राज्यात महाभरती, पालिकेचा पदभरतीचा प्रस्ताव धूळखात

File photo
File photo

नागपूर : महापालिकेत दर महिन्याला 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असून अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी महापालिका सभागृहाने 17 हजार पदांचा आकृतिबंध मंजूर करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र, वर्षभरापासून हा प्रस्ताव धूळखात असल्याने पदभरती रखडली आहे. राज्यात महाभरतीची घोषणा करणाऱ्या मुख्यंत्र्यांच्याच शहराचा कचरा झाल्याचे चित्र नुकताच महापौर नंदा जिचकार यांनी सुरू केलेल्या प्रभाग दौऱ्यातून उघडकीस आले.
राज्यात लवकरच महाभरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मात्र, त्यांच्याच शहरातील महापालिकेचा 17 हजार पदांचा आकृतिबंध राज्य सरकारकडे धूळखात पडला आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही वानवा असून याचा शहरातील पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी नुकताच 10, 11, 1 व 9 प्रभागांमध्ये केलेल्या दौऱ्यावरून स्पष्ट झाले. अनेक मोकळ्या भूखंडांवर घरातील सांडपाणी साचले असून दुर्गंधी, डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रस्त्याच्या लांबीनुसार सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, रस्ता स्वच्छतेसाठी पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याची बाब माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी दौऱ्यादरम्यान महापौरांपुढे मांडली. एवढेच नव्हे माजी स्थायी समिती अध्यक्ष व उपनेते बाल्या बोरकर यांनी सभागृहात त्यांच्या प्रभागात सफाई कर्मचारी पुरेसे नसल्याचे अनेकदा सांगितले. सातत्याने शहर वाढत असून 17 हजार पदांच्या आकृतिबंधात 8,660 पदे सफाई कर्मचाऱ्यांची असल्याचे उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. आकृतिबंध रखडल्याने शहराचा कचरा झाल्याचे चित्र आहे.
आकृतिबंधातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या
शासनाकडे प्रलंबित आकृतिबंधात पदांची संख्या 17 हजार 334 आहे. यात उपायुक्तांची 7, शहर अभियंता 9, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)-28, प्रोजेक्‍ट मॅनेजर -1, उपअभियंता (स्थापत्य) -94, कनिष्ठ अभियंता 302, निरीक्षक-233, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-448, मलेरिया सर्व्हे वर्कर-100, सुरक्षारक्षक-440, क्षेत्र कर्मचारी-500, रोड सफाई कर्मचारी-8660, पोलिस कॉन्स्टेबल-45 यासह अन्य पदांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
अग्निशमनमधील भरतीही रखडली
अग्निशमन विभागाच्या 872 पदांचा आकृतिबंध शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पदभरती झालेली नाही. केवळ 218 कर्मचाऱ्यांवर आपत्कालीन मदत पोहोचविण्याची जबाबदारी आहे. यातही 19 निवृत्त अग्निशमन कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहेत. याशिवाय अनेक अग्निशमन अधिकारी, कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. हे निवृत्त अग्निशमन कर्मचारी आगीसारख्या घटनांतून नागरिकांचा जीव कसा वाचवतील? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
उत्पन्नवाढीअभावी पदभरतीला ब्रेक
संपूर्ण आकृतिबंधानुसार भरती केल्यास महापालिकेवर 50 कोटी रुपये प्रतिमहिन्याचा ताण पडण्याची शक्‍यता आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून उत्पन्नवाढीसाठीही कुठलेही विशेष प्रयत्न होत नसल्याचे चित्र काल, शनिवारी सहायक आयुक्तांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसवरून दिसून येत आहे. उत्पन्नवाढीचे नजीकच्या काळातही चिन्हे नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या पदभरतीला ब्रेक लागले आहे. उत्पन्न न वाढल्यास हा आकृतिबंध केवळ औपचारिकता ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com