संमेलनाने उजेड दाखवला - ढेरे

संमेलनाने उजेड दाखवला - ढेरे

साहित्य संमेलन होणार की नाही, याचे सावट दूर होऊन हे संमेलन आनंदाने, यशस्वी झाले. रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाचेच हे फळ आहे. मळभ दाटून आलेले असताना पलीकडे उजेड आहे, ही जिद्द इथल्या रसिकांनी, कार्यकर्त्यांनी दाखवून दिली. कारण माणसांचा एकत्र येण्यावर, संवादावर विश्वास आहे, अशा भावना संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.

वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आलेल्या आणि गेल्या तीन दिवसांपासून रंगलेल्या साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या वेळी डॉ. ढेरे यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. निमंत्रण वापसीच्या वादामुळे अनेक लेखकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे संमेलन होणार की नाही असेच अनेकांना वाटत होते. पण चमत्कार घडावा, अशा पद्धतीचा आनंद संमेलनाने या तीन दिवसांत दिला आहे. संमेलनाचा परिसर तीनही दिवस गर्दीने फुललेला होता. कारण माणसांचे प्रेम आहे, लेखकांवर, पुस्तकांवर. अशी मोठी संमेलने ही लोकोत्सव असतात.

अभिजात भाषेचा दर्जा द्या
ग्रंथालये ही वाङ्‌मयविश्वाच्या केंद्रस्थानी यावीत. तंत्रज्ञानाची मदत घेऊन नव्या पिढीला ग्रंथालयांशी जोडायला हवे. डिजिटल ग्रंथालये सर्वत्र सुरू व्हावीत. शिक्षक, पालकांनी आपल्या मुलांना कोश वाङ्‌मयाचे महत्त्व सांगावे, कोश कसा वापरायचा हे सांगावे. सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकडे लक्ष द्यावे. आवश्‍यक तो अहवाल पाठवला गेला आहे. नवी पिढी जात, धर्म, वंश ही ओळख सांगत नाही; पण त्यांचे लक्ष मातृभाषेकडे कसे राहील, हेही आपण पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

अखेरच्या दिवशीही निषेधाचाच सूर
नयनतारा सहगल यांच्याबाबत घडलेल्या निमंत्रण वापसीमुळे संमेलनाच्या पहिल्या दिवसापासून संमेलनाच्या व्यासपीठावरून वेगवेगळे वक्ते या घटनेचा निषेध व्यक्त करत होते. तिसऱ्या दिवशीही निषेधाचा सूर कायम होता.

त्यामुळेच प्रभा गणोरकर यांची मुलाखत रद्द झाली. प्रतिभावंतांच्या सहवासात या कार्यक्रमात माधव गाडगीळ, डॉ. विजय भटकर, चंद्रकांत कुलकर्णी हे वक्ते आले नाहीत. त्यामुळे राणी बंग एकट्याच या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनीही निमंत्रण वापसीचा निषेध केला.

मुख्यमंत्री अखेर आलेच नाहीत
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. शिवाय, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषा विद्यापीठ या विषयावरही ते बोलतील, अशी आशा अनेकांना होती. मात्र, वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी न येणे पसंत केले. उद्‌घाटन सोहळ्यात आले नाही तरी ते समारोप सोहळ्यात येतील, अशी चर्चा होती.

क्षणचित्रे
- ठराव न ऐकताच नितीन गडकरी संमेलनाच्या व्यासपीठावरून बाहेर पडले
- संमेलनाच्या अखेरच्या दिवशी श्रोत्यांची अलोट गर्दी
- प्रकाशन मंचावर वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन
- पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांची तुडुंब गर्दी
- संमेलनस्थळी झालेल्या कचऱ्यातून होणार खतनिर्मिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com