अकोल्याचा ऋषभ पारिसे "स्वरवैदर्भी' विजेता

वर्धा : शालिनी मेघे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऋषभ पारिसे.
वर्धा : शालिनी मेघे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऋषभ पारिसे.

वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित सोळाव्या "स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धेचे विजेतेपद अकोल्याच्या ऋषभ पारिसे याने पटकाविले. सावंगी (मेघे) येथे आयोजित स्पर्धेत अमरावतीचा मुकुंद सूर्यवंशी आणि वर्ध्याचा प्रकाश गवारकर हे गायक उपविजेते ठरले.
"स्वरवैदर्भी' महाअंतिम स्पर्धेचे उद्‌घाटन अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी केले. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. आनंदवर्धन शर्मा, पत्रकार हरिभाऊ वझुरकार, मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर इंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव उपस्थित होते. विजेत्यांना संस्थेच्या विश्वस्त शालिनीताई मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक डॉ. श्‍याम भुतडा, "स्वरवैदर्भी'चे संयोजक संजय इंगळे तिगावकर, परीक्षकवृंद संगीतकार सुधाकर अंबुस्कर, ज्येष्ठ गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, तबलावादक डॉ. देवेंद्र यादव, सुनील रहाटे यांच्या हस्ते रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अंतिम स्पर्धेसाठी 17 ते 35 वयोगटातील विदर्भातील 78 स्पर्धकांमधून 11 युवा गायकांची निवड करण्यात आली होती. यात उत्कृष्ट सादरीकरण करीत ऋषभ पारिसे याने 22 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त केला. मुकुंद सूर्यवंशी याला व्दितीय 11 हजार रुपये तर प्रकाश गवारकर याला तृतीय 7 हजार रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. बुलडाण्याचा दिव्यांग गायक भगवान बाबूळकर यालाही 7 हजार रुपयांचा विशेष प्रोत्साहन पुरस्कार दत्ता मेघे यांच्या वतीने देण्यात आला.
याशिवाय दीपाली बेलूरकर, पवन भरडे (अमरावती), अपर्णा दरडे (गडचिरोली), प्रगती गुडधे (चांदूर बाजार), स्वप्नील तितरे (नागपूर), नेहा जोशी (मोर्शी) आणि प्रवीण पेटकर (हिंगणघाट) या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत नव्या व जुन्या सिनेगीतांसोबतच स्पर्धकांनी मराठी गझलही सादर केली. या स्पर्धकांना शैलेश जगताप, चारू साळवे, दिनेश गवई, राजेंद्र झाडे, रितेश गुजर, गिरीश शर्मा या वादकांनी साथसंगत केली. स्पर्धेचे सूत्रबद्ध संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले. पुरस्कार वितरणापूर्वी प्रमोदिनी क्षत्रिय, डॉ. सायली इंगळे, बालगायिका नक्षत्रा यांनीही गीते सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com