जागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत

File photo
File photo

जागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत
नागपूर : "दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच. विकत देण्यास तयार असाल तर किंमत बोला, ती मोजायला तयार आहोत...' विधानसभेत असे रोखठोक आवाहन कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांनी दीक्षाभूमीच्या भूखंडासाठी केले होते. तो दिवस होता 21 जुलै 1960. बाबू हरिदास म्हणजे आंबेडकरी चळवळीतील झंझावात. त्यांनी एकाच मध्यरात्री दीक्षा समारंभाच्या या पटांगणात बुद्धाचा कमलपुष्पात पुतळा बसवला होता. तो बसवला नसता तर कदाचित दीक्षाभूमीवर असलेले हे भव्यदिव्य "स्मारक' आज आंबेडकरवाद्यांना डोळ्यात साठवता आले नसते. असे असले तरी या जागेसाठी संघर्ष करणारे बाबू हरिदास आवळे यांची साधी प्रतिमाही दीक्षाभूमीवर दिसत नाही.
सहा डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. यानंतर पहिली शोकसभा दीक्षाभूमीवर झाली. आणि त्या दिवसापासून आवळेबाबू यांना दीक्षाभूमी मिळविण्याचे वेध लागले. निवेदनापासून तर न्यायालयीन लढाई त्यांनी लढली. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला मात्र बाबासाहेबांच्या या सच्च्या सैनिकाचे विस्मरण झाले. दीक्षाभूमी मिळवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. दर रविवारी बौद्धांना दीक्षाभूमीवर "बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथाचे वाचन आणि बुद्धवंदना ग्रहण करण्यासाठी ते निमंत्रण देत होते. हळूहळू गर्दी होऊ लागली. तशी पोलिसांनी दखल घेतली.
दीक्षाभूमीवरील खबरबात घेण्यासाठी पोलिसही तैनात असत. पुढे पोलिस कंटाळले. हीच संधी साधून आवळेबाबूंनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला (13 एप्रिल 1957) त्रिसरण-पंचशील, बुद्धवंदना, संघवंदना ग्रहण कार्यक्रम घेतला. एका बाजूला कार्यक्रम घेत मधे निळा पडदा लावून दुसऱ्या बाजूला खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. आवळेबाबूंच्या नेतृत्वात धोंडबाजी मेंढे, मनोहर गजघाटे, बिसन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी कमलपुष्पात तयार केलेली बुद्धमूर्ती गोपालनगर चौकात तयार ठेवली होती. रात्री नऊला खड्डा पूर्ण झाल्यानंतर तीन हातठेल्यांवर वाळू, विटा, सिमेंट, मुरूम आणि पाण्याचे दोन ड्रम दीक्षाभूमीवर आले. स्तंभ उभारला. मध्यरात्री बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर आणली गेली. बुद्धमूर्ती स्तंभावर बसवली गेली, या आठवणींना आंवळेबाबूच्या नेतृत्वात काम करणारे आंबेडकरी कार्यकर्ते विनायक जामगडे यांनी उजाळा दिला.
मी बसवली बुद्धमूर्ती...
दीक्षाभूमीवर बुद्धमूर्ती बसवल्याची वार्ता शहरात पसरली. सीताबर्डीतील पोलिस दीक्षाभूमीवर तैनात झाले. बुद्धमूर्ती बसवणाऱ्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळी नागपुरातील साऱ्याच पुढाऱ्यांनी हात वर केले. आवळेबाबू नावाच्या झपाटलेल्या कार्यकर्त्याने "मी बुद्धमूर्ती बसवली' असे छातीठोकपणे सांगितले. प्रकरण न्यायालयात गेले. त्यांच्यावर खटला भरला. परंतु, ते मागे हटले नाहीत.

दीक्षाभूमीच्या भूखंडासाठी कर्मवीर बाबू हरिदास आवळे लढले नसते, तर कदाचित दीक्षाभूमी मिळाली नसती. या ऐतिहासिक भूमीवर डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे बाबासाहेबांचे स्मारक उभारले. स्मारक समितीच्या सदस्यांचे फोटो लावले. मात्र ज्यांच्या संघर्षातून ही भूखंड मिळाला त्यांचा ना पुतळा, ना फोटो येथे दिसत.
- विनायक जामगडे, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ता, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com