नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार

खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात  बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे येत उपाय योजना करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील राज्य तसेच महामार्गांवर जंगल असलेल्या भागात, डोंगर रंगांमध्ये बिबटे तसेच वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळतो. या भागात भक्षाचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असतान गेल्या पाच वर्ष्यात भरधाव वाहनाच्या जोरदार धडकेत २८ बिबट्ये ठार झालेत. अचानकपणे महामार्गावर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघातात बळी पडत आहेत.

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा वावर अधिक आहे.राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून महामार्ग ओलांडताना विविध महामार्गांवर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण ७ बिबट्यांचा मागील चार महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे.बिबट्यासारख्या चपळ व वेगवान वन्यजीवालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणा-या वाहनांपुढे आपला जीव गमवावा लागत आहे. ही खरोखरच दुर्देवाची बाब आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा, मालेगाव, निफाड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. या भागात त्यामुळे मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. वन्य प्राण्यांच्या अधिवासात पुरेसे भक्ष व पाणी विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवत बिबट्या कधी शेतक-यांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या घटना निफाड, बागलाण या भागामध्ये घडल्या आहेत.

दरम्यान, या तालुक्यांमधून राज्य व राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना महामार्गावरुन जाणा-या वाहनांची असलेली गती आणि बिबट्याची महामार्ग ओलांडताना उडणारी भंबेरी यामुळे बिबट्याला प्राणाला मुकावे लागत आहे.

बिबट्याचे अस्तित्व धोक्यात. 
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा असलेला अधिवास धोक्यात आला आहे.वन विभागात मानवाचे वाढलेला वावर, मानवी वस्तीत भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो. बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या जीवघेणी ठरत आहे.जिल्ह्यात विहिरीत पडून माघील पाच वर्ष्य्त १४ बिबट्याना जीव गमवावा लागला आहे. यामुळे देखील बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात सापडले आहे.

बिबट्यासारखे अन्य वन्यजीवांचाही महामार्गाच्या परिसरात असलेल्या वनक्षेत्रात वावर असतो ह्या भागात पाणवठे नसल्याने पाण्याच्या शोधात नागरी वस्तीतला वावर वाढला आहे.नागरी वस्तीत आल्यावर रस्ते तशेच विहिरी यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात जीव गमवावा लागत आहे.

  २०१४/१५ २०१५/१६ २०१६/१७ २०१७/१८ २०१८
नैसर्गिक 2 9 3 4 3
विहिरीत पडून 2 2 5 3 2
रस्ते अपघातात 3 6 5 6 4
रेल्वे अपघातात  0 2 0 1 1
एकूण 7 19 13 14 10

अमर्याद वेगाने वाहन धावत असतांना अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अशावेळी स्वत:ची सुरक्षा धोक्यात आल्याचे लक्षात येताच वाहनापुढे आलेला वन्यजीवास  वाहनचालक धडक देऊन पुढे मार्गस्थ होतो. त्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजीव प्रवण क्षेत्रातून मार्गस्थ होताना वाहनाचा वेग नियंत्रणात व मर्यादेत असावा.

वेग नियंत्रणात असेल तर अपघात टाळणे शक्य
महामार्गावरून प्रवास करत असतांना अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेग नियंत्रणात व मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो.               

वनविभागाने तातडीने जिल्हा भरातील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते व महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे.
- नाना आहेर, सुभाषनगर ,सामाजिक कार्यकर्ते

वन विभागाने जंगल व परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्याची कायमस्वरूपी सोय केल्यास वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर कमी होणार आहे.वन विभागाने बिबट्याचा वावर  असलेल्या परिसरात त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- प्रा शांताराम गुंजाळ,वन्यप्रेमी सटाणा.

दुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा नागरी वस्त्यांकडे आहे,जंगल व परिसरातील नागरी वस्तीतील नागरिकांनी कुंड्या,हाळ अश्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी.
- दीपक मोरे,अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती खामखेडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com