थॅलेसिमिया रुग्णांना वर्षभरात 1400 रक्‍तघटक विनामूल्य! 

थॅलेसिमिया रुग्णांना वर्षभरात 1400 रक्‍तघटक विनामूल्य! 

जळगाव ः रेडक्रॉस सोसायटीने सेवाभावी कार्यातही आपले पाऊल रोवले आहे. रक्‍तदान करणाऱ्या दात्यांची काळजी घेण्यासोबतच दर महिन्याला रक्‍ताची आवश्‍यकता असणाऱ्या थॅलेसिमिया रुग्ण असलेल्या मुलांसाठी विनामूल्य रक्‍तपिशवी उपलब्ध करून देण्याचे सेवाभावी कार्य रक्‍तपेढीकडून सुरू आहे. गेल्या वर्षभरात एक हजार 416 रक्‍तघटक रुग्णांना देण्याचे कार्य केले आहे. 
"रक्‍तदान करूया... प्रेमाची नाती जोडूया...' या संकल्पनेतून रेडक्रॉस सोसायटीने रक्‍तपेढीची स्थापना करीत प्रत्येक रुग्णाला सुरळीत व सुरक्षित रक्‍त आणि रक्‍तघटक पुरवठा करण्याचे काम केले; परंतु एवढ्यावर न थांबता कर्करोग जनजागृती व निदान शिबिर घेणे, "जीवनदान' व "भावस्पर्श' योजना सुरू केली. यातील "भावस्पर्श'अंतर्गत एक हजार रुपयांची देणगी देऊन वर्षभरात एक रक्‍तपिशवी व "जीवनदान' योजनेंतर्गत दहा हजार देणगी देऊन दरवर्षी एक रक्‍तपिशवी गरजू व गरीब रुग्णाला देऊ शकणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची रक्‍तगट तपासणी अल्प दरात करणे, महिला वसतिगृह व महिला महाविद्यालय, महिला मंडळ या ठिकाणी रक्‍तदानात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महिलांची हिमोग्राम तपासणी व हिमोग्राम वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येत असते. हे काम नित्यनियमाने सुरू केले आहे. 

अकरा हजार रक्‍तघटक दिले मोफत 
रेडक्रॉस रक्‍तपेढीतर्फे थॅलेसिमिया रुग्ण असलेल्या मुलांसाठी विनामूल्य रक्‍तपिशवी उपलब्ध करून दिली जाते. जिल्ह्यात थॅलेसिमियाबाधित तीनशे बालके असून, त्यांना गेल्या दहा वर्षांत 11 हजार रक्‍तघटक (दीड कोटी रुपये सेवाशुल्क) थॅलेसिमिया, सिकलसेल व अप्लास्टिक ऍनिमियाबाधित रुग्णांना रक्‍तपेढीतर्फे मोफत उपलब्ध करून देत त्यांना जीवनदान देण्यात यश मिळविले आहे; परंतु आता नुसते रक्‍तघटक देऊन थांबणार नाही, तर रक्‍त चढविण्यासाठी या रुग्णांना बाहेर लागणारा पाचशे रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी रक्‍तपेढीत स्वतंत्र हॉलची सुविधा करण्यात येणार आहे. 

रक्‍तदात्यांसाठी अपघाती विमा 
रक्‍तघटक उपलब्ध करून देण्यासोबत रक्‍तपेढीत रक्‍तदान करणाऱ्या दात्यांचीही काळजी घेतली जात असते. यात स्वेच्छा रक्‍तदान करणाऱ्या पुरुष रक्‍तदात्यास तीनशे रुपयांचे सवलत कार्ड, महिला रक्‍तदात्यास चारशे रुपयांची सेवाशुल्कात सवलत दिली जाते. तसेच स्वतःसाठी रक्‍तपिशवी लागत असल्यास रक्‍तदाता प्राधान्य कार्डवर विनामूल्य रक्‍तपिशवी दिली जाते. इतकेच नाही, तर प्रत्येक रक्‍तदात्याला दीड लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण देण्यात येत असते. 


थॅलेसिमिया, सिकलसेल या रुग्णांना विनामूल्य रक्‍त देत असून, 70 टक्‍के भार "रेडक्रॉस' उचलत आहे. भविष्यात सेवाभावी बालरोगतज्ज्ञांच्या मदतीने "रेडक्रॉस भवना'त रक्‍तसंक्रमणाच्या प्रक्रियेची सुविधा विनामूल्य राबविण्याचा संकल्प आहे. या संकल्पनांच्या मागे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्यामुळे ही अद्ययावत यंत्रणा उभी राहू शकली आहे. 

- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, रक्‍तपेढी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com