प्रशिक्षणातील गांभीर्याच्या अभावामुळे सराव प्रश्‍नपत्रिकेची नामुष्की

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

नागपूर - शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना उन्हाळ्यात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, एका दिवसाच्या प्रशिक्षणात शिक्षकांना काहीच उमगले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामुळेच बालभारतीला आता सराव प्रश्‍नसंच काढायची नामुष्की ओढविली आहे. उद्या सोमवारपासून (ता. २६) शिक्षकांना हे प्रश्‍नसंच अपलोड करता येणार आहे.

दहावीचा अभ्यासक्रम बदलण्याचे काम गतवर्षीपासून सुरू झाले. अभ्यासक्रम बदलल्यावर उन्हाळ्यात प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. यानुसार विद्या प्राधिकरणाने एका शाळेतील एका शिक्षकाला पूर्वीप्रमाणे दोन ते तीन दिवसाऐवजी एक दिवस प्रशिक्षण देण्याचे ठरविले.

तसेच ज्या शाळेत एकापेक्षा जास्त एका विषयाचे शिक्षक असल्यास त्यांना प्रशिक्षित झालेल्या  शिक्षकांनी प्रशिक्षण देण्याचे सांगण्यात आले. शिवाय तज्ज्ञांना दहा वर्षांचा अनुभव आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असू नये अशी अट टाकली. या प्रकाराने अनुभवी शिक्षकांचा वाणवा प्रशिक्षणादरम्यान जाणवला. त्याचा फटका प्रशिक्षणाला बसला. बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांना विषय कसा शिकवावा हेसुद्धा समजले नाही. प्रशिक्षण देतेवेळी विषयांची प्रश्‍नपत्रिकेचा आराखडा, मूल्यांकन पद्धती आणि गुणभार याबद्दलही माहिती मिळणे अपेक्षित होते. ती माहिती प्रशिक्षणादरम्यान मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणे आणि परीक्षेचा नेमका पॅटर्न कोणता हे सांगता येणेही अशक्‍य झाले. त्यामुळे वेळेवर विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धतीची आणि अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठीच बालभारतीची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. 

त्यातूनच  सराव प्रश्‍नसंच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
आंतरिक गुण ठरणार डोकेदुखी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून दहावीच्या आंतरिक मूल्यांकनातून देण्यात येणारे गुण बंद करण्याचा निर्णय घेतला. याउलट सीबीएसईने दहावीला आंतरिक गुण देण्याचे ठरविले. यामुळे सीबीएसई विद्यार्थ्यांचा निकाल वाढणार असून प्रशिक्षण व माहितीच्याअभावी दहावीच्या निकालात घट होण्याची शक्‍यता आहे. याचा थेट परिणाम अकरावी प्रवेशावर पडणार आहे.

नियोजन आणि योग्य प्रशिक्षणाच्या अभावामुळे हे घडले आहे. याचा फटका दहावीच्या  विद्यार्थ्यांना येत्या परीक्षेत बसणार आहे. याला सर्वस्वी विद्या प्राधिकरण जबाबदार आहे. 
- पुरुषोत्तम पंचभाई, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ.

प्रश्‍नसंच अपलोड करण्याचे वेळापत्रक
 २६ ते ८ नोव्हेंबर प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, 
 २९ ते ३० नोव्हेंबर विज्ञान १, ३० विज्ञान २, 
 १ ते २ डिसेंबर गणित १, गणित २, 
 ३ डिसेंबर इतिहास आणि राज्यशास्त्र, 
 ४ डिसेंबर भूगोल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com