एकशे तीस वर्षांचे प्रोटेस्टंट चर्च

One hundred and thirty years of Protestant church
One hundred and thirty years of Protestant church

अमरावती : अमरावतीच्या कॅम्प भागातील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळचा सेंट थॉमस नॉर्थ इंडिया चर्च (प्रोटेस्टंट) हा ब्रिटीशकालिन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. जमिनीपासून घुमटासह 50 ते 55 फूट उंच बांधलेली ही नुसती देखणी दगडी वास्तू नसून तिची आंतर व बाह्यरचना ख्रिश्‍चन धर्मीयांचे पवित्र प्रतीक असलेल्या क्रुसाच्या आकाराची आहे. स्थापत्यकलेचा आगळावेगळा तसेच त्यावेळच्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमूना म्हणजे ही वास्तू आहे.

ब्रिटीश राजवटीत बेंगॉल स्टॉफ कॉर्प्सचा कर्नल ऑर्थर हिल मिलेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेरार प्रांतातील त्याच्या मित्रांनी 19 व्या शतकात म्हणजेच 1886 च्या सुमारास हे चर्च बांधल्याची माहिती मिळते. त्यावेळी दरोडेखोर आक्रमण करून लुटमार करायचे, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ब्रिटीश पोलिस आघाडी सांभाळायचे. अशाच एका आक्रमणात कर्नल ऑर्थर हिल मिलेट याला हौतात्म प्राप्त झाले होते.


या चर्चने आजवर 130 उन्हाळे पावसाळे अनुभवलेले आहेत. चर्चच्या वरच्या बाजूला दगडी क्रूस (क्रॉस) असून तो एका कोरलेल्या दगडात नुसता उभा ठेवलेला आहे. विशेष म्हणजे तो बाजूला काढता येतो, मात्र आजपर्यंतच्या वादळ वा-याने वा भूकंप धक्क्‌याने तो कधी जागेवरून हललेलासुद्धा नाही. वास्तूच्या घुमटाखाली एक कक्ष आहे. त्यात फादरला गणवेश परिधान करण्यासाठीची व्यवस्था तसेच तेव्हाचा सहा फूट उंचीचा आरसा, प्रार्थनेची वेळ झाल्याचे सूचित करणारी घंटा व त्याला बांधलेला दोरखंड आजही जैसे थे आहे. तेव्हा या चर्चमध्ये उच्चपदस्थच प्रार्थनेसाठी यायचे. आता केवळ 30 ते 40 कुटुंबे या चर्चचे सदस्य आहेत. या चर्चमध्ये ब्रिटीश बनावटीच्या दोन लोखंडी तिजो-यासुद्धा आहेत.
प्रोटेस्टंट हा येशू ख्रिस्ताला मानणारा वर्ग आहे, असे सांगण्यात येते. नागपूर डिओसेसकडे विदर्भातील एकूण 26 प्रोटेस्टंट चर्चचे व्यवस्थापन आहे. अमरावतीच्या या चर्चच्या धाटणीचे अकोला व अचलपूर येथेही चर्च आहे. रशियाच्या एका संशोधक तरुणीने नुकतीच या चर्चला भेट दिल्याचे कळते.

चर्चची दोन वैशिष्ट्ये

सेंट थॉमस नॉर्थ इंडिया चर्चची दोन वैशिष्ट्‌ये आहेत. ही वैशिष्ट्‌ये 130 वर्षांपूर्वीच्या स्थापत्य कलेसह तत्कालीन तंत्रज्ञानाची साक्ष आजही देतात. तेव्हा वेळ पाहण्यासाठी निवडक व्यक्तींकडेच घड्‌याळे होती. सर्वसामान्यांना दिवसाच्या वेळेचे आकलन व्हावे, यासाठी चर्चच्या घुमटावर एक यंत्र आहे. सूर्य नेमक्‍या ज्या दिशेला आहे, ती दिशा हे यंत्र आजही दाखवते. म्हणजेच दिवस किती मावळलेला आहे, यावरून लोकांना दिवसाचा अंदाज येत असल्याचे रेव्हरंड फादर सतीश नंदा यांनी सांगितले. या चर्चच्या स्थापत्यकलेचे दुसरे वैशिष्ट्‌य म्हणजे चर्चवर चारही बाजूने लोखंडी चौकडी कांब बसविलेली आहे. ही चौकडी लोखंडी कांब म्हणजे तेव्हाचे वीज अटकाव यंत्र होय. गेल्या 130 वर्षांत या चर्चच्या परिसरात कधीच वीज कोसळलेली नसल्याचे या चर्चचे कोषाध्यक्ष भास्कर आठवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com