रोज डझनभर नागपूरकांना मोकाट श्‍वानांचा चावा

Dog-Bite
Dog-Bite

नागपूर - नसबंदी शस्त्रक्रियेची मोहीम थंड झाल्याने शहरातील गल्लीबोळ व वस्त्यांमध्ये मोकाट श्‍वानांची पिलावळ वाढली आहे. या श्‍वानांनी सात वर्षांत ३१ हजार नागरिकांना चावा घेतल्याची बाब पुढे आली आहे. शहरात दररोज १२ नागरिकांना मोकाट श्‍वान चावा घेत आहेत. महापालिका प्रशासन उपाययोजनेच्या प्रस्तावातच गुंतल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता बळावली आहे.

सद्यस्थितीत रस्त्यावर मोकाट श्‍वानांचा हैदोस सुरू असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मोकाट श्‍वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या आकडेवारीने स्पष्ट होते. महापालिकेच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेत शहरात ७५ हजारांवर मोकाट तर १८ हजारांवर पाळीव श्‍वान आहेत. अर्थात आता मोकाट श्‍वानांची संख्या एक लाखावर गेली आहे.

सात वर्षांतील दोन वर्षे एकाही मोकाट श्‍वानावर शस्त्रक्रिया केली नाही. २०११-१२ या वर्षात ३७, २०१४-१५ या वर्षात ७,४२४, २०१५-१६ या वर्षात २,८३६, २०१६-१७ या वर्षात ७० तर २०१७-१८ या वर्षात ६७ श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नसबंदी शस्त्रक्रियेचा आलेख सातत्याने खाली आला आहे. यातूनच मोकाट श्‍वानांची बजबजपुरी दिसून येते. नोव्हेंबर २०११ ते जुलै २०१८ या सहा वर्षे नऊ महिन्यांच्या काळात शहरातीला ३१ हजार २५८ महिला, पुरुष व चिमुकल्यांना श्‍वानांनी चावा घेतला असून, दिवसाला १२ नागरिकांना चावा असे हे प्रमाण आहे.

पुरुष ‘टार्गेट’
सात वर्षांतील आकडेवारीनुसार मोकाट श्‍वानांनी पुरुषांनाच ‘टार्गेट’ केल्याचे दिसून येत आहे. चावा घेतलेल्या ३१ हजार जणांत १६ हजार ६८४ पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय सात हजार ५४४ चिमुकले तर सात हजार ३० महिलांचा समावेश आहे. मोकाट श्‍वानांवर शस्त्रक्रियेसाठी महापालिकेकडून उपाययोजनांचे प्रस्तावच तयार नाही. नसबंदीसाठी अशासकीय संस्थेची मदत घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, अद्याप शस्त्रक्रिया सुरू झालेल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com