प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा - सचिन तेंडुलकर

Sachin-Tendulkar
Sachin-Tendulkar

नागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा देश करायचा असेल, तर मुलांनी मैदानावर जायला पाहिजे. खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळ खेळणारा देश बनायला पाहिजे, अशी अपेक्षा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्‍त केली. 

खास मराठीतून केलेल्या बारा मिनिटांच्या भावनिक भाषणात सचिनने तरुणाईला मैदानावर जाण्याचा सल्ला दिला. सचिन म्हणाला, जगामध्ये भारताची ओळख क्रीडाप्रेमी देशाची आहे. मात्र, मला ही ओळख अपेक्षित नाही. या देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थी खेळाच्या मैदानावर जायला पाहिजे. घराघरांतील मुले नियमित मैदानावर गेली आणि खेळली, तर एक दिवस नक्‍कीच आपला भारत खेळाडूंचा देश बनेल. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मुलांनी दररोज जिम, जॉगिंग आणि वॉकिंगला जाणे काळाची गरज आहे. तरच सुदृढ युवा पिढी आणि खेळाडू तयार होतील. खेळाडू हे युवापिढीचे आदर्श असतात. त्यांच्याकडे पाहून ते प्रेरणा घेत असतात. त्यामुळे खेळाडूंच्या मैदानावरील नेहमीच चांगली वागणूक ठेवणे आवश्‍यक आहे. 

नागपूरच्या आठवणी सांगताना मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला, नागपूर हे जगभर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, आज नागपुरात आल्यावर येथील माणसेही तेवढीच खास आणि चांगली आहेत, हे कळून चुकले. मी जेव्हा जेव्हा नागपुरात आंतरराष्ट्रीय सामने खेळलो, तेव्हा तेव्हा मला नागपूरकरांनी खूप सपोर्ट केला. फलंदाजी करताना मी एकटा असायचो. पण, मैदानावर माझ्या पाठीशी 40 हजार चाहते असायचे. माझ्या प्रत्येक चौकार व षट्‌कारावर ते चीअर्स करायचे. सचिनने विदर्भ रणजी संघाचेही यावेळी अभिनंदन केले. सचिन म्हणाला, मी रणजी फायनल आवर्जून टीव्हीवर पाहिली. दुर्दैवाने विदर्भाचा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी स्टेडियमवर जेमतेम दोनशे ते तीनशेच प्रेक्षक होते. तो सामना जर नागपुरात खेळला गेला असता, तर स्टेडियम हाऊसफुल्ल असते. घरच्या मैदानावर झालेली वाहवा वैदर्भी खेळाडूंसाठी नक्‍कीच प्रेरणादायी ठरली असती. 

सचिन तेंडुलकरने यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजक केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही स्तुती केली. या महोत्सवामुळे युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळणार असून, स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात नागपुरातून असंख्य दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, अशी आशा व्यक्‍त केली. सचिनने खेळाडूंना शॉर्टकट न वापरण्याचा सल्ला दिला. यशोशिखर गाठण्यासाठी फोकस, कठोर परिश्रम, मानसिक कणखरता आणि पुरेशी तयारी आवश्‍यक असल्याचे तो म्हणाला. शिवाय खेळाडूंना अपयशामुळे नाऊमेद न होण्याचाही सल्ला दिला. खेळाडूंच्या आयुष्यात नेहमीच मनासारखे घडेल, असे नाही. चढउतार येतच असतात. "इंज्युरी'ही होणारच.

त्यामुळे या गोष्टींची नाहक चिंता न करता खेळ मनापासून "एन्जॉय' करावा, असे सांगून खेळाडूंना मैदानावर सदैव खिलाडूवृत्ती बाळगण्याचे आवाहन केले. 

व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सचिनचे मित्र माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, संयोजक संदीप जोशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्‍की कुकरेजा, मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या छोटेखानी भाषणात खासदार क्रीडा महोत्सवाची स्तुती केली. या महोत्सवामुळे नागपूरची देशात नवी ओळख तर निर्माण झालीच, शिवाय असंख्य युवा खेळाडूंना व्यासपीठही उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी सुदृढ युवा पिढीसाठी मुलांना नियमित मैदानावर जाण्याचा यावेळी सल्ला दिला. संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्तविक केले. 

क्षणचित्रे 
  जवळपास दोन तास रंगलेल्या उद्‌घाटन समारंभाला स्टेडियमवर 20 ते 25 हजार प्रेक्षकांची उपस्थिती 
  सचिन तेंडुलकरचे सायंकाळी सव्वासातला यशवंत स्टेडियमवर आगमन. 
  हजारो नागपूरकर चाहत्यांकडून स्टेडिमयवर सचिन... सचिन...चा जयघोष. 
  सचिनच्या हस्ते रणजी विजेत्या विदर्भ संघ तसेच राज्य स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या दिव्यांग पुरुष व 
     महिला संघाचा सत्कार. 
  प्रशांत वैद्य यांनी खेळाडूंना शपथ दिली. 
  इराणी महिला संघाला अशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मूळ नागपूरकर प्रशिक्षिका 
    शैलजा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण. 
  पथसंचलनात सर्व 27 क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. 
  भोसला मिलिटरी स्कूलच्या बॅण्ड पथकाच्या तालावर खेळाडूंचे शिस्तबद्ध पथसंचलन. 
  जल्लोष बॅण्डने लोकप्रिय गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 
  नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सचिनचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  
  राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र पाटील, बीजिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती मृणाली पांडे, राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती निधी तरारे, शांघाय स्पेशल ऑलिंपिक गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या बास्केटबॉल संघाचा सदस्य उमेश मलेवार (मतिमंद) या खेळाडूंनी सचिनला मशाल प्रदान केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com