यंत्र निर्मितीतून शेतकरी पुत्राने रोखला वन्य प्राण्यांचा धुडगूस

Akola
Akola

अकोला : पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप येथील शेतकरीपुत्र योगेश सरप यांनी, स्वतःच या समस्येवर उपाय शोधला असून, त्यासाठी त्यांनी सौर उर्जेवर चालणारे वन्य प्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलीत यंत्र तयार केले आहे. 

योगेश सरप यांचे वडील मधुकरराव सरप, कान्हेरी सरप येथे अनेक वर्षापासून सेंद्रिय शेती करतात. त्यातही डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार कमी खर्चाचे परंतु अधिक उत्पादन देणारे तसेच अधिक मागणी असणारे पौष्टिक शेतमाल उत्पादन घेण्यावर ते भर देतात. मात्र या भागात निलगाय, रानडुकरे, हरीन, काळविटांचा प्रचंड वावर असल्याने, त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले मात्र, ठोस उपाय सापडला नाही. सातत्याने होणारे नुकसान पाहून त्यांचा मुलगा योगेश सरप यांनी, स्वतःच काहीतरी संशोधन करण्याचा निश्चय केला आणि वन्य प्राण्यांना घाबरविणारे, सौर उर्जेवर चालणारे स्वयंचलीत यंत्र तयार केले. त्यामुळे त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांचा वावर कमी झाला असून, ज्वारीचे डौलदार पीक पाहायला मिळत आहे. 

साडेतीन हजारात निर्मिती 
एक सोलर प्लेट, १२ व्होल्टची बॅटरी, एम्लिफायर, मेमरीकार्ड, कार्डरिडर, लोखंडी स्टॅंड, एवढ्या साहित्यातून योगेश सरप यांनी हे यंत्र तयार केले आहे. यासाठी त्यांना साडेतीन हजार रुपये खर्च आला असून, सतत सहा तास ते काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

असे घाबरविते यंत्र 
योगेश सरप यांनी एका मेमरी कार्डमध्ये वन्य प्राण्यांना घाबरविणारे, कुत्रे, फटाके, बंदुक, ढोल-ताशे, मनुष्याचे ओरडणे, असे अनेक आवाज भरले आणि ते कार्डरिडरद्वारे ते यंत्राला जोडले. रात्री दर दहा मिनिटांनी हे आवाज सुरू होतात व दहा मिनिटांनी बंद होतात. त्यामुळे वन्य प्राणी घाबरून शेतात प्रवेश करीत नाहीत. 

कुलगुरूंनी थोपाटली पाठ 
योगेश सरप यांनी तयार केलेल्या वन्य प्राण्यांना घाबरविणाऱ्या यंत्राची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले व संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यानेच स्वयं संशोधनातून शोधलेला हा उपाय पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला व योगेश सरप यांची कौतुकाने पाठ थोपाटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com