जलकुंभावर नागरिकांचा राडा

file photo
file photo

नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठ्याचे तीव्र पडसाद उमटत असून नागरिकांत संतापाची लाट पसरली. यातूनच आज बेझनबाग जलकुंभावर नागरिकांनी राडा केला. पाण्यासाठी नागरिकांनी टॅंकरच्या चाव्याही ताब्यात घेत जलकुंभावरील अधिकाऱ्यांशी वाद घातला. टॅंकरने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने प्रमुख आंदोलनकर्त्यासह 21 जणांविरोधात ओसीडब्ल्यूच्या तक्रारीवरून जरिपटका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जनक्षोभ उसळण्याची शक्‍यता बळावली आहे.
महापालिकेने या आठवड्यात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, या निर्णयाबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे प्रशासन तसेच नगरसेवकांविरुद्ध नागरिकांत संताप वाढत आहे. काल, शुक्रवार संपूर्ण शहरात पाणी बंद होते. आज सकाळीही पाणी न आल्याने जरीपटका भागातील 20 नागरिकांनी रोहित यादवच्या नेतृत्वात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बेझनबाग जलकुंभावर धडक दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी टॅंकरने तत्काळ पाणीपुरवठ्याची मागणी केली. पाणी न मिळाल्याने उग्र झालेल्या नागरिकांनी बेझनबाग जलकुंभ परिसरात पाणी भरण्यासाठी उभ्या असलेल्या टॅंकरच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. यावेळी महापालिका व नगरसेवकांविरोधात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनच केले. नागरिकांचा संताप बघता अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापाने आलेले नागरिक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी येथे हजर असलेले ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश महाजन यांच्याशी वाद घालत घोषणाबाजी सुरूच ठेवली. नागरिकांनी पाण्याची मागणी करीत टॅंकरच्या चाव्या काढून घेतल्याने अधिकाऱ्यांना इतर ठिकाणीही पाणी पाठविणे शक्‍य झाले नाही. अखेर ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक महाजन यांनी जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी रोहित यादव व त्याच्या 20 सहकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. टॅंकरने पाणी वितरण व्यवस्था बंद पाडल्याचे तक्रारीत नमुूद असून जरीपटका पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गैरकायदेशीर मंडळी जमविणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्हा दाखल केला. जलसंकटावरून आता शहरातील नागरिकांत तीव्र रोष निर्माण होत असल्याचे या घटनेने संकेत दिले असून उद्या, रविवारी पुन्हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडून जनक्षोभ उसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com