संमेलन अध्यक्षपदावरून लेखिकांवर अन्याय  - डॉ. अरुणा ढेरे 

संमेलन अध्यक्षपदावरून लेखिकांवर अन्याय  - डॉ. अरुणा ढेरे 

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्त्री-पुरुष भेद होऊ नये. पण, आतापर्यंत हक्क असलेल्या लेखिकांनासुद्धा अध्यक्षपद देता आले नाही, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी काल येथे व्यक्त केली. 

विदर्भ साहित्य संघातर्फे सोमवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात 96 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत डॉ. ढेरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तत्पूर्वी पार पडलेल्या मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी विद्या देवधर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे, प्रकाश पायगुडे, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, वि. सा. संघाचे कार्यकारी विश्‍वस्त निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विलास मानेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. अरुणा ढेरे यांनी मुलाखतीतून कवयित्री होण्याचा प्रवास उलगडला. कवितेमुळेच वैचारिक बळ, जीवनावरची निष्ठा मिळाली. जाणता आणि प्रगल्भ वाचक मिळावा ही अपेक्षा आहे. पण, आज संवेदनशीलतेचा फारच आग्रह धरला जात आहे. त्यातूनच लेखकाला अपेक्षित नसलेल्या वाङ्‌मयबाह्य बाबी लिखाणाशी जोडून वेगळेपणाने लोकांपर्यंत आणल्या जात आहेत. संमेलनातील घडामोडींतूनही ते प्रकर्षाने जाणवले. वाङ्‌मयबाह्य साधनाने साहित्य गढूळ होऊ नये ही जबाबदारी वाचकांनी ओळखावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. वंदना बोकील-कुळकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

वाचन संस्कृतीसाठी शिक्षक-पालक संवाद 
अध्यक्षपद सन्मान म्हणून नाही तर संधी म्हणून स्वीकारले. मुलांच्या हातात पुन्हा साहित्य दण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांसमोर जावे लागेल. शिक्षक आणि पालकांना त्यांची जबाबदारी समजून घेता यावी, यादृष्टीने शिक्षक व पालकांशी संवाद साधण्यासह शिक्षण क्षेत्रात प्रयोग करणार असल्याचे डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com