ऑक्सीजनदात्याच्या वाढदिवसाला पालकमंत्र्यांची हजेरी!

palakmantri.jpg
palakmantri.jpg

यवतमाळ : "देशात सव्वाशे कोटी लोकसंख्येपैकी साठ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पावसाचे प्रमाण वाढवायचे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. झाडामुळे पाणी आणि पाण्यामुळे समृध्दी हा एकमेव मार्ग असल्यामुळे भविष्यात दुष्काळावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा ", असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

ऑक्सीजन पार्क येथे यवतमाळ वन विभागाच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचा समारोप आणि वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करतांना ते बोलत होते. मंचावर उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, भारतीय वन सेवेचे अधिकारी अर्जुना, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस.गावंडे उपस्थित होते.

"राज्य सरकारने चार वर्षात राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या उपक्रमात शासकीय विभागासोबतच अनेक सामाजिक संघटना मनापासून सहभागी झाल्या. त्यामुळेच वृक्ष लागवड मोहीम ही लोकचळवळ बनु शकली. वन विभागानेसुध्दा यासाठी अतिशय मेहनत घेतली. गेल्या पाच वर्षात वन विभागाचा नावलौकिक वाढला आहे. वन मोठे की धन मोठे, याचा विचार जर केला तर श्वास रोखून आपण पैसे मोजू शकत नाही.  त्यामुळे मोफत मिळणा-या ऑक्सीजनची किती गरज आहे, हे यावरून लक्षात येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरासरी  तेहेतीस टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. मात्र अजूनही आपले राज्य सरासरीपेक्षा जवळपास तेरा टक्क्यांनी कमी आहे", असे त्यांनी सांगितले.

वृक्षांना सगेसोयरे मानण्याची आपली परंपरा आहे. तुळशीच्या झाडाचा औषधी म्हणून उपयोग होतो तर वडाच्या झाडापासून आपल्याला सर्वात जास्त ऑक्सीजन मिळतो. वन विभागाच्या परिश्रमामुळे शहरात जांब पार्क येथे वनउद्यान, ऑक्सीजन पार्क, ढुमणापूर येथे बांबू आणि चंदन पार्क विकसीत होत आहे.

''शासनानेसुध्दा शुभेच्छा वृक्ष, माहेरची झाडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष अशा संकल्पना आणल्या आहेत. नागरिकही या संकल्पना आत्मसाद करीत आहेत. ही लोकचळवळ आणखी जोमाने वाढविणे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे'', असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी ऑक्सीजन पार्क येथे वृक्षांचा पहिला वाढदिवस पालकमंत्र्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. तर ढुमणापूर येथील बांबु आणि चंदन उद्यानात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अमलोकचंद हायस्कूल, राष्ट्रीय हरीत सेना, एनसीसी, अँग्लो हिंदी हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com