कोराडीत नवीन औष्णिक विद्युत केंद्रास विरोध

file photo
file photo

नागपूर : राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात 8,400 कोटींची तरतूद करून राज्य सरकारने कोराडी येथे 660 मेगावॉट क्षमतेचे दोन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. परंतु, विदर्भातील विविध संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. विदर्भात नवीन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करू नये यासाठी एकत्रित येऊन आंदोलन उभारणार असल्याची माहिती विदर्भ कनेक्‍टचे अध्यक्ष ऍड. मुकेश समर्थ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भात अंदाजे 16,816 मेगावॉट वीजनिर्मिती ही कोळशावर आधारित औष्णिक वीज केंद्रांमधून केली जाते. यापैकी फक्त 1,700 मेगावॉट वीज ही विदर्भासाठी वापरली जाते. म्हणजेच 70 टक्के औष्णिक विद्युत विदर्भात तयार होते; परंतु वापरली जाते फक्त 11 टक्के. नवीन प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर ही शहरे अत्यंत प्रदूषित झाली आहेत. या प्रकल्पातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या घटकांमध्ये एनओएक्‍स (श्‍वसनाशी संबंधित विकार होण्यास कारणीभूत), एसओटू (ब्रांको कॉट्रिक्‍शनसाठी कारणीभूत), मर्क्‍युरी, किरणोत्सर्ग व हवा प्रदूषित करणारे पीएम 2.5 व पीएम 10 हे बारीक कण असतात. जे फुप्फुसांमध्ये प्रवेश करून मनुष्याच्या अकाली मृत्यूला कारणीभूत ठरतात. विदर्भात असलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गी राखेच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न जटिल झाला आहे. यामुळे हवा, पाणी व जमीन यांचे प्रचंड प्रदूषण होत आहे. त्यामुळे अजून नवीन औष्णिक केंद्र सुरू केल्यास विदर्भाचा विनाश निश्‍चित असल्याचे मत विदर्भ कनेक्‍टच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. प्रदूषण विदर्भात करायचे व फायदा पश्‍चिम महाराष्ट्राने घ्यायचा, हा प्रकार बंद करून कोराडी येथील प्रस्तावित औष्णिक ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे श्रीनिवास खांदेवाले, विदर्भ पर्यावरण ग्रुपचे सुधीर पालीवाल, चंद्रपूरचे सुरेश चोपे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com