आदिवासी तरुणांचे दुष्काळाशी दोन हात

नागपूर - श्रमदान करण्यासाठी मालापूर गावात दाखल झालेले तरुण.
नागपूर - श्रमदान करण्यासाठी मालापूर गावात दाखल झालेले तरुण.

नागपूर - सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्यांची धूम असल्याने तरुणाई विविध उपक्रमांत रंगलेली आहे. पण, शहरातील आदिवासी तरुणांच्या गटाने थेट दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक सुटी खर्ची घातली. त्यांचा हा उपक्रम विशेष चर्चेत आला आहे. 

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून, याची झळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी गावकरी एकवटले असून, पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्‍यातील मालापूर गावातील ग्रामस्थांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यासाठी सकाळी ५ वाजता ते दुपारी ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत श्रमदानातून झाडे लावण्यासाठी खड्डे तयार करणे, बांध तयार करणे, उतारावर खोलगट भाग तयार करणे, शेतीबांध तयार करणे, शेततळे, दगडी बांधारे बांधणे अशी कामे सुरू आहेत. या कामात आपलाही सहभाग असावा, या उद्देशाने श्रमदान करण्याचा निर्णय नागपुरातील आदिवासी तरुणांनी घेतला आणि थेट मालापूर गाठले. 

सरपंच अंकुश धुर्वे व उपसरपंच लखन कडबे यांच्याशी संपर्क साधला आणि श्रमदानाचा योग जुळून आला. यात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आणि आदिवासी विकास युवा महासंघाच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. या चमूने श्रमदान करून पाणी अडविण्यासाठी चर खोदून आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली. या कामात आकाश मडावी, दिनेश शेराम यांच्या नेतृत्वात विजय परतेकी, स्वप्नील मसराम, नीलेश धुर्वे, शाम कुमरे, मयूर कोवे, अमित भलावी, स्वप्नील वलके, नितेश धुर्वे, सागर घुमटकर, शुभम परतेकी आणि सदस्यांनी श्रमदान केले. 

आदिवासी तरुणांनी प्रत्यक्ष सामाजिक कार्य करण्याची गरज आहे. जल, जंगल, जमिनीचे संरक्षण आदिवासी समाजाची संस्कृती आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. आधुनिकता आणि शहरीकरण झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला असला तरी वसुंधरेला वाचवायचे असल्यास आपणच पुढाकार घेऊन जलपातळी राखण्याचे काम करावे. 
- दिनेश शेराम, उपाध्यक्ष, आदिवासी युवा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com