यातना सहन करतानाही भाग्यश्री हसते

नागपूर - भाग्यश्री तिच्या आईसोबत.
नागपूर - भाग्यश्री तिच्या आईसोबत.

नागपूर - मुले ही देवाघरची फुले असतात, इवल्याशा वयात हातात पाटी-पेन्सिल घेणे आणि मनसोक्त खेळणे हा एकच विचार नव्हेतर आचार त्यांच्यासाठी असतो, मात्र भाग्यश्री ठरली अभागी. अवघी पाच वर्षांची ती. खेळते बागडते समोरच्याला हात जोडून नमस्कारही करते, परंतु इवल्याशा आयुष्यात ती यातनांची यात्रा सहन करत आहे. तिच्या चेहऱ्यामागची वेदना बघितली की, जणू नियतीने तिच्यावर सुड उगवला असेच वाटते. आयुष्यभर माथ्यावर वेदनांनी ओथंबून भरलेली भळभळती जखम घेऊन ती जगणार आहे, हे मात्र निश्‍चित...

भाग्यश्रीला दुर्मीळ असा त्वचारोग (कोलेडियन) आहे. खेळत असताना तिच्याकडे बघणाऱ्या नजरा थेट भाग्यश्रीच्या आईवडिलांच्या काळजावरच घाव करतात, परंतु अशाही स्थितीत तिचे आईवडील चिमुकलीला छातीशी कवडळून, सामान्य लेकरासारखं प्रेम देतात. भाग्यश्रीच्या वेदनांवर फुंकर घालताना आई बबिता आणि वडील राजेश राऊत यांना  कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर जातात. राजेश राऊत मूळचे गोंदियातील अर्जुनी मोरगावचे. मेडिकल स्टोरमध्ये कामाला आहेत.

कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची. परंतु, अशाही स्थितीत गोड संसार सुरू आहे. अशातच घरी बाळ जन्माला येणार म्हणून कुटुंब आनंदी होते. सारे बाळ्याच्या जन्माच्या प्रतीक्षेत होते. मात्र, नियतीला हा आनंद मान्य नव्हता. जन्माला आलेल्या बाळाचे शरीर लाल भडक होते. इवलेसे भयावह रूप बघून कुटुंब हादरले. अंगावरील त्वचा खरबडीत होती. जागोजागी जखमा होत्या. राऊत कुटुंब दुःखाच्या सावटाखाली आले. परंतु, अशाही अवस्थेत आपल्या काळजाच्या तुकड्याला या मातापित्याने सांभाळले.  

कोलेडियन बेबी
कोलेडियन बेबी हा त्वचाविकार आहे. दुर्मीळ आजार असून सहा लाख मुलांमध्ये एखादे मूल हा त्वचाविकार घेऊन जन्माला येते. आनुवंशिक असून चार पिढ्यानंतर जन्माला येण्याची जोखीम ५० टक्के असते.

वैद्यकीयशास्त्रानुसार मानवी गुणसूत्रातील १४ आणि १५ या क्रमांकाच्या जोडीतील बदलामुळे हा त्वचाविकार होत असल्याची नोंद आहे.

भाग्यश्रीला हवा मदतीचा हात 
नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या पुढाकाराने गोंदियात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबविली. यावेळी शिबिरात राऊत यांचे कुटुंबांनी भाग्यश्रीला आणले. विशेष बाब अशी की, भाग्यश्रीला त्यावेळपर्यंत उपचार मिळत नव्हते. परंतु, नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अभिजित राऊत यांनी पुढाकार घेत भाग्यश्रीच्या कुटुंबाला धीर दिला. भाग्यश्रीचा शिक्षणाचा प्रवास सुरू राहावा यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. तूर्तास जिल्हा परिषद शाळेत ती शिकेल.

कोलेडियन बेबी हा त्वचाविकार आहे. आनुवंशिक असा दुर्मीळ आजार आहे. नात्यात लग्न झाले की असा आजार घेऊन बाळ जन्माला येतात. मेडिकलमध्ये रेफर होऊन आलेले बाळांवर उपचार होतात. या त्वचाविकारावर कायमस्वरूपी उपाय नाही; मात्र आधुनिक उपचारपद्धतीनुसार यावर नियंत्रण मिळवता येते. 
- डॉ. वैशाली शिंगाडे, सहयोगी प्राध्यापक, त्वचारोग विभाग, मेडिकल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com