Ganesh Festival : निजामपूरला श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाकडून बाप्पाला निरोप

Ganesh Festival : निजामपूरला श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाकडून बाप्पाला निरोप

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील श्री सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळातर्फे बुधवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रीय पातळीवरील विशेष मल्लखांब पथकाच्या युवतींनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. जैताणेतील सार्वजनिक मंडळांतर्फे पाचव्या दिवशी, तर निजामपूरला (ता.19) सातव्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात आला. यावर्षी नकट्या बंधारा कोरडाठाक पडल्याने वाजदरे गावतलाव व बुराई डॅमवर गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह थिरकली तरुणाई

बसस्थानकाजवळील श्री सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळातर्फे सात दिवसीय श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात भंडारा, महाप्रसाद व महिलांसाठी मोदक स्पर्धा आदी वैविध्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. गणेश विसर्जनाच्या दिवशीच वरुण राजाने सुमारे तासभर हजेरी लावल्याने गणेशभक्तांनी प्रचंड जल्लोष केला.

मल्लखांब पथकाच्या युवतींनी बँडपथकाच्या तालावर क्रेन व दोरीच्या साहाय्याने सादर केलेल्या विविध लक्षवेधी, चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे महिला व आबालवृध्दांसह ग्रामस्थांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणेच फिटले. बसस्थानक, चिंच चौक व मेनरोडवरील मर्चंट बँकेजवळ ही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वाद्याच्या तालावर रात्री बारापर्यंत अवघी तरुणाई थिरकली. श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

आठ मंडळांतर्फे मिरवणूक : चोख पोलिस बंदोबस्त

निजामपूरच्या सात, तर आदर्श कॉलनीतील एक अशा एकूण आठ नोंदणीकृत गणेश मंडळांसह अन्य मंडळांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. त्यात श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, झुंझार गणेश मंडळ, आई तुळजा भवानी गणेश मंडळ, नवआदर्श गणेश मंडळ, युवक गणेश मंडळ, न्यु एकता गणेश मंडळ, ओमसाई गणेश मंडळ आदी मंडळांचा समावेश होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे आदींसह पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com