दिवसाआड पाणी आता महिनाभर

file photo
file photo

नागपूर : मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता महिनाभर राहणार आहे. शहरवासींना दिवसाआड पूर्ण पाणी मिळावे, यासाठी स्विमिंग पूलचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल्स, सभागृह आदीचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी स्पष्ट केले. महिनाभरात जलाशय परिसरात चांगला पाऊस झाल्यास पाणीपुरवठा दररोज सुरू करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मागील सोमवारी महापालिकेने आठवड्याभरासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय जाहीर केला होता. आज या निर्णयावर पुनर्विचारासाठी महापालिकेत अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर झलके यांनी 22 ऑगस्टपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. त्यामुळे नागपूरकरांना महिनाभर जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. दर आठवड्यात या निर्णयाचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील आठवड्यात तीन दिवस नागरिकांना पाणी मिळाले नाही. तीन दिवसांत पाण्याची बचत झाली असून भविष्यात तेच पिण्यासाठी कामात येईल, असे झलके यांनी सांगितले. तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने 1260 एमएलडी पाण्याची बचत झाल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या खैरी येथून पाणीपुरवठ्याच्या दिवशी 504 एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे तर कन्हान नदीतून 190 एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. कन्हानवरून बेझनबाग जलकुंभाला 20 एमएलडी पाणी देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे ते म्हणाले. पाण्याबाबत घेतलेल्या कठोर निर्णयाबाबत नमूद करताना झलके यांनी जलतरण तलावाचे पाणी बंद करण्यात आल्याचे सांगितले. ज्या जलतरण तलाव क्‍लबकडे पाण्याचे स्त्रोत आहे, त्यांनी त्यांच्या पाण्याचा वापर करावा, परंतु महापालिकेचे पाणी दिले जाणार नाही. महापालिकेचे पाणी वापरणाऱ्या जलतरण तलावावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय हॉटेल, सभागृहात मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. या पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी त्यांच्यावरही नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे उपस्थित होते.शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याबाबत बेजबाबदारी दिसून येत आहे. अनेकदा नळ सुरू ठेऊन कर्मचारी प्रसाधनगृहातून बाहेर निघून जातात. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व शासकीय कार्यालयांना पाणी बचतीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्र पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे झलके यांनी सांगितले.मेडिकल व मेयोला नियमित पाणी देण्यात येत आहे. त्यांच्या पाण्यात कुठेही कपात नाही. मेडिकलमधील जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यासाठी मेडिकल प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करावी. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करीत नसल्याचा गलथानपणा मेडिकल प्रशासन करीत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com