत कचऱ्याचे ढीग 
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मार्केट, गांधी मार्केट, भिकमचंद जैन मार्केट, दाणाबाजार, तसेच सुभाष चौक, नवीपेठ आदी परिसरात रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे नेहमीच आढळून येतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांनी गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेच्या कारणावरून संकुल बंद केले होते. त्यानंतर या संकुलात स्वच्छतेचा मक्ता दिल्यानंतर परिस्थिती सुधारली. नागरी वस्तींमध्ये देखील अस्वच्छता असल्याने नागरिकांची अस्वच्छतेबाबत नेहमीच ओरड होत असते. 

सत्ताधाऱ्यांचा "एकमुस्त' ठेक्‍यावर भर 
तीन वर्षांपूर्वी स्वच्छ अभियान अंतर्गत तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे असताना 20 डिसेंबर 2017 ला महास्वच्छता अभियान राबविले होते. तसेच महापालिकेच्या व मक्तेदारांच्या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविली होती; परंतु ही यंत्रणा फोल ठरल्याने शहरात पुन्हा "जैसे थे' परिस्थिती होती. खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना स्वच्छतेकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. एक वर्षापूर्वी भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर बदल शहरात थोड्या प्रमाणात स्वच्छतेचा दर्जा सुधारलेला दिसत आहे;परंतु नियोजन नसल्याचे दिसत असून, आता सत्ताधाऱ्यांनी महासभेत शहरात दैनंदिन स्वच्छता करण्याचा एकमुस्त (एकच) ठेका देऊन स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

नालेसफाई केवळ नावालाच 
शहरातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबविली होती. यात 5 मुख्य नाले तर 80 उपनाल्यांची स्वच्छता 18 जूनपर्यंत करण्यात आली; परंतु नालेसफाई केवळ नावालाच झालेली दिसत असून, दोन तीन पावसानंतर देखील नाल्यांमध्ये अजून कचरा व गाळ तसाच दिसत आहे. यात ईच्छादेवी चौकातील महामार्गालतचा नाला कचऱ्याने तुडुंब भरला आहे. 

ओला-सुका कचरा संकलनावर भर 
नवीन घनकचरा प्रकल्प तसेच स्वच्छतेचा दैनंदिन कचरा संकलनाचा मक्ता देण्यात आला असून, लवकरच सुरू होणार आहे. त्याअनुंषागाने शहरातील कचरा हा ओला-सुका अशा पद्धतीने संकलित केला जाणार असून, नवीन आलेल्या 85 घंटागाड्या देखील तयार केल्या आहे. तसेच आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी फिरून शहरातील चार जागा निश्‍चित करून तेथून कचरा वेगळा तसेच ओल्या कचरा कंपोस्ट खत करण्याचे नियोजन सुरू आहे. 

संदेशांनी भिंती रंगल्या, पण स्वच्छता नाही 
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सर्व भिंतींवर फाइन आर्टच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन संदेश, चित्राद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला; परंतु दीड-दोन महिन्यांत स्वच्छतेच्या संदेशाने रंगलेल्या अनेक भिंतीसमोर कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नवीन मक्ता; स्वच्छता करात वाढ नाही 
महापालिका आरोग्य विभागाकडे पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे 23 प्रभागांची स्वच्छतेची जबाबदारी आहे तर 14 ठिकाणी स्वच्छतेचे मक्ते सुरू आहेत. स्वच्छतेपोटी नागरिकांकडून 2 टक्के रहिवासी तर 4 टक्के व्यावसायिक स्वच्छता कर वसूल केला जात आहे; परंतु आता संपूर्ण शहरात एकच स्वच्छतेचा मक्ता दिला 
असून, तो लवकरच सुरू होणार आहे. पूर्वीप्रमाणेच 2 टक्के रहिवासी व 4 टक्के व्यवसायिक कर आकारला जाणार आहे. 
 
वर्षभरात 14 कोटींवर खर्च 

- आरोग्य विभागात 450 कर्मचारी 
- पगार, वाहन, डिझेल, देखभाल यासाठी महिन्याला 1 कोटी 20 लाखांचा खर्च 
- घंटागाड्यावर 82 वाहनचालक 
- 350 आरोग्य निरीक्षक, मुकर्दम, सफाई कर्मचारी 
- वाहन विभागाकडे 90 वाहने 

शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्याला कायम प्राधान्य दिले आहे. कुठे अस्वच्छतेच्या तक्रारी आहे. मात्र, आता स्वच्छतेचा एकमुस्त ठेका दिला असून, यावर आयुक्तांशी बोलून चांगल्याप्रकारे कशी स्वच्छता ठेवता येईल, याचा प्रयत्न केला जाऊन स्वच्छ व सुंदर शहरासाठी आमचा प्रयत्न असेल. 
- सीमा भोळे, महापौर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com