फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले "बिग बी' 

amitabh
amitabh

नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या असंख्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. 

"शूटिंग'साठी महानायक अमिताभ बच्चन यांचे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चार्टर्ड विमानाने चोख पोलिस बंदोबस्तात नागपुरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेच ते हॉटेलकडे रवाना झाले. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास ते खलाशी लाइन, मोहननगर येथील सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये लागलेल्या सेटवर पोहोचले. त्यांनी फुटबॉल प्रशिक्षकाच्या ट्रॅकसूटमध्ये बराच वेळपर्यंत "शूटिंग' केले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे आयुष्य बदलविणारे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून, या भूमिकेत पूर्णपणे उतरण्यासाठी बच्चन यांनी फुटबॉल प्रशिक्षकाचा वेष परिधान केला. "शूटिंग' आणखी काही दिवस चालणार असल्याची माहिती आहे. 

चित्रपटातील सहकलावंतांना घेऊन गेल्या काही दिवसांपासून मोमिनपुरा व डोबिनगर येथे लाइट... कॅमेरा... ऍक्‍शन... सुरू आहे. "सैराट' फेम नागराज मंजुळे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, टी सीरिजचे भूषणकुमार निर्माते आहेत. चित्रपटात जवळपास 75 टक्‍के कलावंत नागपूरचे आहेत, हे उल्लेखनीय. या चित्रपटाच्या निमित्ताने नागपूरकरांना चित्रीकरण जवळून पाहण्याची संधी मिळत असून, नागपूरची ओळख आता बॉलीवूडमध्ये होणार आहे. 

"स्लम सॉकर'चे प्रणेते 
हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. विजय बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना हक्‍काचे व्यासपीठ मिळवून दिले. "स्लम सॉकर'चे प्रणेते अशी देशभर ओळख असलेल्या प्रा. बारसे यांनी वाईट मार्गाला लागलेल्या अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. प्रा. बारसे यांच्या कार्याची दखल आमिर खाननेही घेतली होती. आमिर यांच्या लोकप्रिय ठरलेल्या "सत्यमेव जयते' कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com