सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आता कंत्राटी अधिकारी

File photo
File photo

अमरावती : पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेषाअंतर्गत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी कंत्राटी अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा यामुळे प्रकर्षाने उघड झाला.
अमरावती विभागाअंतर्गत सिंचन अनुशेषाअंतर्गत 109 प्रकल्प असून पैकी जवळपास 56 प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहीत करावयाची आहे. एकूण 22 हजार हेक्‍टर क्षेत्र संपादित करायचे असून 9 हजार हेक्‍टर जमिनीची प्रक्रिया आटोपली असली, तरी उर्वरित भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे. महसूल विभागाकडून भूसंपादन करण्यात येत असताना या प्रक्रियेची गती अतिशय मंद आहे. परिणामी 56 प्रकल्पांच्या पूर्ततेत अडथळा निर्माण झाला. राज्यपालांच्या निदेशानुसार हे प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण करावयाचे आहेत.
महसूल विभागात अधिकाऱ्यांचा अनुशेष मोठा आहे. अनेक पदे रिक्त आहेत. भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी पदाचा अधिकारी आवश्‍यक असताना त्या संख्येत अधिकारी उपलब्ध नाहीत. परिणामी विभागीय आयुक्तांनी कंत्राटी तत्त्वावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती मर्यादित कालावधीकरिता करण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलडाणा या जिल्ह्यांतील अनुशेषाअंतर्गत प्रकल्प जून 2019 मध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी भूसंपादन प्रकरणे निकाली काढणे गरजेचे आहे. भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडे पर्याप्त संख्येत अधिकारी नाहीत. एका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा प्रभार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊन प्रकल्पांच्या पूर्ततेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पाचही जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अखेर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर करून गती आणण्याचा प्रयत्न आहे. जिल्हानिहाय या अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम करील. यासाठी इच्छुकांनी विभागीय आयुक्तांकडे अर्ज करायचा असून ते छाननी करून पॅनेल तयार करतील. अकरा महिन्यांसाठी ही नियुक्ती राहणार असून गरजेनुसार त्यास मुदतवाढ देता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com