सावकारांनी लावला शेतकऱ्यांमागे तगादा

सावकारांनी लावला शेतकऱ्यांमागे तगादा

जातेगाव - हात उसनवारीतच कापूस पैसा जिरला. दीड महिना उलटला तरी उसाचे बिल कारखानदारांनी दिले नाही. कापसाच्या करारावर खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. या कर्जासाठी  तर बियाणे आणि रासायनिक खतांच्या बाकीसाठी कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांमागे तगादा लावला आहे. यंदा पुन्हा रासायनिक खतांच्या गोणीमागे दोनशे रुपयांची झालेली वाढ मुळावर आली आहे. परिणामी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आर्थिक चक्रव्युहात अडकला असून सावकारी फास आवळत चालला आहे. 

गेवराई तालुक्‍यातील जातेगाव, तलवाडा, धोंडराई या जिल्हा परिषद सर्कलमधून जायकवाडी धरणाचा उजवा कालवा गेल्यामुळे या परिसरातील शेतकरी उसाचे पीक घेतात; मात्र निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती उत्पादनात वर्षानुवर्षे घट होत चालली आहे. सलग चार वर्षांचा दुष्काळ सहन करावा लागला. मधील दोन वर्षे कशीबशी गेली. यंदा पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. उधार उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या केल्या. पेरणी होताच पावसाने ओढ दिली. परिणामी मूग, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. कापूसही करपला. पावसाअभावी रब्बी पेरणी झाली नाही. हात उसनवारी इतपत कापूस उत्पन्न मिळाले नाही. खासगी कर्ज आणि कृषी दुकानदारांची उधारी फेडणं मुश्‍किल होऊन बसले आहे. त्यातच ऊस गळीतास जाऊन दोन महिने झाले तरी कारखानदारांनी उसाचे बिल काढले नाही. ऊस गाळपास जाऊन पंधरा-वीस दिवसांनंतर उसाचे बिल देणे बंधनकारक आहे; परंतु कारखानदारांनी उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने कृषी दुकानदारांनी उधारीच्या पैशांसाठी तगादा सुरू केला आहे. 

दरम्यान, पिकवलेल्या शेतमालास सरकारकडून योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या माथी कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. 

ऊस आणि कापूस ही नगदी पिके निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडली. कापूस उत्पन्न कमालीचे घटले. उसाला एकरात दहा टन उतारा आला. या पिकाचा पैसा उधार उसनवारी आणि कृषी विक्रेत्यांचे देणे फेडण्यातच जाणार आहे. परिणामी आगामी खरिपाच्या पेरण्या करण्यासाठी हातात दमडी शिल्लक राहणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
- बाळासाहेब चव्हाण, शेतकरी, जातेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com