सासू-सुनेच्या वादात सोशल मीडियाचा ‘तडका’

सासू-सुनेच्या वादात सोशल मीडियाचा ‘तडका’

नागपूर - सुनेला स्वयंपाक येत नाही, तिचा स्वभाव चांगला नाही, सासू क्षुल्लक कारणावरून छळ करते, या आणि अशा प्रकारच्या अनेक घरगुती कारणावरून सासू-सुनेमध्ये खटके उडायचे. मात्र, बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत या कारणांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सासू-सुनेच्या बहुतांश वादाचे कारण सोशल मीडिया असल्याचे नागपुरातील ‘भरोसा’ या महिलाविषयक तक्रार नियमांचे निवारण केंद्रातून आलेल्या प्रकरणांमधून उघडकीस आले. 

सोशल मीडियामुळे परस्परांशी संवाद कमी झाला असल्याची सध्याची स्थिती आहे. यामुळे संसारात पती-पत्नीमधील विश्‍वासार्हता कमी होत आहे. यातूनच संशयाचे भूत बळावत असल्याचे बहुतांश प्रकरणांवरून समोर आले आहे. मुलगा कामावर जातो, मग सून मोबाईलवर कुणाशी बोलत राहते,  अशा प्रकारचा संशय सासू सुनेवर घेत असल्याने बहुतांश वेळी दोघींमध्ये खटके उडतात. मग आपण तुमच्या आईवडिलांपासून विभक्‍त राहू म्हणणाऱ्या अनेक महिला पतीकडे हट्ट धरतात. तर सून सतत मोबाईलवर बोलत असते, कुणाशी तरी चॅट करीत असते, हिची वागणूक बरी नाही म्हणणाऱ्या सासूही ‘भरोसा सेल’ची पायरी चढत आहेत. एकूण सुखी संसारामध्ये सोशल मीडिया विघ्न ठरत असल्याची सद्यःस्थिती आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲपवरून चॅट केल्यानंतर अनेकांच्या संसारात ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुणाच्याही फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारू नका वा चॅट करू नका. खासगी फोटो, व्हिडिओ कुणालाही पाठवू नका. त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता आहे. 
- प्रशांत भरते, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम.

भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये ३० ते ३५ टक्‍के प्रकरणांत सोशल मीडियाचा अतिवापर असल्याचे दिसून आले. पती किंवा पत्नीने मोबाईलचा कितपत वापर करावा, यावर विचार करावा. एकमेकांना वेळ द्या, तेव्हाच घरातील कलह कमी होऊन संसार सुरळीत राहील.
-शुभदा संखे, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com