वीणाताईंनी जपलंय ‘देणं समाजाचं’

veena-gokhale
veena-gokhale

अकोला : समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजोपयोगी कामाला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा अनेकांना असते; मात्र कोणाला आणि कशी मदत करावी हे कळत नसते. शिवाय आपण दिलेली रक्कम योग्य पद्धतीने गरजूंसाठी वापरली जाईल की नाही, अशीही मनात शंका येते. अनेकांपुढची ही समस्या पुण्यातील आर्टिस्ट्री या संस्थेने दूर केली आहे. आर्थिक मदत करण्यासाठी लोकांची ही मानसिकता लक्षात घेऊन संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांनी पुढाकार घेऊन हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला. राज्यातील गावोगावी जाऊन त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची पाहणी करतात. या संस्थांचे कार्य, त्याचे स्वरूप, व्याप्ती याची शहानिशा करून खात्री झाल्यानंतर त्यांना ‘देणे समाजाचे’ या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. दर वर्षी अशा निवडक संस्थांना एकत्र आणून प्रदर्शनाद्वारे त्यांना आपले कार्य लोकांसमोर मांडण्याची संधी दिली जाते. तीन दिवस मध्यवर्ती ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले जाते. 

त्यांनी जाणीवपूर्वक काही पथ्ये पाळली आहेत. कोणत्याही संस्थेची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रत्येक संस्थेला दोन वर्षे संधी दिली जाते. त्यामुळे दर वर्षी काही नव्या संस्था प्रदर्शनात सहभागी होतात. या प्रदर्शनात कोणत्याही उत्पादनांची विक्री केली जात नाही. सहभागी संस्थांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. हा उपक्रम पितृपंधरवड्यात ठेवण्यामागेही एक हेतू आहे. या काळात आपल्या पितरांसाठी काही दान दिले जाते. आपल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर आपल्या उरलेल्या आयुष्याचा आणि आर्थिक क्षमतेचा मेळ घालून योग्य वेळी प्रत्येक जण अनेक प्रकारचे सुखोपभोग घेत असताना आपले हजारो बांधव असे आहेत, की त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण अशा गरजाही भागत नाहीत. त्यांनी भीक मागून जगू नये म्हणून त्यांच्यासाठी, कष्टाने, आणि नि:स्वार्थीपणाने राबणारे जे अनेक हात आहेत आपण निदान आर्थिक मदत तरी नक्की देऊ शकतो हाच विचार ठेवून अशा संस्थांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी गेली 14 वर्षे निष्ठेने चालवलेला हा वसा  निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

चौदा वर्षांचा प्रवास
ज्या लोकांना सामाजिक कार्यासाठी मदत देण्याची इच्छा असते, ते या प्रदर्शनाला भेट देऊन संस्थांचे काम जाणून घेतात, कार्यकर्त्यांशी बोलून माहिती जाणून घेतात आणि आपल्याला आवडलेल्या संस्थेला आर्थिक मदत देतात. यामुळे लोकांना योग्य ठिकाणी मदत केल्याचे समाधान मिळते, तर संस्थांना एकाच ठिकाणी अनेक दाते मिळतात. त्यांच्या कामाची प्रसिद्धी होते. त्यामुळे सामाजिक संस्थांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. गेली 14 वर्षे वीणा गोखले हा उपक्रम राबवत आहेत. दर वर्षी मिळणारा प्रतिसाद वाढताच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com