श्रींना भावपूर्ण निरोप

File photo
File photo

श्रींना भावपूर्ण निरोप
नागपूर : अकरा दिवसांत कानावर पडणारी गणेश स्तुतीवरील गिते, आरतीमुळे घराघरात संचारलेली भक्ती व उत्साहाची बाप्पाच्या विसर्जनाने सांगता झाली. "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..' "बाप्पा निघाले गावाला... चैन पडे ना आम्हाला...'च्या गजरात गणेशभक्तांनी लाडक्‍य बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
रविवारी सकाळच्या सत्रापासूनच विसर्जनाला प्रारंभ झाला. बहुसंख्य तलावांवर मूर्ती विसर्जनाला बंदी होती. तलाव परिसरासह वस्त्यांमध्ये कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. दुपारीही घरगुती गणपती विसर्जनाचा क्रम सुरू होता. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. मूर्ती विसर्जनाची परवानगी असलेल्या शहरातील एकमेव फुटाळा तलाव परिसर गर्दीने फुलला होता. घोषणांसह गुलालांची उधळण करीत मंडळाच्या तरुण-तरुणींनी गणरायाचे विसर्जन केले. विविध संघटनांनी निर्माल्य संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने निर्माल्य गोळा केले.
महापालिकेचे ढिसाळ नियोजन
गणेश विसर्जनासाठी तयारी केल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला. शहरात रबरी व प्लायवूडच्या कृत्रिम टॅंकची व्यवस्था केली होती. परंतु, बऱ्याच ठिकाणी विसर्जनाच्या वेळी अडचणी निर्माण झाल्या. सिद्धेश्‍वर मंगलकार्यालयाजवळील कृत्रिम रबरी टॅंकची हवा कमी झाल्याने पाणी वाहू लागले. भाविकांकडून ओरड होताच हवा भरून टॅंक पूर्ववत केली. दत्तात्रयनगर उद्यानाजवळील प्लायवूडचे टॅंक भार अधिक झाल्याने फुटले. अशा अनेक घटना शहराच्या विविध भागातून पुढे आल्या. शिवाय अनेक भागात टॅंक ओव्हर फ्लो झाल्याने मूर्ती पूर्णबणे बुडत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
नागपूरकरांनी दिला शिस्तीचा परिचय
निर्माल्य तलावात न टाकण्याबाबत मनपाकडून जनजागृती करण्यात आली. मनपाच्या प्रयत्नांना नागरिकांनीही साथ दिली. ऐरवी तलावातच निर्माल्य टाकण्याचा नागपूरकरांनी यंदा मात्र निर्माल्य ठरलेल्या ठिकाणी टाकून शिस्तीचा परिचय दिला. नागरिकांच्या सहकार्यामुळे तलावांच्या प्रदूषणाला आळा बसला.
चोख बंदोबस्त
गणेशभक्‍तांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सकाळपासून पोलिसांची मोठी कुमक लावण्यात आली. 76 सीसीटीव्ही, 8 वॉचटॉवर, सर्व्हीलंस व्हॅनवरून पोलिसांनी विसर्जन स्थळावर लक्ष केंद्रित केले होते.
पैशांसाठी भाविकांकडे तगादा
आतापर्यंत तलावांवर मूर्ती पाण्याच्या आतपर्यंत नेऊन विसर्जित करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेतले जात होते. यंदा तलावातील विसर्जन बंद असल्याने मूर्ती विसर्जित करणाऱ्यांचा रोजगार बुडाला. परंतु, यंदा नवीनच फंडा शोधून भाविकांकडून पैसे गोळा केले जात असल्याचे दिसून आले. भाविकांनी येताच त्यांना निर्माल्य काढून घेण्यासाठी मदत करायची, आरती केल्यानंतर विसर्जनासाठी मदत करायची त्यानंतर पैशांची मागणी करायची, असा प्रकार दिसून आला. मनाप्रमाणे नाही तर नेमकी येवढीच रक्कम हवी म्हणून भाविकांकडे तगादा लावला.
दोन लाख 31 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन
शहरात रविवारी दोन लाख 31 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. 260 कृत्रिम तलाव व टॅंकमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदा 163 टन निर्माल्य गोळा करण्यात आले.
900 कर्मचारी, 82 वाहनांचा ताफा
महापालिकेने विसर्जनासाठी यंदा 900 कर्मचारी व 82 वाहनांचा ताफा लावला होता. पाच नियंत्रण अधिकारी, 10 झोनल अधिकारी, 56 आरोग्य निरीक्षक, 151 जमादार विसर्जनासाठी सज्ज होते. कनक रिसोर्सेसचे 246 कर्मचारी व 82 वाहने सेवेत होती. याशिवाय स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक होते.
अनेक तलाव फुटले
भाविकांना आवाहन व विनंती केल्यानंतरही जलाशये प्रदूषित केली. फुटाळा व गांधीसागरमध्ये विसर्जन केले. तसेच निर्माल्यसुद्धा टाकले. महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. मात्र, अनेक तलाव फुटले. याशिवाय फुटाळा, गांधीसागर व सक्करदरा तलावात विसर्जनासाठी स्वंयसेवकांनी कुठलाही अटकाव भाविकांना केला नाही.
झोन स्तरावर झालेले विसर्जन
झोन कृत्रिम टॅंक,तलाव निर्माल्य (टनमध्ये) मूर्तीची संख्या
लक्ष्मीनगर 23 13 18675
धरमपेठ 33 50 58500
हनुमाननगर 35 09 17526
धंतोली 31 24 57772
नेहरूनगर 51 23 32000
गांधीबाग 22 08 8632
सतरंजीपुरा 13 13 10436
लकडगंज 27 07 9410
आशीनगर 07 02 1800
मंगळवारी 18 14 16800

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com